घरमनोरंजन‘गो गोआ गॉन’ :अतिशयोक्तीपूर्ण झॉम-कॉम

‘गो गोआ गॉन’ :अतिशयोक्तीपूर्ण झॉम-कॉम

Subscribe

राज अँड डीके हे प्रामुख्याने त्यांच्या विनोदाची झालर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि अनपेक्षितपणे गाजलेल्या चित्रपटांच्या लेखक-दिग्दर्शनासाठी नावाजले जातात. ‘शोर इन द सिटी’ ते ‘हॅप्पी एंडिंग’पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आणि टोकाचे चित्रपट त्यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले आहेत. सध्या ही दोन नावं ‘स्त्री’ या त्यांच्या सहलेखन आणि निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आहेत. भारतीय चित्रपटांमध्ये फारशा हाताळल्या न गेलेल्या हॉरर-कॉमेडी या प्रकारात ‘स्त्री’च्या निमित्ताने एका चांगल्या चित्रपटाची भर पडली आहे. मात्र ‘स्त्री’च्याही आधी याच दोघांचं लेखन-दिग्दर्शन असलेल्या आणखी एका चित्रपटाने हा प्रकार समर्थपणे हाताळला होता. तो चित्रपट म्हणजे ‘गो गोआ गॉन’.

‘झॉम्बी’ हा मॉन्स्टर प्रकार अस्तित्त्वात आल्यानंतर काही तांत्रिक चुकांमुळे सदर मॉन्स्टरच्या हक्कांना कुणा एका स्टुडिओचे बंधन राहिले नाही. कारण त्याचे स्वरूप कुणीही वापर करू शकतो अशा खुल्या स्वरूपाचे असल्याने सदर मॉन्स्टर्स कुणा एका स्टुडिओच्या चित्रपट मालिकेपुरते मर्यादित राहिले नाही. परिणामी हा मॉन्स्टर आणि चित्रपट प्रकार अस्तित्त्वात येऊन पन्नासेक वर्षे उलटल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकारचे नानाविध भाषांतील शेकडो चित्रपट आणि ‘द वॉकिंग डेड’सारखी सध्या नऊ सीजन्स पूर्ण केलेली मालिका असा भलामोठा सिनेमॅटिक पसारा आपल्याला अनुभवायला मिळाला आहे.

एकूणच चित्रपट या माध्यमाप्रमाणे या चित्रपट प्रकारालाही वेळोवेळी विकसित होत बदल करणं गरजेचं वाटत असतं. त्यातूनच ‘झॉम्बी-कॉमेडी’ ऊर्फ ‘झॉम-कॉम’ हा प्रकार सदर जान्रमधील चित्रपटांची सुरुवात झाल्यापासून नजीकच्याच कालावधीत अस्तित्त्वात आला. त्यातूनच ‘द रिटर्न ऑफ द लिविंग डेड’ (१९८५) ते दिग्दर्शक एडगर राइटची मॉडर्न क्लासिक ‘शॉन ऑफ द डेड’ (२००२) किंवा ‘झॉम्बीलॅन्ड’ (२०१३) सारख्या ब्लॅक कॉमेडी असलेल्या झॉम्बी-कॉमेडी फिल्म्स पहायला मिळतात. असं असलं तरी भारतीय चित्रपटसृष्टीत मात्र ‘भूलभुलैया’सारखे (२००७) सहज आठवणारे चित्रपट वगळता हॉरर कॉमेडी हा प्रकार तितकासा विकसित झालेला नाही. परिणामी भारतीय चित्रपटसृष्टीत झॉम्बी फिल्म्स आणि त्यातही पुन्हा झॉम-कॉमची सुरुवात व्हायलाही बरीच दशकं जाऊ द्यावी लागली. अर्थात ही सुरुवात ‘गो गोआ गॉन’च्या निमित्ताने उशिरा का होईना, पण प्रभावीपणे झाली हे उत्तमच.

- Advertisement -

हार्दिक (कुणाल खेमू), लव (वीर दास) आणि बनी (आनंद तिवारी) हे तिघेही सहकर्मचारी-कम-रूममेट्स आहेत. हार्दिक आणि लव हे बेजबाबदार आणि मद्य, ड्रग्ज आदी व्यसनाधीन आहेत आणि बहुतेक वेळ ‘हाय ऑन ड्रग्ज’ रीतीने आपल्याच फ्लॅटवर पडीक असतात. एके दिवशी हार्दिक काही कारणास्तव त्याची नोकरी, तर लव त्याची प्रेयसी गमावून बसतो. दुसरीकडे बनीला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी गोव्याला जायची संधी मिळते. परिणामी वेगवेगळ्या तर्‍हेच्या दुःखात असलेले हे दोघे वास्तवापासून दूर पळण्यासाठी आणि मुख्य म्हणजे ‘गोवा’ या नावाला जोडून येणार्‍या ड्रग्ज आणि सेक्ससाठी बनीसोबतच गोव्याला निघतात. तिथे लवची भेट लुनाशी (पूजा गुप्ता) होते. तिच्याकडून त्यांना रशियन माफियाने आयोजित केलेल्या एका रेव्ह पार्टीची माहिती मिळते आणि ते अर्थातच त्या पार्टीला उपस्थित राहतात. इथून सगळ्या गोष्टी बदलू लागतात आणि बॉरिस (सैफ अली खान) या रशियन माफियाने आणलेल्या एका ड्रगमुळे झॉम्बी अपॉकलिप्सची सुरुवात होते. एकूणच ‘गो गोआ गॉन’चं कथानक हे अगदीच मूलभूत स्वरूपाचं आणि स्टँडर्ड झॉम्बी अपॉकलिप्स चित्रपटासारखं आहे. खासकरून जेव्हा या चित्रपट प्रकारातील भलामोठा कंटेंट समोर असताना कथानकाच्या पातळीवर तो वेगळं काही ऑफर करत नाही. मात्र ही उणीव इथे संवादलेखन आणि सदर कथेच्या हेतूपुरस्सररित्या अतिशयोक्तीपूर्ण असलेल्या विनोदी स्वरूपाच्या एक्झिक्युशनच्या रूपात भरून काढली जाते.

‘गो गोआ गॉन’ ही चतुर लोकांनी बनवलेली तितकीच चतुराईने बनवलेली फिल्म आहे. त्यामुळे आपण काय करत आहोत आणि ते याआधी करून झालं आहे का याची खात्री बाळगायची जाणीव निर्मात्यांना आहे. परिणामी चित्रपटाचं जग उभारताना ‘द वॉकिंग डेड’ किंवा ‘शॉन ऑफ द डेड’ किंवा इतर कुठल्याही चित्रपटात घडतं तसं या चित्रपटातील पात्रं असणार्‍या झॉम्बी फिल्म्स बनल्याच नाहीत, असं म्हटलं किंवा दर्शवलं जात नाही. त्यामुळे चित्रपटाचे लेखक उपरोक्त चित्रपटांतील संकल्पना अगदीच निर्धास्तपणे समोर आणून पात्रांच्या तोंडी ‘किसी फिल्म में देखा था’ असं वाक्य घालतात. ज्यामुळे सदर चित्रपट प्रकारात अभारतीय चित्रपटांमध्ये आधीच करून झालेल्या गोष्टी समोर आणताना उचलेगिरीचा आरोप होणं टळतं आणि झालंच तर अशा चतुराईनं केलेल्या मांडणीमुळे निर्मात्यांचं कौतुक होतं.

- Advertisement -

‘गो गोआ गॉन’ कुठल्याही अर्थाने झॉम्बी अपॉकलिप्स किंवा झॉम्बी कॉमेडी प्रकारातील क्रांतिकारक चित्रपट नाही. पण तो हॉरर कॉमेडीच्या अंगाने विचार करता नक्कीच प्रभावी आहे. त्याचं खरं मर्म हे त्यातील शब्दच्छल असणारे संवाद आणि स्लॅपस्टिक कॉमेडी यात आहे. याखेरीज तो हा जान्र आणि स्लॅकर फिल्म हे चित्रपट प्रकार भारतीय चित्रपटसृष्टीत कुठलाही गंड न बाळगता आणतो, हेही महत्त्वाचं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -