पार्टीत दारू संपल्यावर सॅनिटायझरने भागवली नशा; ७ जणांचा मृत्यू, दोघे कोमात

hand sanitizer drinking
प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हँड सॅनिटायझर एक प्रभावी शस्त्र म्हणून पुढे आले. जगभरात सॅनिटायझरचे महत्त्व वाढले.
अल्कोहोलच्या माध्यमातून तयार होत असलेल्या या सॅनिटायझरचा वापर नशेसाठी करण्यात आल्याचे उदाहरणे देखील अनेक ठिकाणी घडले आहेत. रशियातून एक धक्कादायक बातमी आली आहे. पार्टीसाठी जमलेल्या ९ जणांनी रात्री दारू संपल्यानंतर आणखी नशा करण्यासाठी सॅनिटायझर प्राशन केले. नशेसाठी वापरलेले सॅनिटायझर या नऊ लोकांसाठी विष ठरले आहे. कारण यानंतर सात जणांचा मृत्यू झाला असून दोघे जण कोमात गेले आहेत. रशियाच्या तातिन्सकी जिल्ह्यातील तोमतोर या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

डेली मेल या वेबसाईटने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. दारूड्यांना आणखी दारू हवी असली की ते कोणत्या थराला जातील, याचा कोणताही नेम नसतो. काही महिन्यांपुर्वी लॉकडाऊनमध्ये दारू मिळत नसल्यामुळे तामिळनाडूतील काही कामगारांनी केमिकलचे रंग प्यायल्याची बातमी आली होती. या घटनेत सदर कामगारांचा मृत्यू झाला होता. नशेसाठी नको ती गोष्ट प्राशन करण्याची पद्धत गरिबच नाही, तर रशियासारख्या प्रगत देशातील उच्चशिक्षित नागरीकही अवलंबत असतात. याचेच सर्वांना आश्चर्य वाटत आहे. तोमतोर गावात रंगलेल्या पार्टीत अर्ध्या रात्री दारू संपल्यानंतर कुणाच्यातरी डोक्यात सॅनिटायझरने नशा करण्याची कल्पना आली आणि तिथेच घात झाला. सॅनिटायझरमध्ये ६९ टक्के
मिथेनॉल असल्यामुळे आधीच नशेत असलेल्या तिघांचा गावातच मृत्यू झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे.

सॅनिटायझर प्यायल्यानंतर सर्व लोक बेशुद्ध पडले होते. ही बातमी गावात पसरल्यानंतर इतर लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये
नेण्यासाठी मदत केली. सहा लोकांना एअरक्राफ्टच्या मदतीने याकुत्स्क शहरातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे
पोहचेपर्यंत आणखी चार लोकांचा मृत्यू ओढवला होता. तर इतर दोघेजण कोमात गेले होते. यानंतर सॅनिटायझरमुळे विषबाधा झाल्याच्या गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेनंतर रशियन सरकारने सॅनिटायझर पिऊ नका, असे आवाहन केले आहे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल आणि इतर हानिकारक घटक असल्यामुळे शरिराला त्याचा अपाय होऊ शकतो. रशियामध्ये आतापर्यंत २० लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी २५ हजार ७७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.