घरफिचर्सवंचितांच्या जीवनवास्तवाचे शोकात्म नाट्यचित्र !

वंचितांच्या जीवनवास्तवाचे शोकात्म नाट्यचित्र !

Subscribe

जागतिकीकरणानंतर देशात लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. तरीही शासनव्यवस्थेने कृषीप्रधान व्यवस्था मजबूत करण्याऐवजी भांडवली व्यवस्थेला उत्तेजन दिले. हेच विषयसूत्र घेऊन ‘सेझ’च्या नावाखाली शेती, शेतकरी आणि संबंध कृषिसंस्कृतीच संपविण्याचा घाट कसा घातला आहे, याचे वास्तव ‘GLOBAL आडगाव’ या पहिल्याच एकांकिकेतून अनिलकुमार साळवे यांनी मांडले आहे. शहरीकरणाचा विस्तार व उद्योगधंद्याच्या वाढीसाठी शेतकर्‍यांच्या पिकाऊ जमिनी कशाप्रकारे गिळंकृत केल्या जाताहेत आणि त्यामुळे शेतकरी कसा देशोधडीला लागलाय याचे प्रातिनिधिक चित्र यातून समोर येते.

जागतिकीकरणाने लादलेले कंगालीचे अर्थशास्र आणि पूर्वापार चालत आलेल्या विषमव्यवस्थेने आकाराला आलेल्या शोषणसिध्दांताने सर्वसामान्य माणसांचे जगणे चेहराविहीन झाले आहे. अशा शोषित-पिडित व अभावग्रस्ततेत जगणार्‍या समाजगटांचे पेच, तसेच वंचितांभोवतीच्या समकालीन वास्तवाचे वेदनांकित चित्र रेखाटणारा महत्वाचा रंगकर्मी म्हणून अनिलकुमार साळवे यांचा निर्देश करावा लागतो. त्यांचा मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील माजलगावसारख्या गावात दारिद्य्राशी लढणार्‍या कुटुंबात जन्म झाला. त्यांनी जातीव्यवस्थेचे चटके सहन करून जीवनसंघर्ष करत नाटककार, लघुचित्रपटकार, दिग्दर्शक, अभिनेता, शिक्षक व संशोधक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या अवतीभोवतीच्या दु:खभोगाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी ठरलेल्या चार लघुचित्रपटातून आणि चाळीस अप्रकाशित परंतु नाट्यप्रयोग झालेल्या एकांकिका, तसेच सहा नाटकांच्या माध्यमातून वाचा फोडली. सामाजिक जाणीवेचा प्रखर आविष्कार म्हणून त्यांचे नाट्यसर्जन मोलाचे ठरले आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील उपेक्षित समूहांचे जीवन त्यांच्या कलाविष्काराचे विषय झालेले आहेत. लेखन आणि प्रयोग अशा दोन्ही अंगांनी त्यांची अभिव्यक्ती सामर्थ्यशील आहे. समतेवर आधारलेल्या नव्या समाजरचनेची निर्मिती करू पाहणार्‍या महापुरूषांच्या विचारकार्याचा ठसा साळवे यांच्या लेखनावर आहे.

महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिकेच्या रा.शं.दातार सह अनेक पुरस्कारांनी गौरविलेल्या एकांकिकांचा ‘GLOBAL आडगाव व इतर एकांकिका’ हा त्यांचा पहिलाच प्रकाशित नाट्यसंहिता संग्रह यादृष्टीने लक्षणीय आहे. यात ‘GLOBAL आडगाव’, ‘शेख मुहम्मद मराठी माध्यम’, आणि ‘तिच्यासाठी वाट्टेल ते…’ या तीन एकांकिकांचा समावेश आहे. या तीनही एकांकिका जागतिकीकरणोत्तर काळातील उद्ध्वस्त होत जाणार्‍या ग्रामीण महाराष्ट्राचे शोकात्म नाट्यचित्र उभे करतात. याच काळात देशात नि महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. अजूनही सुरूच आहेत. याची कारणमीमांसा म्हणूनही या लेखनाची महत्ता अधोरेखित करता येईल. कृषिव्यवस्थेची होणारी पडझड आणि या व्यवस्थेतील माणसांच्या भोवती आवळले गेलेले अस्मानी-सुलतानी फास, त्यात त्यांची होणारी ससेहोलपट यांचा प्रत्ययकारी संघर्षात्मक आशय या नाट्यातून उजागर होतो. दहशतवाद, सेझ आणि बेकारी या प्रश्नांची दाहकता आणि त्यातील गुंतागुंतीचे विनाशकारी वास्तव यातून समोर येते.

