घरमनोरंजन‘टच ऑफ इव्हिल’

‘टच ऑफ इव्हिल’

Subscribe

गेल्या दोन आठवड्यांत या सदरात ‘द माल्टीज फाल्कन’ आणि ‘द थर्ड मॅन’वरील लेखांच्या निमित्ताने तयार झालेल्या ‘फिल्म न्वार’वरील लेखत्रयीचा समारोप करावासा वाटतो. अर्थात, केवळ तीनच लेखांमध्ये सदर चळवळीचा इतिहास संपवणं तिच्यावर काहीसं अन्यायकारक असलं तरी या चळवळीदरम्यान वेगवेगळ्या कालखंडात प्रसिद्ध झालेल्या तीन महत्त्वाच्या चित्रपटांवरील विस्तृत लेख या आढाव्यासाठी पुरेसे आहेत असं वाटतं. ‘फिल्म न्वार’ चळवळीतील शेवटचा चित्रपट मानल्या जाणार्‍या ‘टच ऑफ इव्हिल’वरील (1958) हा लेख.

आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘बॉम्ब अंडर द टेबल’ तंत्राचा वापर करत, काहीएक मिनिटांत फुटणार्‍या टाइम बॉम्बची प्रतिमा समोर दाखवत एका लाँग टेकच्या माध्यमातून ज्या गाडीत तो बॉम्ब ठेवलेला आहे तिचा माग घेतला जातो. दरम्यान साडेतीन मिनिटं चालणार्‍या याच विस्तृत दृश्यात चित्रपटातील मुख्य भूमिकेतल्या नवविवाहित जोडप्याचा समावेश केला जातो. मेक्सिकन-अमेरिकन बॉर्डरवरून जात असलेली सुरुवातीला दिसलेली गाडी आणि दृश्यात समावेश झालेलं हे जोडपं या दोन्हींवर समप्रमाणात लक्ष केंद्रित करत असतानाच, गाडीत असलेल्या बॉम्बची कल्पना नसल्याने गजबजलेल्या भागातून गाडी नेण्यानं तणाव अधिकाधिक वाढत जातो. काहीशा गडद, शोकांतिक पद्धतीने हे दृश्य संपतं. ‘फिल्म न्वार’मधील काही आयकॉनिक दृश्यांपैकी एक असं हे दृश्य. जी केवळ कलात्मकता दाखवायची म्हणून केलेली गिमिक नव्हती, तर त्यात समोर घडत असलेल्या घटनेचं गांभीर्य आणि त्यातील गडदपणा, तणाव दाखवण्यासाठी मोठ्या चलाखीने केलेली परिणामकारक मांडणी होती.

या दृश्यात दिसलेलं जोडपं म्हणजे मेक्सिकन ड्रग एन्फोर्समेंट विभागातील अधिकारी माइक वर्गास (चार्लटन हेस्टन) आणि त्याची पत्नी सुझी (जेनेट ली). मेक्सिकन शहरातून सीमा पार करून अमेरिकेत गेल्यावर काहीच क्षणात फुटलेला बॉम्ब आणि गाडीत बसलेल्या जोडप्याची हत्या या प्रकरणाकडे साहजिकच वर्गासचं लक्ष जातं. सदर बॉम्ब मेक्सिकन हद्दीतून अमेरिकेत गेला असल्याने या तपासात मदत करणं त्याला आपलं कर्तव्य वाटतं. परिणामी अमेरिकन पोलीस अधिकारी हँक क्विन्लन (ऑर्सन वेल्स) आणि त्याचा सहकारी पीट मेंझीज (जोसेफ कलीइ) यांच्याकडे असलेल्या या तपासकार्यात वर्गासदेखील मदत करू लागतो. सदर प्रकरणात मेक्सिकन ड्रग माफिया आणि इतरही घटकांचा समावेश होत जातो आणि तसं पाहता अगदीच साध्या सोप्या भासणार्‍या या केसमध्ये काही कारणाने नैतिकता पणाला लागते. याच नैतिकदृष्ट्या योग्य ती कृती करण्याच्या तत्त्वाच्या निमित्ताने गडद वळणं घेणार्‍या गोष्टीचे चित्रण म्हणजे ‘टच ऑफ इव्हिल’.

- Advertisement -

व्हिट मास्टरसनच्या ‘बॅज ऑफ इव्हिल’ या पल्प नॉव्हेलवर आधारित असलेला ‘टच ऑफ इव्हिल’ सुरुवातीच्या काळात पल्प फिक्शन ट्रॅश म्हणून हेटाळला गेला असला तरी कालांतराने ‘फिल्म न्वार’मधील क्लासिक म्हणून ओळखला जाऊ लागला. यात ऑर्सन वेल्सचे कल्पक दिग्दर्शन, नाविन्यपूर्ण कॅमेरा अँगल्स, पात्रांची मानसिकता पडद्यावर येईल अशा रीतीने केलेली दृश्यांची स्टेजिंग, चित्रपटातील नैतिकतेच्या संकल्पना अशा बाबींचा महत्त्वाचा वाटा आहे.

‘टच ऑफ इव्हिल’ अनेक अर्थांनी एक सार्थ न्वार चित्रपट आहे. पोलीस यंत्रणेचा एक भाग असलेला मानसिक द्वंद्वात अडकलेला नायक, गडद चित्रण, चित्रणाची नाविन्यपूर्ण शैली अशा ‘फिल्म न्वार’च्या वैशिष्ट्यांचा यातील समावेश चित्रपटाला गडद छटा आणि काहीशी निराशावादी, तात्त्विक बैठक प्राप्त करून देतो. वर्गासची ठाम, नैतिकदृष्ट्या योग्य असलेली मतं त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण प्राप्त करून देतात, ज्यातून तो बाहेर पडतो की नाही याची खात्री नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. असं असलं तरी तो कायद्याच्या अखत्यारित काम करत योग्य ते निर्णय घेणं हे आपलं इतिकर्तव्य मानतो. तर आपल्या आयुष्यातील जुन्या शोकांतिक घटनांची पुनरावृत्ती टाळता यावी, कुठलाही गुन्हेगार मोकळा सुटू नये हा अट्टाहास असलेला क्विन्लनदेखील एक सामर्थ्यवान पात्र म्हणून उभा राहतो. त्याची ही कृती त्याला एक उत्तम डिटेक्टिव्ह बनवत असली, तरी तितका चांगला माणूस बनवत नाही एवढं नक्की. आणि खरंतर यातच चित्रपटाचं मर्म दडलेलं आहे. ते म्हणजे ‘टू डू द राईट थिंग’ अर्थात योग्य ती कृती करणं जितकं महत्त्वाचं आहे, ती बाब योग्य त्या मार्गांनी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -