घरमनोरंजनवैशंपायनच गायन गौरवशाली

वैशंपायनच गायन गौरवशाली

Subscribe

वैशंपायन गमरे तसा नृत्य कलाकार. काही कार्यक्रमांचे नृत्य दिग्दर्शनही त्याने केले. ‘एकता ग्रूप’ मधून नर्तक म्हणून कितीतरी कार्यक्रमांचे प्रयोगही केलेत. युवक बिरादरीच्या ‘पुण्यतिर्थ’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतभर प्रवास करत असताना अमेरिकेतही आपला अभिनय प्रभाव त्याने दाखवलेला आहे. ‘पुण्यतिर्थ’ चे आठशेच्या आसपास त्याने प्रयोगही केलेले आहेत. हे करत असताना वयाप्रमाणे, वलयांकीत नावाप्रमाणे काही जबाबदार्‍याही त्याने स्वीकारल्या. गायक, निवेदक, निर्माता अशा या प्रवासात ‘सद्भावना’ ही संस्थाही त्याने स्थापन केली. महाराष्ट्राबरोबर भारताच्या लोककलेचा प्रवास नृत्यातून, गाण्यातून उलगडेल हे त्याने पाहिले. त्याचे हे कार्य एवढ्यापुरतेच सिमित न राहता ‘रंग माझ्या भिमाचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांनी मांडलेले विचार थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम तो करतो. युवक बिरादरीने त्याचे हे योगदान लक्षात घेऊन ‘जीवनगौरव पुरस्कारा’ ने त्याला सन्मानीत केलेले आहे.

शासनाच्यावतीने संगीत नाटकांची स्पर्धा घेतली जाते. त्यात पुरस्कार मिळवणार्‍यांच्या यादीत वैशंपायनचे नाव हमखास असते. अखिल भारतीय नाट्य परिषदेने त्याच्या या कार्यासाठी त्याला पुरस्कार देऊन त्याचा यथोचित गौरव केलेला आहे. परंतु जीवनगौरव पुरस्काराने त्याची जबाबदारी वाढवलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे नेते असा काहीसा प्रचार झपाट्याने होत आहे. ते वैशंपायनला मान्य नाही. त्यांनी सर्वच जातीधर्मांसाठी काम केलेले आहे ते अधोरेखित व्हावे यासाठी स्वत: संशोधन करून ‘रंग माझ्या भिमाचा’ हा कार्यक्रम केलेला आहे. प्रेक्षकांकडून एक अभिनव संकल्पना म्हणून या कार्यक्रमाचे स्वागत होत आहे. नृत्यरचना आणि निर्मिती यासाठी सुवर्णा भागवत हिचे सहकार्य त्याला लाभते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -