घरमनोरंजनस्वप्न पाहायला वय, वेळेचं बंधन नसतं

स्वप्न पाहायला वय, वेळेचं बंधन नसतं

Subscribe

’पुष्पक विमान’ या चित्रपटासोबत जिच्या करिअरनेही टेक ऑफ घेतलं अशा नवोदित अभिनेत्री गौरी किरण हिने आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव घेतला आहे. लहान मोठ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवणार्‍या गौरीला अखेर सिनेक्षेत्रात येण्याची आणि स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि उत्तम अभिनय करून तिनं त्याचं सोन केलं. कोकणातून आलेल्या गौरीने खंबीरपणे मुंबईसारख्या शहरात वास्तव्य करून आपल्या स्वप्नांना वाट मिळवून दिली. त्यासाठी घेतलेले अपार कष्ट, मेहनत आणि चिकाटी ही तिच्या बोलण्यातून सातत्याने जाणवते. स्वप्नांची नगरी मुंबईत आपल्या पंखांना बळ देताना गौरीने गावाशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही, हे विशेष. अभिनेत्री गौरी किरण हिने ’आपलं महानगर’च्या वाचकांसोबत साधलेला संवाद.

२०१० साली मी मुंबईत आले. माझं ठरलं होत की मला अभिनय क्षेत्रातच यायच आहे. गावाकडे कॉलेजमध्ये असताना मी फुल नौटंकी करायचे. कॉलेजच्या एका मैत्रिणीने जबरदस्तीने एका नाटकासाठी ऑडीशन द्यायला लावली. एका म्हातारीचा रोल होता. सुरुवातील मी नाही म्हणाले. पण नंतर तिने मला ऑडीशन द्यायला भाग पाडलं आणि ती भूमिका मी साकारली. ती एक हिंदी एकांकिका होती. मुंबईत युथ फेस्टिव्हलमध्ये आम्ही ती सादर केली. तेव्हापासून एकांकिकांची आवड मला निर्माण झाली. कोकणातील दापोलीच्या २० किलोमीटर आत वेरळ नावाच माझं गाव आहे. माझ्या आईला या सर्व गोष्टींची खूप आवड आहे. डान्स, नकला, अभिनय माझी आई उत्तम करते. तिच्याकडूनच ही कला माझ्यात रुजली.

गावातील हनुमान मंदिरासमोर सांस्कृतीक कार्यक्रम करायला सुरुवात केली. स्वतःच गाण्यांवर डान्स बसवून संतोष पवारच्या नाटकांवर तालमी करून ते आम्ही गावकरीच सादर करू लागलो. त्यानंतर कॉलेजमध्ये नाटकं, एकांकिका करू लागले. दरम्यान, माझ्या कॉलेजचे प्रिन्सिपल निंबाळकर सर त्यांनी मला पत्रकारिता करण्याचा सल्ला दिला. पण माझं ठरलं होत अभिनय क्षेत्रातच यायच. त्यासाठी मी अभिनेता जयंत घाटे यांचे मार्गदर्शन घेतलं. त्यांनी मला सांगितलं की यासाठी मुंबईत येऊन राहावं लागेल. तसे मी आठ वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि आल्या आल्या पत्रकारितेसाठी अ‍ॅडमिशन घेतलं. त्यादरम्यान भीमराव मोडे यांच ’रिंग रिंग रंगा’ हे नाटक केलं. त्याचे बरेच प्रयोग केले. एक चित्रपट केला. जो रिलीज झाला नाही. मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. पण हे करताना आर्थिक पाठबळ काहीच नव्हतं. दुसरीकडे नवीन शहरात एका नातलगाच्या घरी नालासोपार्‍याला राहू लागले. नंतर काही मुलींसोबत शेअरिंगमध्ये राहू लागले. आर्थिक पाठबळाचा विचार सतावू लागला. अभिनय क्षेत्रात कधी पैसे मिळायचे तर कधी नाहीत. मग मी पर्याय निवडला की काही काळासाठी नोकरी करुया आणि नंतर आपल्या पहिल्या प्रेमाकडे वळूया. मात्र त्यानंतर ४ वर्ष मी पत्रकारितेत काम केलं. या दरम्यान प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया सर्व माध्यमांमधून कामं केली. या सगळ्याची मला माझ्या अभिनय क्षेत्रासाठी खूपच मदत झाली.

