काय पण नशीब आहे! २५ लॉटरीची तिकिटं काढली, सगळीच्या सगळी लागली! मिळाले सव्वा लाख डॉलर्स!

lottery winning

लॉटरी या विषयाबद्दल अनेकांना कुतुहल, उत्साह, राग, तिरस्कार अशा अनेक गोष्टी वाटत असतात. ज्याला त्याला आलेल्या अनुभवानुसार या भावना ठरतात. न खेळणाऱ्यांना कुतुहल, खेळून भिकेला लागलेल्यांना तिरस्कार तर व्यसन लागलेल्यांना हाव. पण एका पठ्ठ्याला मात्र या लॉटरीनं वेड लागायची वेळ आली. तीही एकाच दिवशी! लॉटरी तसा नशिबाचा खेळ असतो. कधी नशिबाचा सट्टा लागतो, तर कधी नाही. पण या पठ्ठ्यासाठी ही नशिबाची कांडी एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल २५ वेळा फिरली. आणि तीही एकाच दिवशी! त्याच्या नशिबाची गाडी अशी काही सुसाट निघाली की अवघ्या काही मिनिटांत महाशय १ लाख २५ हजार अमेरिकन डॉलरचे मालक बनले! जिंकलेली रक्कम मुलाच्या शिक्षणासाठी वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पण काळजी घ्या बरं, कारण नशीब प्रत्येकावरच इतकं फळफळत नसतं. तासाभरात २५ वेळा हरून भिकेला लागणारेही महाभाग आहेतच!

त्याला वाटलं, एक तरी तिकिट लागावं!

तर हा प्रकार घडलाय अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये. रेमंड हॅरिंग्टन नावाच्या माणसाने आपल्या नशिबाची परिक्षा घेण्यासाठी व्हर्जिनिया लॉटरीचं तिकिट खरेदी करायचं ठरवलं. व्हर्जिनिया बीचवरच्या वेगनम स्टोअरमधून त्यानं व्हर्जिनिया लॉटरीची १ डॉलर किंमतीची एकूण २५ तिकिटं खरेदी करून टाकली. हेतू हा होता, की कुठलं तरी एक तिकिट का होईना, लागेलच! या प्रत्येक तिकिटावर इनाम होता ५ हजार अमेरिकी डॉलर इतका!

त्याला बसले २५ धक्के!

थोड्या वेळाने जसजसे लॉटरीचे निकाल जाहीर व्हायला लागले, तसतसे याला धक्क्यावर धक्के बसू लागले. एक, दोन, तीन, चार, पाच, दहा, पंधरा, वीस आणि पार शेवटच्या पंचविसाव्या तिकिटापर्यंत याच्या सगळ्याच तिकिटांवर रक्कम लागली होती. त्यामुळे अवघ्या २५ डॉलरच्या तिकिटांवर त्याला तब्बल १ लाख २५ हजार अमेरिकी डॉलरची कॅश रक्कम मिळाली!

याआधी देखील अशी काही प्रकरण घडली आहेत. एप्रिल महिन्यात याच लॉटरीसाठी गेल्या ३० वर्षांपासून एकाच नंबरची तिकिटं खरेदी करणाऱ्या व्यक्तीला एकाच दिवसात दोन वेळा १० लाख अमेरिकी डॉलरची रक्कम मिळाली होती. पण लॉकडाऊनमुळे लॉटरी जिंकल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर त्याला बक्षिसाची रक्कम क्लेम करता आली होती. २०१८मध्ये देखील रॉबर्ट स्टिव्हर्ट नावाच्या व्यक्तीला ५० लाख अमेरिकी डॉलरची रक्कम मिळाली होती. त्याला लागोपाठ ३ लॉटरीच्या तिकिटांवर रक्कम मिळाली होती.