- Advertisement -

शेती आणि शेतकरी वर्गाची लूट इतिहास काळापासून इतिहासबध्द झालेली आहे. त्यांच्या विवंचना छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा अपवाद सोडला तर कोणत्याच राजवटीला नि धोरणकर्त्यांना महत्त्वाच्या वाटलेल्या नाहीत. महात्मा जोतीराव फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या प्रश्नांसाठी केलेल्या चळवळी आणि लेखनाकडेही आमच्या राज्यकर्त्यांनी साफ दुर्लक्ष केले. शेती आणि शेतकरी हा वर्ग राजकीय खेळणी बनून अस्तित्त्वात राहिला. परिणामी जागतिकीकरणानंतर देशात लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. तरीही शासनव्यवस्थेने कृषीप्रधान व्यवस्था मजबूत करण्याऐवजी भांडवली व्यवस्थेला उत्तेजन दिले. हेच विषयसूत्र घेऊन ‘सेझ’च्या नावाखाली शेती, शेतकरी आणि संबंध कृषिसंस्कृतीच संपविण्याचा घाट कसा घातला आहे, याचे वास्तव ‘GLOBAL आडगाव’ या पहिल्याच एकांकिकेतून साळवे यांनी मांडले आहे. शहरीकरणाचा विस्तार व उद्योगधंद्याच्या वाढीसाठी शेतकर्‍यांच्या पिकाऊ जमिनी कशाप्रकारे गिळंकृत केल्या जाताहेत आणि त्यामुळे शेतकरी कसा देशोधडीला लागलाय याचे प्रातिनिधिक चित्र यातून समोर येते. या एकांकिकेचा नायक कौतिक कडुबा ढवळेच्या परवडीतून कृषिसंस्कृतीचा होणारा र्‍हास, दुष्काळ आणि पाण्याची भीषणता, त्याबद्दल सरकारची असणारी अनास्था दाखवतो. नापिकी आणि शेतकर्‍याचे कर्जबाजारीपण, पैसे नसल्याने शिक्षणाची होणारी हेळसांड-आजारपणाकडे होणारे दुर्लक्ष, सरकारी अधिकार्‍यांची वाढलेली मुजोरी याचा पर्दाफाश करतो. धर्मश्रध्दा-कर्मकांडे-अंधश्रध्दा यांचा ग्रामीण लोकमनावरील पगडा आणि शेतमालाचा भाव यासह अनेक प्रश्न अधोरेखित करतो. जागतिकीकरणाने शेतीवर अरिष्ट आणल्याचे सूचन ही एकांकिका करते.

‘शेख मुहम्मद मराठी माध्यम’ ही दुसरी एकांकिका दहशतवादाला केंद्रस्थानी ठेवून दहशतवादाच्या आरोपाने भयभित झालेल्या ग्रामीण कष्टकरी मुस्लीम कुटुंबाच्या मानसिक-सामाजिक संघर्षाचे जीवघेणे ताणेबाणे चित्रित करते. खेड्यातील मुस्लीम कुटुंबाचे दारिद्य्र आणि दहशतवादाच्या आरोपाने या कुटुंबाची झालेली वाताहात हे या एकांकिकेचे मुख्य कथासूत्र आहे. हे कुटूंब आणि समाज हा मध्यवर्ती संघर्ष आहे. देशात कुठेही दहशतवादी कृत्य घडले की त्याला धार्मिक रंग देऊन सर्व मुस्लीम समाजाला जबाबदार धरण्याच्या भारतीय मानसिकतेचा निषेध आणि निरपराध मुस्लीम व्यक्तिला पकडून आतंकवादी ठरवणार्‍या कृतीचे वास्तव ही एकांकिका ठळक करते. बेगुनाह असलेल्या मुहम्मदला आतंकवादी ठरवल्याने कुटुंबियांचा वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि गावकरी-समाज यांच्याकडून होणारा छळ, टीआरपीसाठी अर्धसत्य व संशय निर्माण करणार्‍या बातम्या देत वाहिन्यांनी घातलेला धुमाकूळ आणि ग्रामीण मुस्लीम समाजातील अशिक्षितपणाचे दर्शन यातून घडते. यासोबतच सर्वसमावेशक समाजवादी विचाराचे अस्तित्त्वही यातून ध्वनित होते.

- Advertisement -

भारत हा सर्वात तरूण देश म्हणून आज जगात ओळखला जातो. परंतु या तरूणाईच्या जीवावर देश महासत्ता होईल हे कलामांनी पाहिलेले स्वप्न स्वप्नच ठरले. बेकारीचा उचांक गाठलेल्या समकाळात तरूणांची शक्ती दिशाहिन झाली आहे. ही व्यवस्था त्याला रोजगार देऊ शकली नाही आणि त्याच्या उर्जेला विधायक मार्गालाही लाऊ शकली नाही, हे सत्य आहे. सरकारी-निमसरकारी नोकर्‍यांचे घटत जाणे, उपलब्ध नोकर्‍यातही धनदांडग्यांच्या वर्चस्वातून भ्रष्टाचाराने कळस गाठणे आणि गुणवत्तेच्या ऐवजी पैशाला महत्त्व येणे या वास्तवाला ‘तिच्यासाठी वाट्टेल ते…’ या एकांकिकेतून साळवे यांनी मुखरीत केले आहे. प्राध्यापक होऊ पाहणार्‍या शंकर या ग्रामीण तरूणाच्या व्यथेतून हे संविधानक उभे राहते. चाळीस ते पन्नास लाखापर्यंत गेलेल्या प्राध्यापकांच्या नोकरीच्या भावाची वर्तमान वस्तुस्थिती यातून समोर येते. शिक्षणाचे होणारे बाजारीकरण, गुणवत्ताधारकांचे झालेले अवमूल्यन-उपेक्षा, मराठवाड्यातील गुणवानांबद्दलचा आकस, संस्थाचालक-निवड समितीचे राजकारण आणि प्राध्यापकीचं स्वप्न उराशी बाळगून पैशाअभावी बेकार फिरणार्‍या तरूणाचे सार्वत्रिक चित्र यातून प्रकट होते. गुणवत्ता आणि भ्रष्ट व्यवस्था अशा मध्यवर्ती संघर्षसूत्रातून हे नाट्य घडते.

एकांकिकेचा अवकाश हा सिमित आणि लहान असतो. त्या अवकाशातून जीवनाच्या विशिष्ट तुकड्याचेच दर्शन घडवणे शक्य असते. पण साळवे यांच्या लेखनाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांनी छोट्या अवकाशी आकृतिबंधातूनही व्यापक आशयाला सामावून घेत वास्तवाच्या विविध कंगोर्‍यांना मुख्य कथासूत्राच्या कक्षेत आणले आहे. टोकदार सामाजिक आशय आणि सरळ-थेट अप्रयोगशील कथानक मांडणी, कथानकाला प्रवाहित करणारी नेमकी प्रवेशयोजना, पात्रांच्या व्यक्तिमत्त्वांचे प्रभावी विकसन व केलेले सूक्ष्म रेखाटन, नाट्याला गतिमान करणारा मध्यवर्ती संघर्ष आणि शोकात्म शेवटातून साधलेल्या परिणामकारकतेमुळे ही नाट्यानुभूती प्रभावी ठरते. ‘इस्कूल में जाता क्या, कुत्रे मारता किसको मालूम।’ किंवा ‘मप्ल काय ऐकायचं मनलं की कानाला खिंडार पडत्यात…’ यासारख्या मराठवाडी ग्रामीण हिंदी-मराठी बोलीचा लहेजा घेऊन आलेल्या अर्थपूर्ण संवादाने ही नाट्यकृती घटना-प्रसंगांना अधिक जिवंतपणाने साक्षात करते. मूल्यविचाराची सूचकता हाही महत्त्वाचा विशेष या लेखनाचा आहे.

मराठीत दलित रंगभूमीच्या माध्यमातून सशक्त नाट्यसंहितांची निर्मिती झाली. त्या पध्दतीने ग्रामीण रंगभूमी आणि नाट्य परंपरा घडली नाही. खरं तर आधुनिक मराठी रंगभूमीला ‘तृतीय रत्न’सारखे पहिले आधुनिक विचाराचे ग्रामीण नाटक देणार्‍या महात्मा जोतीराव फुले यांचा आदर्श आपल्यासमोर होता. परंतु ती परंपरा थेट जागतिकीकरणोत्तर काळापर्यंत प्रवाहित होऊ शकली नाही. मधल्या काळात ग्रामीण नाटके म्हणून जे लिहिले गेले ते रंजनाच्या-विनोदाच्या पातळीवरच जिरून गेले. म.फुले यांनी ग्रामशोषणाची जी जाणीव ठळक केली, त्या जाणीवेचे वारसदार म्हणून आज आकडाकार राजकुमार तांगडे आणि अनिलकुमार साळवे ही दोन नावे आश्वासक वाटतात. कृषिव्यवस्थेच्या बहुविध शोषणाचे समग्र आकलन, परिपक्व कलात्मक रंगभान आणि संवेदनशील सामाजिक रंगदृष्टी यामुळे या नाटककारांकडून ग्रामीण रंगभूमीला मोठ्या अपेक्षा आहेत. नाटक ही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गतिमान करणारी आणि सामाजिक प्रश्नांना ऐरणीवर आणणारी महत्त्वाची कृती असल्याचे भान या रंगकर्मींना असल्याने त्यांचे नाट्यविधान महत्त्वाचे ठरणारे आहे.

– केदार काळवणे (लेखक मराठीचे सहायक प्राध्यापक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -