घरमनोरंजनकरून गेलो गाव मजेशीर करमणूक

करून गेलो गाव मजेशीर करमणूक

Subscribe

काही काळ विश्रांती घेतलेले ‘करुन गेलो गाव ’पुन्हा एकदा रंगभूमीवर दमदारपणे अवतरले आहे. राजेश देशपांडे यांनी हे नाटक लिहिताना आणि दिग्दर्शित करताना पडदा उघडल्यापासून ते अगदी शेवटची काही मिनिटे शिल्लक असेपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कोकणातले गाव तिथले अण्णा सरपंच(भाऊ कदम),त्यांची भरभक्कम बायको (उषा साटम), गंपू मास्तर (सागर कारंडे),गावातली इरसाल मंडळी ही पात्र रचना काहीशी ओळखीची. त्यात अपक्ष आमदार (संदेश उपशाम)गावात प्रकल्प आणून गावाचं भलं केलं असं भासवून पुन्हा निवडून येण्याचं स्वप्न पाहतो. प्रकल्पाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री प्रथमच गावात येणार तेव्हा त्यांच्या मनोरंजनासाठी गावातल्या लोकांचा पारंपारिक कार्यक्रम न ठेवता नटरंगी नाचाचा कार्यक्रम ठेवू पाहतो. आमदाराची ही खेळी यशस्वी होते का? नाटकातून कोणता संदेश दिला जातो. हे पाहण्या ऐकण्यासाठी नाटक प्रत्यक्ष पाहण्यात खरी मजा आहे.

नाटक पाहण्याची आणखीही काही कारणे आहेत. त्यापैकी भाऊ कदम आणि सागर कारंडे या जोडगोळीचा भन्नाट सहजाभिनय हे एक कारण आहेच. ही जोडी ज्या सहजपणे वावरते, वेळोवेळी जागा काढून प्रेक्षकांना सतत खळाळून हसायला लावते. भाऊ आणि सागरच्या चाहत्यांसाठी तर हे नाटक म्हणजे पर्वणीच आहे. उषा साटम,अंकुर वाढवे लक्षणीय आहेत.संदीप महाडीक, मुकेश जाधव, नुपूर दुधवडकर छान साथ देतात. अंकुश कांबळी यांचे नेपथ्य, शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, अजित परब यांचं पार्श्वसंगीत यामुळे नाटक अधिक प्रेक्षणीय होते. छान मनोरंजन करुन घेण्यासाठी नाटक अवश्य पाहावे.

- Advertisement -

निर्मिती-फाळकेज फॅक्टरीज, अश्वमी थिएटर
निर्माते-विनायक गवांदे, महेश पटेल, महेश मांजरेकर
कलाकार-भाऊ कदम, सागर कारंडे, नयन जाधव, अंकुर वाढवे, उषा साटम, स्नेहल कदम, नुपूर दुधवडकर, संदेश उपशाम, संदीप महाडीक, मुकेश जाधव, हरिष तांदळे.

दत्तात्रय सावंत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -