घरमुंबईगुडविनचे गुंतवणूकदार हवालदील, थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

गुडविनचे गुंतवणूकदार हवालदील, थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

Subscribe

ठाणे आणि पालघर जिल्हयातील हजारो गुंतवणूकदारांना कोटयावधी रूपयांना गंडा लावून फरार झालेले गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनील कुमार आणि सुदीश कुमार यांचा तपास लावण्यात अजून पोलिसांना यश आलेलं नाही. दीड महिना होऊनही तपास कागदावरच असल्याने हताश झालेल्या गुंतवणूकदारांनी न्यायासाठी थेट मंत्रालय गाठत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे धाव घेतली आहे. पोलीस तपासात दिरंगाई होत असल्याने गुडविनचे मालक देशाबाहेर पळून जाण्याची भिती गुंवतणूकदारांनी निवेदनाद्वारे वर्तवली आहे.

ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, चेंबूर, पुणे, वसई, वाशी, गोवा आणि इतर ठिकाणावरील गुंतवणूकदारांना गुडविन ज्वेलर्सने १६ ते १८ टक्के व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली. डोंबिवलीतील सुमारे ८०० गुंतवणूकदरांची सुमारे २१ कोटी रूपयांची फसवणूक झाली. अन्य शहरांमध्येही शेकडो कोटींची फसवणूक झाली. या फसवणूकप्रकरणी डोंबिवली तसेच ठाणे पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील सागाव येथील महागणपती हॉलमध्ये शेकडो गुंतवणूकदारांची बैठक पार पडली. या बैठकीला ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, वाशी, वसई आणि अंबरनाथ येथील गुंतवणूक मोठया संख्येने उपस्थित होते. पोलिसांकडून कोणतंच सहकार्य मिळत नसल्याची नाराजी यावेळी गुंतवणूकदारांनी बैठकीत व्यक्त केली.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी गुंतवणूकदारांनी काँग्रेसचे नेते संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन तपास लवकरात लवकर लावण्याची मागणी केली हेाती. मात्र दीड महिना होऊनही गुडविनचे मालक फरार झाले असून अजूनही पोलिसांना सापडत नाहीत. पोलिसांकडून कोणतंच सहकार्य मिळत नसल्याने गुंतवणूकदरांनी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिसांना आदेशित करण्यात यावे अशी मागणी गुंतवणूकदारांनी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांकडे केली.याबाबत लवकरच पोलिसांना आदेशित करण्यात येईल असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -