‘सण साजरे करण्यासाठी जिवंत राहणं गरजेचं’, छटपूजेची परवानगी मागणाऱ्यांना हायकोर्टाचे ताशेरे

छट पूजा

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. त्यामुळे शहरातील काही भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन वाढवला जात आहे. तर सण साजरे करण्यावर काही प्रमाणात बंधने आणली आहेत. त्यातच दिल्ली सरकारने छट पूजेच्या आयोजनावरही बंदी घातली होती. दिल्ली सरकारच्या या निर्णयाविरोधात काही लोकांनी हायकोर्टात दाद मागितली. मात्र दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्यांनाच कडक शब्दात सुनावले. ‘याचिकाकर्ते दिल्लीतील कोरोना परिस्थितीविषयी कदाचित अनभिज्ञ आहेत. कोणत्याही धर्माचे सण साजरे करण्यापुर्वी आधी तुम्हाला जिवंत राहणे गरजेचे आहे’, अशा शब्दात हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.