Corona Vaccine: गूडन्युज! देशात पुढच्या वर्षी येणार कोरोना वॅक्सीन

Corona vaccine will be available in India by 2021 said health minister dr. harsh vardhan
Corona Vaccine: गूडन्युज! देशात पुढच्या वर्षी येणार कोरोना वॅक्सीन
Advertisement

संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ९१ लाखांहून अधिक आहे. तर ९ लाख २८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. अशा परिस्थितीत कोरोनावर लस कधी येणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान जगातील पहिली कोरोनाची रशियाची लस ‘स्पुतनिक व्ही’चे डोस लोकांना देण्यास सुरुवात झाली आहे. रशियाच्या लसीकरणाचा हा पहिल्या टप्पा सुरू आहे. माहितीनुसार, २०२०-२१ मध्ये १०० कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले जाणार असल्याचे रशियाने सांगितले आहे. आता भारतात देखील २०२१ पर्यंत कोरोनाची लस येणार असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला आहे.

देशात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता भारत देश जगातील कोरोनाबाधितांच्या यादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान आता देशात कोरोना लस पुढच्या वर्षी उपलब्ध होणार आहे. पण अद्याप याबाबत कुठलीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही आहे. पण कोरोनाची लस २०२१च्या सुरुवातीला येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन सांगितले आहे. कोरोनाची लस लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी रणनिती आखण्यात येत आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना आणि कोरोनाच्या संकटात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लस आपात्कालीन परिस्थितीत दिली जाण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण कशाप्रकारे करता येईल? याबाबत रणनिती आखण्यात येत आहे, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी रविवारच्या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. सध्या कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर लसीची सुरक्षा, लसीकरण, इक्विटी, कोल्ड चैन गरज, उत्पादन वेळ सीमा यांसारख्या मुद्द्यांवर गंभीर चर्चा सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात २४ तासांत ९२ हजार ७१ नवे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार १३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७९ हजार ७२२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३७ लाख ८० हजार १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीची आजपासून आंतरराज्य बससेवा सुरू होणार