सचिन पायलट गटाचे परतीचे मार्ग बंद करा; काँग्रेस आमदारांची मागणी

आम्ही लोकशाहीचे योद्धे आहोत, ही लढाई जिंकणार, गेहलोत यांचं प्रतिपादन

sachin pilot

राजस्थानमध्ये सुरु असलेला सत्तासंघर्ष अद्याप संपलेला नाही. सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडखोरीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील सरकारवरचं संकट अद्याप टळलेलं नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत त्यांच्या गटातील आमदारांना सोबत ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. आमदारांच्या सतत बैठका घेत आहेत. रविवारी देखील विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत सचिन पायलट यांच्या गटावर कारवाई करण्याची मागणी आमदारांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जैसलमेरमध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सचिन पायलट गटातील बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची मागणी आमदारांनी केली आहे. बंडखोर आमदारांबाबत कोणतीही चर्चा किंवा पक्षात परत बोलवण्याबाबत प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने पक्षाच्या हाय कमांडसमोर चर्चा होणार नसल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, पायलट यांचा परतीचा मार्ग बंद झाला आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

आम्ही लोकशाहीचे योद्धे आहोत, ही लढाई जिंकणार – गेहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी आमदारांना आतापर्यंत जी एकता दाखवली आहे तीच एकता विधानसभेत दाखवण्यास सांगितली आहे. जैसलमेर रिसॉर्टमध्ये कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष आणि पाठिंबा देणार्‍या पक्षांच्या सभेला संबोधित करताना गेहलोत म्हणाले, आम्ही सर्व लोकशाहीचे योद्धे आहोत. आम्ही ही लढाई जिंकणार आहोत आणि साडेतीन वर्षानंतर निवडणूक जिंकू.