- Advertisement -

चार वर्षांपूर्वी माझं लग्न झालं तो माझा आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर, ’तू तुझी स्वप्न पूर्ण कर आता पैशांसाठी म्हणून तुझी स्वप्न बाजूला सारू नकोस’ असं पतीने सांगितल्यानंतर मी पत्रकारितेकडून अभिनयाकडे वळले. पण तोवर पत्रकारितेने खूप काही शिकवलं होत. या क्षेत्रात काम केल्यामुळे मला बिनधास्त होता आलं. मुंबईतील रस्ते समजले. लोकांनी संवाद साधता आला. स्वतःच्या पायावर ठामपणे उभं राहता आलं. मुंबईत येऊन आठ वर्ष झाली होती. माझ अभिनय क्षेत्रात येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी इथे आले होते. त्यासाठी वेगवेगळे जॉब केले. जिथे मिळेल तिथे नोकर्‍या केल्या. कसेबसे पैसे मिळवले. पण अभिनय क्षेत्रात येण्याची माझी ओढ कमी नाही झाली. अशावेळी ’पुष्पक विमान’ या चित्रपटाची संधी माझ्याकडे आली. या सिनेमाची कॉस्च्युम डिझायनर अश्विनी कोचरेकर हिने मला फोन करून ऑडिशनला जाण्याचा सल्ला दिला. आधीच माझ्याकडे ऑडिशनचा मॅसेज आला होता. पण मी जाण्याचा कंटाळा केला होता. त्याच ऑडिशनसाठी मला अश्विनीने सांगितलं होत. त्यामुळे संधी तुमच्याकडे कशी चालून येईल. हे काही सांगता येत नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव चिंचळकर त्यांनी मला एक स्क्रीप्ट दिली आणि अनेक पद्धतीने बोलून दाखवण्यास सांगितली. सव्वा महिना हे ऑडीशनच काम सुरू होतं. त्यानंतर मला ही भूमिका मिळाल्याचे त्यांनी सांगितले. झी स्टुडिओचा इतका मोठा प्रोजेक्ट, मंजिरी भावे यांनी निर्मिती, कट्ट्यार काळजात घुसलीची संपूर्ण टीम, ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी आणि अभिनेता सुबोध भावे, संपूर्ण संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळी यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. याचा खरचं आनंद होत आहे.

या पुष्पक विमानाने छान टेक ऑफ घेतलंय आणि त्याच्यासोबत माझ्या करिअरचेही टेक ऑफ चांगल्या पद्धतीने होईल, अशी आशा आहे. गेल्या आठ वर्षांपासून मुंबईत राहतेय, स्ट्रगल करतेय. जे करायच होत ते आता करायला मिळतयं आणि त्याची कुठेतरी चांगली सुरुवात पुष्पक विमान या सिनेमातून झाली याच समाधान आहे. या चित्रपटात मोहन जोशी यांच्या नातसुनेची भूमिका मी साकारली आहे. त्यांच्यासमोर काम करण्याच खूप दडपण मला आलं होत. मात्र सुबोध भावेच्या बाबतीत अस झालं नाही. यापूर्वी अनेकदा त्यांची मुलाखत, भेट झाल्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यात एक सहजता आली होती. अभिनय क्षेत्रातील नाटक हे माझ पहिलं प्रेम. अजूनही थिएटरमध्ये प्रेक्षकांसमोर उभं राहताना पोटात जो गोळा येतो, तो अनुभवायला मला आवडतं. त्याशिवाय सिनेमा, मालिका या कशाचंच मला वावडं नाही. तुम्ही कायम प्रेक्षकांना दिसत राहणं हा या क्षेत्राचा धर्म आहे. हे सर्व सुरू असताना जशी मला नवर्‍याची साथ मिळाली. तशीच साथ माझ्या आई आणि सासू (आई) यांचीही लाभलेली आहे. माझ्या यशामागे पुरूष आहे हे नक्की पण मुख्य म्हणजे दोन स्त्रीया आहेत एक आई जिने या क्षेत्राची सुरुवात करून दिली आणि दुसरी सासू त्यांनी खूप पाठबळ दिलं. आपल्या घरात आलेली मुलगी ही खरच आपली मुलगी आहे, हे मानून तिला समजून घेण हे सोपं नाही. हे सासू यांच्यामुळेच शक्य झालं. माझ्या यशामागे सासरच्या सर्वांचाच खूप मोठा वाटा आहे. मुळातच कोकणात, गावाकडे माझं बालपण गेल्यामुळे तिकडच्या माझ्या बर्‍याच गोड आठवणी आहेत. गाईच दूध काढणं, गणपती रंगवणं या आनंदी क्षणांची याची नेहमीच आठवण येते. आमची गणपतीची मूर्तीशाळा आहे. सातवीत असताना पहिल्यांदा आमच्या गावी कॉम्प्रेसर आला होता. बाबांच्याही आधी मी तो वापरायला शिकले. त्यामुळे मीच ते १३० गणपती रंगवायचे. गणेशोत्सवात एकमेकांच्या घरी जाऊन झिम्मा खेळायचो. पत्ते खेळायचो. घरी मूर्ती घडवण्याचं काम असल्यामुळे आमच्याकडे दीडच दिवसांचा गणपती असतो. या उत्सवातील बरीच गाणी मला पाठ आहेत.

- Advertisement -

महानगर आणि मी

मुंबईने मला प्रचंड आत्मविश्वास दिला आहे. पदोपदी अडचणी आल्या पण प्रत्येक वेळी कोणी न कोणी मदतीला आलं. इकडे स्ट्रगल सुरू असताना तिकडे गावाकडे माझी माणसं माझ्यासाठी प्रार्थना करत होती. त्यांच्या शुभेच्छा माझ्यासोबत होत्या. मुंबईत चांगली माणसं मिळाली. सगळे एकमेकांना खूप मदत करतात. या शहराने जगण्याची ऊर्जा दिली. टिकून राहण्यासाठी खूप मोठी स्पर्धा दिली. मी रोज या स्पर्धेत उतरते आणि काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करते. या शहरातील अशा लोकांसाठी काम करायला आवडेल ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही. स्वप्न बघून जे लोकं इथे येतात पण जगण्यासाठी जागेची धडपड करावी लागते ते पाहिल्यावर त्रास होतो. अशा लोकांसाठी काम करायला आवडेल.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -