घरमनोरंजनस्वप्नपुर्तीची सुरेख गुंफण- आनंदी गोपाळ

स्वप्नपुर्तीची सुरेख गुंफण- आनंदी गोपाळ

Subscribe

आजवर कादंबरीवर,अनेक गाजलेल्या साहित्यकृतीवर बेतलेले चित्रपट गेल्याकाही वर्षांत सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीला आले. पण तो तयार प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोच असं नाही. कुठे साहित्यातील काळ चित्रपटात कमी पडतो, तर कुठे कथानक भरकटल्यामुळे सिनेमा फसतो; पण स्वातंत्र्यपूर्व काळ, त्याला उत्तम कथेची जोड आणि दिग्दर्शकाने योग्य तेवढंच घेतलेलं स्वातंत्र्य याचं योग्य उदाहरण म्हणजे ‘आनंदीगोपाळ’ .

एकोणिसाव्या शतकात भारतीय महिलांना घराबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नव्हते. या काळात आनंदीबाईसारख्या एका धाडसी, ध्येयनिष्ठ मुलीने १८ व्या वर्षी बोटीने अमेरिका गाठले. तिथे राहून डॉक्टरी मिळवली आणि इतिहास घडवला. हा क्षण सुवर्ण अक्षरात कोरला गेला. भारतातील पहिली महिला डॉक्टर असं अभिमानाने आज २१ व्या शतकातही ज्यांचं नाव घेतलं जातं त्या म्हणजे आनंदी गोपाळ जोशी. पण हे सगळं करणं त्या काळात सोप्पं नव्हतं. कारण त्याला कारणीभूत होती एकोणिसाव्या शतकातील सामाजिक, धार्मिक परिस्थिती. या सगळ्या परिस्थितीशी कशाप्रकारे आनंदीबाई आणि गोपाळराव यांनी सामना केला आणि आपली ध्येयपूर्ती गाठली हे सगळ्याच चित्रण तुम्हाला ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. एकदा हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.

- Advertisement -

लेखक श्री.ज.जोशी यांच्या १९७० साली प्रकाशित झालेल्या ‘आनंदी गोपाळ’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे. विक्षिप्त स्वभावाचे, पुढारलेले गोपाळराव आनंदीबाईंनी शिकावं यासाठी घेतलेले ध्यास रेखीवपणे चित्रपटात मांडला आहे. ज्या काळात बाईने उंबरठा ओलांडणं, नवर्‍याबरोबर बाहेर फिरायला जाणं, धर्म बुडवला असं मानलं जायचं त्या काळात गोपाळरावांनी आनंदीबाईंना ख्रिस्ती शाळेत आणि त्यानंतर एकटीला अमेरिकेत पाठवण्याचं धाडस दाखवलं. हा सगळा प्रवास चित्रपटात दाखवणं गोपाळरावांच्या प्रवासाइतकाच खडतर होता, मात्र दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी नेमकेपणाने मांडला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या प्रसंगापासून आनंदी गोपाळरावांबरोबर तुमचाही प्रवास सुरू होतो.

चित्रपटातील सुंदर सजण्यामागे यातील कलाकारांचा मोठा वाटा आहे. छोटी आनंदी (अंकिता गोस्वामी), मोठी आनंदी (भाग्यश्री मिलिंद) या दोघींची कामं सुरेख झाली आहेत. तर थोडे विक्षिप्त स्वभावाचे गोपाळरावांची भूमिका ललित अक्षरश: जगला आहे. भाग्यश्री आणि ललितला उत्तम साथ मिळाली आहे ती इतर कलाकारांची. भूमिका जरी छोटी असली तरी ती सगळ्यांनीच उत्तमरित्या पार पाडली आहे. यात गोपाळरावांच्या मुलाची भूमिका साकारलेला अथर्व पंडीत लक्षात राहतो. त्यांच्या तोंडी वाक्यजरी कमी असली तरी ती खूप महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे गितांजली कुलकर्णी यांनी गोपाळरावांच्या सासूची भूमिका साकारली आहे. ही भूमिका फार मोठी नसली तरी गितांजली यांच्या अभिनयामुळे भूमिकेचा प्रभाव पडतो.

- Advertisement -

चित्रपट सुंदर साकारण्यामागे या दोन व्यक्तींची नावं ही घेतलीच पाहिजेत. ती म्हणजे या चित्रपटाचे कॅमेरामन आकाश अगरवाल आणि गीतकार वैभव जोशी. चित्रपटाची तांत्रिक बाजू खूप मजबूत आहे. एकोणीशेचा तो काळ डोळ्यांसमोर जशाच्यातसा उभा राहतो. चित्रपटातील प्रत्येक महत्त्वाचे प्रेम लक्षात रहाते. या सगळ्याचे श्रेय कॅमेरामन आकाश अगरवाल यांनाच आहे. तर सुरेख गाण्यांनी चित्रपटाची गुंफण झाली आहे. आनंदीबाई पहिल्यांदा ख्रिस्ती शाळेत जातात त्यावेळी असणारं ‘वाटा वाटा ग…चालीन तितक्या वाटा गं’ हे गाणं चपखल बसलं आहे. त्याचप्रमाणे इतर गाणी, पार्श्वसंगीत यामुळे चित्रपटाला गती प्राप्त झाली आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात गाणी यशस्वी झाली आहेत.

१८७५ ते १८८७ चा काळ, त्यावेळी असणार्‍या रूढी, परंपरा यांचा प्रचंड पगडा समाजावर होता. त्याकाळात अपमान, अवहेलना सहन करत आनंदीबाई जिद्दीने डॉक्टर झाल्या. आनंदीबाईंचा हा प्रवास प्रत्येकालाच प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यामुळे आनंदी-गोपाळ या दाम्पत्याचा संघर्ष अनुभवायचा असेल तर ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट नक्की बघा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -