‘लागिरं झालं जी’ मालिकेत ट्विस्ट; शीतल सैन्यात भरती होणार

लोकप्रिय मालिका लागिरं झालं जी लवकरच घेतेय प्रेक्षकांचा निरोप.

Mumbai
lagira jhala ji serial end soon
लागिरं झालं जी मालिकेत नवा ट्विस्ट

मालिकांमधील कथा रटाळ होवू लागल्यावर प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवतात. त्यानंतर त्या मालिका गुंडाळण्यात येतात. अशावेळी अनेकदा मालिकांचा शेवटही प्रेक्षकांच्या पचनी पडत नाही. अशीच एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. देशप्रेमासाठी देशसेवेत वाहून घेतलेल्या तरूणाला त्याच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीत त्याची पत्नी कशी साथ करते, जवळपास असेच कथानक असलेली लागिरं झालं जी ही मालिका काही दिवसातच समाप्त होत आहे. पण मालिकेचा गाशा गुंडाळतानाही प्रेक्षकांना ही मालिका सदैव आठवणीत राहावी असाच या मालिकेचा शेवट करण्याचा प्रयत्न मालिका निर्मात्यांचा आहे.

अजिंक्य जीवंत असल्याची शीतलला खात्री

लागिरं झालं जी मधील शीतल आणि अजिंक्यची जोडी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मात्र मुख्य आशय सोडून मालिका भरकटल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून येवू लागली आहे. त्यामुळे मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. सध्या मालिकेत शीतल गरोदर असून तिच्या डोहाळे जेवणाच्या दिवशीच अजिंक्य बेपत्ता असल्याचा सैन्याकडून फोन येतो. अजिंक्य गावी सुद्धा नसल्याने घरातील सर्वजण त्याची शोधाशोध सुरू करतात. मात्र तो सापडत नाही. दरम्यान शीतलला मुलगा होतो. बराच कालावधी उलटल्यानंतर अजिंक्य जीवंत नसल्याचे घरातील लोकांना वाटू लागते. पण शीतलला अजिंक्य जीवंत असल्याची खात्री असते.

शीतलच्या सैन्य भरतीने मालिकेचा शेवट

तेव्हा अजिंक्यचं सैन्याचं स्वप्न अर्धवट राहू नये यासाठी शीतल स्वतः सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेते. आपल्या मुलाचा सांभाळ करत शीतल भरती सैन्यात भरती होते आणि ट्रेनिंग पूर्ण करते. शीतल सैन्यात भरती झाल्यानंतर अचानक एके दिवशी सैन्याकडून अजिंक्यचा पत्ता लागल्याचा फोन येतो. तो पाकिस्तानमध्ये बंदी असून त्याला भारत सरकार परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे लवकरच अजिंक्य पुन्हा भारतात येईल, असे सैन्याकडून सांगण्यात येते. त्यानुसार अजिंक्यची सुखरूप सुटका होवून तो पुन्हा भारतात येतो. यावेळी शीतल भारतीय सैन्याच्या वर्दीमध्येच अजिंक्यचं स्वागत करते. वर्दीतील शीतलला पाहून अजिंक्यला खूप आनंद होतो. ग्रामस्थ दोघांचंही जंगी स्वागत करतात. २२ जून रोजी लागिरं झालं जी प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्या जागी मिसेस मुख्यमंत्री ही नवी मालिका सुरू होणार आहे.