जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधत सेनेची कारवाई; ३ जवान शहीद

All indian army air force and security forces bases in jammukashmir asked to be on high alert
प्रातिनिधिक छायाचित्र

जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सैन्य दलाने कारवाई करायला सुरुवात केली आहे. काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये LOC वर हे ऑपरेशन सुरु आहे. या कारवाईत सैन्य दलाचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. दोन जवानांपैकी एक बीएसएफ दलातील जवान आहे. भारतीय सैन्यांनी एलओसीवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत दोन घुसखोरांना मारण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.

शनिवारी रात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. भारतीय सैन्याला जशी याची माहिती मिळाली, तसे जवानांनी ऑपरेशनची सुरुवात केली. यावेळी झालेल्या चकमकीत दोन घुसखोर मारले गेले आहेत. सेनेच्या केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. मात्र या कारवाईदरम्यान सेनेचा एक अधिकारी, एक जवान आणि बीएसएफचा एक जवान दुर्दैवाने शहीद झाला. तसेच एक जवान जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलत सेनेने विशेष कंमोडो पथकाला पाचारण केले आहे. घुसखोराविरोधात आता एक मोठे ऑपरेशन सीमारेषेवर सुरु आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार माछिल सेक्टरच्या कारवाईत काँस्टेबल सुदीप सरकार यांना वीरगती प्राप्त झाली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांविरोधात आता भारतीय सैन्य दल आणि सीमा सुरक्षा दल यांची संयुक्त कारवाई सुरु आहे.

शनिवारी रात्री माछिल सेक्टर येथे गस्तीवर असलेल्या भारतीय सैन्यांना सीमेवर संशयास्पद हालचाल दिसून आली होती. दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे लक्षात येताच जवानांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. गुप्तहेर आणि सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार काश्मीरच्या खोऱ्यात बर्फवृष्टी वाढू लागली आहे. पुढच्या काही दिवसांत खोरे पार करणे अवघड होणार असल्यामुळे घुसखोर आताच सीमा ओलांडण्याचा प्रयत्नात आहेत. त्यामुळे भारतीय सैन्यही दक्ष असून आम्ही घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.