घरताज्या घडामोडीCitizenship Amendment Bill: राज्यसभेत विधेयक मंजूर, सेना खासदारांचा सभात्याग

Citizenship Amendment Bill: राज्यसभेत विधेयक मंजूर, सेना खासदारांचा सभात्याग

Subscribe

गेल्या अनेक वर्षांपासून देशभरात वादग्रस्त ठरलेलं नागरीकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आल्यानंतर त्याला राज्यसभेत मांडण्यापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला होता. बुधवारी संध्याकाळी यावर राज्यसभेमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर त्याच्यावर मतदान घेण्यात आलं. यावेळी सभागृहात ४ सदस्य प्रकृतीच्या कारणामुळे अनुपस्थित होते. त्याव्यतिरिक्त एकूण २३६ सदस्य सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे हे विधेयक पारित होण्यसाठी ११९ सदस्यांचंच मतदान आवश्यक होतं. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावर सविस्तर उत्तरं दिल्यानंतर राज्यसभेमध्ये CAB वर मतदान घेण्यात आलं. आधी सभापती व्यंकय्या नायडू यांनी आवाजी मतदानाच्या पद्धतीने मतदान घेतलं. त्यामध्ये विरोधातली मतं जास्त आली. मात्र, नंतर सदस्यांकडून डिविजनची मागणी करण्यात आल्यानंतर पुन्हा वोटिंग मशीनवर मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्याच्या विरोधात बहुमत पडल्यामुळे या विधेयकाचा राज्यसभेतला मार्ग सुकर झाला. दरम्यान, शिवसेनेच्या खासदारांनी विधेयकावरील मतदानावेळी सभात्याग केला.

चिकित्सा समितीकडे विधेयक न पाठवण्याचा निर्णय झाल्यानंतर थेट विधेयकावर पुन्हा मतदान घेण्यात आलं. त्यावेळी मात्र विधेयकाच्या बाजूने १२५ तर विरोधात १०५ सदस्यांनी मतदान केलं. त्यामुळे विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर झाल्यावर शिक्कामोर्तब झालं.

- Advertisement -

विधेयकामुळे काय होईल?

दरम्यान, या विधेयकाच्या मंजुरीनंतर अखेर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या शरणार्थींना भारतात येऊन भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विधेयकानुसार भारतात येऊ इच्छिणाऱ्या शरणार्थींना भारतीय नागरिकत्व, त्यासोबतचे अधिकार आणि त्यासोबत मिळणारा स्वातंत्र्याचा अधिकार देखील मिळणार आहे. या नागरिकत्वासोबत या तिन्ही देशांमधल्या अल्पसंख्य शरणार्थींना रोजगार आणि इतर लाभ इतर भारतीयांप्रमाणेच मिळू शकणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, हे विधेयक म्हणजे देशाच्या इतिहासातला काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली आहे.

लोकसभेमध्ये विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग केला. यावर काँग्रेसकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. ‘हे शिवसेनेचं स्वागतार्ह पाऊल आहे’, अशा शब्दांत काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -