घरदेश-विदेशबुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठीच – मेट्रो मॅन इ. श्रीधरन

बुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठीच – मेट्रो मॅन इ. श्रीधरन

Subscribe

देशभरात बुलेट ट्रेन हवी की नको यावर चर्चा सुरू असताना मेट्रो मॅन इ श्रीधरन यांनी मात्र बुलेट ट्रेन सामान्य भारतीयांसाठी फायदेशीर नसल्याचं म्हटलं आहे. भारताला स्वस्त आणि सुरक्षित रेल्वे प्रवास सुविधा आवश्यक असल्याचं ते म्हणाले आहेत.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आग्रहाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्यावर सर्व विरोधकांनी जरी टीकेची तोफ डागली असली, तरी भाजपा नेते मात्र हिरीरीने या प्रकल्पाच्या समर्थनार्थ सरसावले आहेत. मात्र, आता मेट्रो मॅन इ श्रीधरन यांनीच बुलेट ट्रेन ही सामान्यांसाठी फायदेशीर नसल्याचं म्हटलं आहे. ‘बुलेट ट्रेन ही फक्त श्रीमंतांसाठीच आहे. सामान्य भारतीयांना सुरक्षित आणि वेगवान रेल्वे सुविधा हवी आहे’, अशी भूमिका श्रीधरन यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना मांडली. त्यामुळे भारताला खरंच बुलेट ट्रेनची गरज आहे का? या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

‘बुलेट ट्रेन खर्चिक, आवाक्याबाहेरची’

बुलेट ट्रेनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या भारतात सुरू आहे. मात्र, ही ट्रेन फक्त उच्च वर्गीय भारतीयांपुरतीच मर्यादीत रहाणार आहे. खरं म्हणजे ती खूप खर्चिक आहे. त्यामुळे सामान्य भारतीयांच्या आवाक्याच्या बाहेरची आहे. भारताला खरी गरज आहे ती बुलेट ट्रेनची नसून अत्याधुनिक, स्वच्छ, सुरक्षित आणि वेगवान रेल्वे सुविधेची. जी सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी असेल.”

- Advertisement -

भारतीय रेल्वेच्या प्रगतीपासून असमाधानी

भारतीय रेल्वे सेवेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीधरन म्हणाले, “भारतीय रेल्वेच्या प्रगतीपासून मी समाधानी नाही. बायो-टॉयलेट हा एक मुद्दा सोडला, तर भारतीय रेल्वे आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप मागे आहे. वेग अजूनही खूप कमी आहे. वक्तशीरपणाबाबत तर आनंदच आहे. माझ्यामते तर भारतीय रेल्वे तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर प्रगत देशांपेक्षा किमान २० वर्षांनी मागे आहे.”

दिल्ली मेट्रोवर विशेष प्रेम

भारतातील मेट्रोच्या प्रगतीबद्दल बोलताना श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रोला विशेष पसंती दिली. श्रीधरन म्हणाले, “दिल्ली मेट्रोने देशासमोर एक उत्तम आणि कार्यक्षम उदाहरण घालून दिलं आहे. देशभरात मेट्रोची क्रांतीच सुरू केली आहे. अवघ्या २० वर्षांच्या कालावधीत दिल्ली मेट्रोने तब्बल २६० किलोमीटरचं जाळं उभं केलं आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रो जगभरातली सर्वाधिक वेगाने पसरणारी मेट्रो प्रणाली ठरली आहे.”

- Advertisement -

कोण आहेत इ. श्रीधरन?

भारतीय अभियांत्रिकी सेवा अर्थात आयईएस अधिकारी असणारे इ श्रीधरन यांचा कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो उभारणीमध्ये सिंहाचा वाटा आहे. भारतीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यात त्यांचं उल्लेखनीय योगदान राहिलं आहे. दिल्ली मेट्रोचं संपूर्ण जाळं उभं करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना ‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. १९९५ ते २०१२ या कालावधीत इ. श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलं आहे. २००१ मध्ये त्यांना पद्मश्री तर २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -