घरफिचर्ससरकारचा संयम आणि शाहीन बाग

सरकारचा संयम आणि शाहीन बाग

Subscribe

सीएए, एनआरसी या मुद्यांवरून शाहीन बाग, जामिया आणि अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीमधून कितीही धर्मांध, देशविघातक विचार मांडले गेले, कितीही १५ कोटी विरुद्ध १०० कोटींची भाषा केली गेली, तरी भारतातील हिंदू, बौद्ध, शीख, पारसी, जैन इत्यादी नागरिक सूज्ञ आहेत. हा देश हे नागरिक कधीही पेटवणार नाहीत. मोदी सरकारने बाळगलेला संयम हा खरोखरीच कौतुकास्पद म्हणावा लागेल. या आंदोलनावर बळाचा वापर न करता त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी आंदोलनामागील उद्देश सफल होत नाही, यातून देशभरात प्रक्षोभ निर्माण होत नाही, सरकारविरोधात जनक्षोभ उसळून येत नाही, जातीय दंगली भडकत नाहीत, हे पाहून या आंदोलनातील आता वारिस पठाण, अकबरुद्दीन ओवेसी, शर्जिल इमाम, फैजुल हसन इत्यादी हिंसक प्रवृत्ती समोर येऊन रागाच्या भरात या आंदोलनामागील सत्य बरळू लागले आहेत. परिणामी आता या आंदोलनामागील खरा उद्देश उघड होऊ लागल्यामुळे जनसामान्यांची याला मिळणारी सहानुभूती संपत चालली आहे, तसेच या आंदोलनामागील हिंसक उद्देशही समोर येऊ लागल्याने उलट या आंदोलनाप्रती जनसामान्यांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या ‘शिखर समागम’ या चर्चासत्रात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सीएए, एनपीआर आणि एनआरसी या तीन मुद्यावर ज्या प्रकारे युक्तिवाद केला, त्यानंतर या कार्यक्रमाची सूत्रसंचालक, एन्कर रुबिका लियाकत यांनी तिला प्रतिप्रश्न करणे सुरू केले. तेव्हा या आंदोलनामागे कोणताही मुद्दा अस्तित्वात नाही, तर केवळ देशभरातील मुस्लीम समुदायामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना भडकावणे हाच एकमेव उद्देश आहे, हे स्पष्ट झाले आहे. स्वरा भास्कर हिच्या म्हणण्यानुसार सीएए, एनपीआर आणि एनआरसी हे तीनही कायदे एकमेकांशी जोडलेले आहेत, एनआरसी देशभर लागू करण्यात येणार आहे, एनपीआरमुळे मुस्लीम समुदायासह हिंदूंचेही नागरिकत्व धोक्यात येणार आहे.

या सर्व मुद्यांवर सूत्रसंचालकांनी प्रतिप्रश्न केले. एनपीआर म्हणजे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना होय, ती नेहमी होणारी प्रक्रिया आहे, यातून कुणाचे नागरिकत्व धोक्यात येणार आहे?, एनआरसी केवळ आसाममध्ये लागू करण्यात आला आहे, तो देशभरात लागू करण्यात आलेला नाही, मग देशातील मुस्लीम समुदायाचे नागरिकत्व धोक्यात कसे येणार? सीएए कायद्याच्या माध्यमातून केवळ पाकिस्तान, बांगलादेश यांतील अल्पसंख्याकाना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे? यातून भारतातील मुस्लीम समुदायाचे नागरिकत्व कसे धोक्यात येणार आहे? तुम्ही एनपीआर, एनआरसीचा ड्राफ्ट वाचला आहे का? या सर्व प्रश्नांवर स्वरा भास्कर निरुत्तर झाली. देशभर ज्या मुद्यांना घेऊन शाहिन बागपासून, जामिया, अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीपासून ते अगदी मुंबईतील भेंडी बाजारपर्यंत ज्या ज्या ठिकाणी सध्या आंदोलने सुरू आहेत, त्या सर्वांचेच मुद्दे स्वरा भास्कर हिने या चर्चासत्रात मांडले होते, त्याला प्रतिप्रश्न केल्यावर स्वरा भास्करला उत्तरे देता आली नाहीत, तिचे सर्व मुद्दे खोटे, बिनबुडाचे, तकलादू आणि केवळ सरकारच्या विरोधात प्रक्षोभ निर्माण करणारे होते, हे सिद्ध झाले.

- Advertisement -

यावरून देशभरात सुरू असलेली आंदोलने ही खोटी, चुकीच्या, बिनबुडाच्या, तकलादू मुद्यांवर तसेच सरकारच्या विरोधात प्रक्षोभ निर्माण करण्यासाठीच सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे. हळूहळू आता वस्तुस्थिती समोर येऊ लागली आहे. प्रसार माध्यमेही दुसरी बाजू समजून घेऊन आंदोलनकर्त्यांना प्रतिप्रश्न करू लागली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी शाहीन बाग, जामिया या ठिकाणी कुठलाही बळाचा वापर केला नाही, आंदोलनकर्त्यांना जो काही धुडगूस घालायचा आहे तो घालू दिला आहे, २-३ महिने रस्ते बंद करू दिले आहेत. सरकारने पाळलेला संयम आज सरकारच्या हिताचा ठरू लागला आहे.

सरकारने येनकेन प्रकारे बळाचा वापर करावा आणि देशभर प्रक्षोभ निर्माण व्हावा, असा काही समाजकंटक संघटनांचा उद्देश होता, तो असफल होऊ लागला आहे. आज प्रसार माध्यमे या आंदोलनकर्त्यांना प्रतिप्रश्न विचारून त्यांना गप्प करू लागली आहेत, उद्या सर्वसामान्य जनता आंदोलनकर्त्यांना प्रतिप्रश्न करून गप्प करू लागेल. मोदी सरकारने जर असेच संविधानाच्या चौकटीत राहून या आंदोलनकर्त्यांना हाताळले तर या आंदोलनकर्त्यांचा संविधानद्रोह लवकरच उघड होईल. सरकारने संयम बाळगल्यामुळे देशभरात कानाकोपर्‍यात शाहीन बाग उभा करण्याचा मनसुबा उधळला गेला आहे.

- Advertisement -

सरकारने अजून असाच संयम बाळगला तर याच आंदोलनातील महिलांच्या मागे लपलेले हिंसक घटक अस्वस्थ होतील आणि आज एमआयएमचे नेते वारिस पठाण हे ज्या प्रकारे त्या अस्वस्थतेतून सत्य बरळले तसेच अन्यही हे आंदोलन उभे करण्यामागील सत्य उघड करतील. ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू’, या वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरून शाहीन बागपासून ते जामिया, अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी येथे सुरू असलेले आंदोलन हे १०० कोटी हिंदूंच्या विरोधात आहे, या आंदोलनासाठी जाणीवपूर्वक मुस्लीम महिलांना पुढे करण्यात आले आहे. त्यांच्यामागे हिंसक विचारधारा बाळगूण असलेले कोट्यवधी वारिस पठाण दबा धरून आहेत, हे स्पष्ट झाले आहे. याच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी हे नुकतेच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारामध्ये ‘मुसलमानांनी या देशावर राज्य केले आहे.

आम्ही शासन करणारे शासक आहोत, ८०० वर्षांमध्ये मुसलमानांनी या देशाला लाल किल्ला दिला, मुसलमानांनी या देशाला जामा मश्जिद दिली, चारमिनार, कुतुबमिनार दिले, तुम्ही काय दिले?’, ही भाषादेखील ‘१५ कोटींविरुद्ध १०० कोटी’ या वारिस पठाण यांच्यासारखीच होती. आयआयटी येथून शिकलेल्या उच्च पदस्थ शर्जिल इमाम हादेखील सीएए, एनआरसीच्या विरोधातील आंदोलनात भाषण करताना म्हणाला,‘५ लाख मुसलमान जर एकत्र आले तर काय करतील माहीत नाही. आसामला भारतापासून वेगळे करा, रस्त्यांवर इतका प्रक्षोभ उभा करा की, भारताचे सैन्य आसाम आणि पूर्वांचलापर्यंत पोहोचता कामा नये.’ त्यानंतर अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीतील एका प्रमुख विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष फैजुल हसन म्हणाला, ‘आमच्या धर्मयुद्धात जर आमचा सहनशीलतेचा अंत झाला, तर आम्ही असा जनसमुदाय आहोत की, कोणत्याही देशाला बरबाद करून टाकू.’ अशा प्रकारे एकामागून एक शाहीन बाग, जामिया, अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी पेटवणार्‍यांमागे हिंसक विचार काय आहेत, हे आता समोर येऊ लागले आहेत.

सीएए, एनआरसी या मुद्यांवरून शाहीन बाग, जामिया आणि अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीमधून कितीही धर्मांध, देशविघातक विचार मांडले गेले, कितीही १५ कोटी विरुद्ध १०० कोटींची भाषा केली गेली, तरी भारतातील हिंदू, बौद्ध, शीख, पारसी, जैन इत्यादी नागरिक सूज्ञ आहेत. हा देश हे नागरिक पेटवणार नाहीत. मोदी सरकारने बाळगलेला संयम हा खरोखरीच कौतुकास्पद म्हणावा लागेल. या आंदोलनावर बळाचा वापर न करता त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी आंदोलनामागील उद्देश सफल होत नाही, यातून देशभरात प्रक्षोभ निर्माण होत नाही, सरकारविरोधात जनक्षोभ उसळून येत नाही, जातीय दंगली भडकत नाहीत, हे पाहून या आंदोलनातील आता वारिस पठाण, अकबरुद्दीन ओवेसी, शर्जिल इमाम, फैजुल हसन इत्यादी हिंसक प्रवृत्ती समोर येऊन रागाच्या भरात या आंदोलनामागील सत्य बरळू लागले आहेत. परिणामी आता या आंदोलनामागील उद्देश उघड झाल्यामुळे जनसामान्यांची याला मिळणारी सहानुभूती संपत चालली आहे, तसेच या आंदोलनामागील हिंसक उद्देश समोर येऊ लागल्याने उलट या आंदोलनाप्रती जनसामान्यांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -