जो बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्या मतदारांना म्हणाले की, ‘आता एकमेकांना संधी देऊ’

जो बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्या मतदारांना म्हणाले की, 'आता एकमेकांना संधी देऊ'

शनिवारी रात्री अमेरिकेच्या राष्ट्रध्यपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून जो बायडेन आता अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून बहुमताने जो बायडेन जिंकले आहेत. जो बायडेन अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यामुळे सध्या जो बायडेन यांच्या अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. त्याचप्रमाणे भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर जो बायडेन यांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या नागरिकांना संबोधित केले. त्यावेळीस त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मतदारांना आवाहन केले.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, ‘अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ज्या नागरिकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केले होते, ते निराश झाले असतील, हे मी समजू शकतो. आता एकमेकांना संधी देऊया. तसेच आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे थांबवले पाहिजे. नव्या दृष्टीकोनातून एकमेकांकडे पाहिले पाहिजे.’

पुढे बायडेन म्हणाले की, ‘मला अमेरिकेच्या नागरिकांनी विजयी केले. आजवरच्या अमेरिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाचा राष्ट्राध्यपदासाठी इतके भरघोस मतदान झाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून मी अमेरिकेच्या नागरिकांना सांगू इच्छितो की, मी विभाजनाचे राजकारण करणार नाही. एकात्मतेसाठी प्रयत्न करेल. रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट्स अशी वेगवेगळी राज्य मला दिसत नाहीत. मला फक्त एकसंध अमेरिका दिसते.’


हेही वाचा – जो बायडेन यांच्या विजयानंतरही ट्रम्प हार मानण्यास तयार नाहीत