घरदेश-विदेशइ-सिगरेट्सवर केंद्र सरकारचा बडगा, राज्य सरकारांना आदेश

इ-सिगरेट्सवर केंद्र सरकारचा बडगा, राज्य सरकारांना आदेश

Subscribe

ENDS अर्थात इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम्सच्या उत्पादनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. इ-सिगारेट्स, वेप, इ-शिशा, इ-हुक्का अशा गोष्टींमुंळे देशातील तरुणांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना बंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

एकीकडे सिगारेट, तंबाखू आणि गुटख्याच्या अतिसेवनामुळे भारतीय नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या या पदार्थांवर निर्बंध आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे. मात्र आता दुसरीकडे इ-सिगारेट्सने राष्ट्रीय आरोग्यासमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम्स (ENDS) अर्थात इ-सिगारेट्स, वेप, इ-शिशा, इ-हुक्का अशा अंमली गोष्टींवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासंदर्भातील पत्रच केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना पाठवले आहे. राज्य सरकारांनी या गोष्टींवर राज्यात बंदी घालावी असे निर्देश या पत्रातून देण्यात आले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील उत्पादकांनी नाराजी व्यक्त करत या गोष्टी आरोग्यासाठी मूळ सिगारेटपेक्षा कमी घातक असतात असा दावा केला आहे.

केंद्र सरकारने काय दिलेत आदेश?

आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना पाठवलेल्या पत्रानुसार ENDS उत्पादनांवर त्वरीत बंदी घालण्याची कार्यवाही करावी लागणार आहे.

व्यापक राष्ट्रीय हित लक्षात घेता देशातील तरूण पिढी आणि अशा उत्पादनांना लगेच बळी पडू शकणाऱ्या तरुणांना या उत्पादनांच्या वापरापासून रोखणं आवश्यक आहे. त्यामुळे इ-सिगारेट, हीट नॉट बर्न डिव्हाईस, वेप, इ-शीशा आणि इ-निकोटिन फ्लेव्हर्ड हुक्का यांच्यावर बंदी घालण्यात यावी असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोणत्याही प्रकारे विक्रीवर बंदी

दरम्यान, केंद्र सरकारने घातलेल्या बंदीनंतर या उत्पादनांची ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा कोणत्याही प्रकारे विक्री करता येणार नाही. याशिवाय, या उत्पादनांच्या वितरण, आयात किंवा जाहिरातीवरही बंदी घालण्यात आली आहे.

ENDS म्हणजे कॅन्सरला आमंत्रण!

या उत्पादनांच्या केलेल्या तपासणीनंतर कॅन्सरसाठी ही उत्पादने मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरू शकतात ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे तंबाखूसारख्या घातक पदार्थाला ENDS उत्पादने पर्याय ठरू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. फिलीप मॉरीस या तंबाखूजन्य उत्पादनांच्या कंपनीने मात्र यावर तीव्र हरकत व्यक्त केली आहे. ही कंपनी येत्या काही महिन्यांमध्ये भारतात ENDS उत्पादनं लाँच करणार होती. मात्र, आता त्यांना असं करणं शक्य होणार नाही, असं वृत्त इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -