घरफिचर्ससर्वांना समजणारी संगीत भाषा : शंकराभरणम

सर्वांना समजणारी संगीत भाषा : शंकराभरणम

Subscribe

दाक्षिणात्य संगीतामध्ये शंकराभरणम हा एक राग आहे. शंकराभरणम म्हणजे शंकराचे आभूषण. कथानायकाचे नावही शंकरशास्त्री आहे. तो मध्यमवयीन असून त्याला एक लहान मुलगी आहे. त्याच्या लोकप्रियता आणि गायनकला यामुळे लोक त्याला थोर व्यक्ती समजतात. त्याच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. रोज सकाळी तो मुलीला, शारदाला, घेऊन नदीवर जातो आणि तिला गाण्याची तालीम देतो. नायिका तुलसी ही देहविक्रय करणार्‍या महिलेची मुलगी आहे. तिने मनोमन शंकरशास्त्रीना गुरू मानले आहे. त्यांचे गाणे ऐकायला मिळावे म्हणून तीही सकाळी लवकर नदीवर येऊन त्यांच्या दृष्टीस पडणार नाही अशा जागेवरून त्यांचे गाणे ऐकत असते.

जो समजण्यासाठी प्रेक्षकांना भाषेची अडचण येत नसेल, तो प्रभावी चित्रपट असे म्हणतात. त्यात केवळ पाहण्यातून प्रेक्षकाला सारे काही उमगले पाहिजे, असा प्रयत्न दिग्दर्शकाला करावा लागतो. पण भाषा अपरिचित असूनही तिची अडचण न येता चित्रपट समजणे आणि आवडणे हा प्रकारही महत्त्वाचा आहे. इंग्रजी चित्रपट पाहणार्‍या सर्वांनाच काही इंग्रजी येत नसते, तरीही चित्रपटाची म्हणून जी भाषा असते, तिचा चांगला वापर करण्यात आला असेल, तर तो त्यांना समजतो, असे अनुभवास येते. भारतात तर विविध भाषांची रेलचेल असते आणि प्रेक्षकांनाही अनेकदा दुसर्‍या भाषांत काय चालले आहे याचा अंदाज घ्यायचा असतो वा एखादा वेगळ्या भाषेतला चित्रपट एवढा का गाजतो आहे, या कुतूहलाने प्रेक्षक तो बघतात आणि त्याचा आनंदही घेतात. प्रभात चा संत तुकाराम, व्ही. शांताराम यांचा दो आँखे बारा हात, राज कपूर- शंभू मित्र यांचा जागते रहो, यांच्याप्रमाणेच सत्यजित राय, गिरीश कार्नाड, मणिरत्नम अशा अनेकांचे चित्रपट देशविदेशात गाजले ते त्यामुळेच.

काही कारणाने, 1980 मध्ये हैदराबादमध्ये असताना तेथे शंकराभरणम नावाचा चित्रपट गाजत होता. म्हणून रॉयल टॉकीजला तो पाहिला आणि तेव्हापासून त्याने झपाटून टाकले आहे. त्याची गाण्यांची ध्वनिफीत सहज उपलब्ध झाल्याने अधून मधून गाणी ऐकतच होतो. त्याकाळी तो रॉयल टॉकीजमध्ये अनेक आठवडे चालला होता आणि अन्यत्रही त्याने चांगला व्यवसाय केला. इतर राज्यांमध्येही त्याला चांगली दाद मिळाली. पुण्यात तो त्यावेळी नव्या असलेल्या सोनमर्ग टॉकीजमध्ये दुपारी दाखवण्यात येत होता. वडिलांना आग्रह करून तो बघण्यासाठी नेले आणि त्यांनाही तो खूप आवडला. या ठिकाणी प्रभाकर पाध्ये तेव्हा भेटले. त्यांनी वडीलांना म्हटलेः कसा वाटला? वडीलांनी सांगितलेः छानच आहे! मुलाने आग्रहाने आणले बरे झाले. तो दुसर्‍यांदा आलाय. ते म्हणालेः अहो, मीही दुसर्‍यांदा आलोेय. त्यांच्या बोलण्याने मला आपली आवड योग्य असल्याचे समाधान मिळाले.

- Advertisement -

दाक्षिणात्य संगीतामध्ये शंकराभरणम हा एक राग आहे. शंकराभरणम म्हणजे शंकराचे आभूषण. कथानायकाचे नावही शंकरशास्त्री आहे. तो मध्यमवयीन असून त्याला एक लहान मुलगी आहे. त्याच्या लोकप्रियता आणि गायनकला यामुळे लोक त्याला थोर व्यक्ती समजतात. त्याच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. रोज सकाळी तो मुलीला, शारदाला, घेऊन नदीवर जातो आणि तिला गाण्याची तालीम देतो. नायिका तुलसी ही देहविक्रय करणार्‍या महिलेची मुलगी आहे. तिने मनोमन शंकरशास्त्रीना गुरू मानले आहे. त्यांचे गाणे ऐकायला मिळावे म्हणून तीही सकाळी लवकर नदीवर येऊन त्यांच्या दृष्टीस पडणार नाही अशा जागेवरून त्यांचे गाणे ऐकत असते.

एके दिवशी सकाळी शंकरशास्त्रींच्या गाण्याने ती एवढी भारावून जाते की स्वतःच्याही नकळत ती नाच करू लागते. मध्येच अचानक गाणे थांबते. ती दचकून बघते, तो शंकरशास्त्री तिच्याकडेच बघत असतात. ती घाबरते, आता ते आपल्याला रागावणार असे तिला वाटते. पण तसे न होता ते नजरेनेच तिचे कौतुक करतात आणि पुढे गाऊ लागतात. नकळतच त्या दोघांमध्ये गुरु-शिष्येचे नाते निर्माण होते. चित्रपटातील नाट्याच्या मुळाशी हेच नाते आहेे. तुलसीची आई तिला देहविक्रयाच्या व्यवसायाला लावण्याची इच्छा करत असते आणि एक धनवान त्यासाठी खूप पैसे तिला देणार असतो, त्यामुळे ती आतुरलेली असते. पण तुलसी त्यासाठी तयार होत नाही. आईचा भाऊ तिच्या पैशामागे असतो. आई शेवटी पैसे घेऊन त्या धनिकाला तुलसीच्या खोलीकडे पाठवते. ती त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो पण अखेर तो तिच्यावर अत्याचार करतोच. ती दुखावते. त्यात भर म्हणून तिथे असलेली शास्त्रींची फोटोफ्रेम फेकून देऊन तो म्हणतो, माझं काम झालं! आता खुशाल त्या शंकरशास्त्रीकडे जा! तुलसी शास्त्रींच्या या बदनामीने जास्त दुखावते, पेटून उठते आणि फ्रेमच्या फुटलेल्या काचेचा तुकडा भोसकूनच त्या धनिकाला मारते.

- Advertisement -

तिच्यावर खुनाचा आरोप ठेवून खटला भरला जातो. पण शंकरशास्त्रींचा दोस्त वकील तिची निर्दोष मुक्तता करतो उलट तिच्या आईलाच बेकायदा वेश्या व्यवसाय केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा होते. तुलसी सुटते, पण आता ती बेघर आहे., शंकरशास्त्री तिला आश्रय देतो अन् त्यामुळे लोक वेडेवाकडे बोलू लागतात. तुलसी त्याची रखेल आहे, वाईट साईट बोलत राहतात. त्यांचे साथीदार त्याला सोडून जातात. शास्त्रीबुवांच्या या एकाकी पडण्याला आपणच जबाबदार म्हणून तुलसीही निघून जाते. दहा वर्षे जातात. पण शास्त्रीबुवांचे ग्रहच फिरलेले असतात. पॉप संगीताच्या आक्रमणामुळे त्यांच्या शास्त्रीय गायनाचा लोकाश्रय जातो, त्यांचे वैभव जाते. ते कसेबसे दिवस काढतात.

तिकडे तुलसीला मात्र अचानक आईची सारी वादग्रस्त संपत्ती मिळते. अत्याचारानंतर झालेल्या मुलाला ती, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शंकरशास्त्रींप्रमाणे मोठा गायक बनवायचे ठरवते. त्याला त्यांच्याकडे पाठवते. अनाथ असल्याची बतावणी करून आश्रय मिळव असे सांगते. तो तसे करतो आणि यथावकाश शास्त्रीबुवांचा शिष्यच बनतो. तुलसी मिळालेल्या पैशांचा वापर अनामिक राहून शंकरशास्त्रींना मदत करण्यासाठी करते. शास्त्रींच्या मुलीवर कामेश्वर रावचे प्रेम जडते. सुरुवातीस त्याच्या संगीतातल्या चुकांमुळे शास्त्री चिडतात, पण नंतर त्याचे संगीतप्रेम कळल्यानंतर ते या विवाहालासंमती देतात. तुलसीने शंकराभरणम हा हॉल शंकरशास्त्री कलामंदीर म्हणून बांधलेला असतो. तेथे ती शारदाच्या लग्नाच्या दिवशी शंकरशास्त्रींच्याच गाण्याचा कार्यक्रम ठरवते. चांगली गर्दी होते. त्यांचे साथीदारही परत येतात. ते सुखावतात.

नेहमीप्रमाणे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे त्यांचे गाणे गाऊ लागतात. पण दुर्दैवाने गाणे सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. ते पुढे गाण्याचा प्रयत्न करतात, पण ते अशक्य होते. … तेव्हा तुलसीचा मुलगा, ज्याचे नावही तिने शंकर असेच ठेवलेले असते. तो गाणे पुढे म्हणू लागतो. थेट त्यांच्याच धाटणीत. सर्वजण थक्क होतात. शंकरशास्त्री कृतार्थतेने बघतात. नजरेनेच मित्र त्यांना हा तुलसीचा मुलगा असे सांगतो. गाणे संपताच शंकरशास्त्री स्वतःच्या पायातील मानाचे कडे शंकरच्या पायात घालून जणू काही परंपरा पुढे चालू राहील याची ग्वाही देतात. डॉक्टरला त्यांनी थोपवलेले असते. त्यांना जणू आपले मरण कळलेले असते. ते कलंडतात आणि ते पाहतात शोकाकूल तुलसी येऊन त्यांच्या पायाशी पडते. काही काळाने तीही दुःखातिरेकाने मरण पावल्याचे कळते. चित्रपट संपतो. सुन्न होऊन प्रेक्षक हळूहळू बाहेर पडतात.

संगीत हा चित्रपटाचा प्राणच आहे आणि ते दिले आहे के. व्ही. महादेवन यांनी. गाणी एस. पी. बालसुब्रह्मण्यम, वाणी जयराम (तुलसीचा मुलगा शंकर साठी) आणि एस. जानकी (शारदासाठी) यांची आहेत. सर्व गाणी कर्णमधुर आहेत. कर्नाटक संगीतातली असली तरी. गाण्याचा कान असलेल्यांना ती आवडणारच. सोमयाजुलू मूर्तिमंत शंकरशास्त्रीच भासतात. तर मंजू भार्गवीने तुलसी जिवंत केली आहे. तिची नृत्ये तर प्रेक्षणीयच आहेत. लहान शंकरचे काम करणार्‍या शारदा या मुलीने जान आणली आहे आणि राजलक्ष्मीने शंकरशास्त्रींच्या मुलीची, शारदाची, भूमिका केली आहे. तिला साथ चंद्रमोहन, कामेश्वर राव याची आहे. अल्लू रामलिंगम यांनी मित्र वकिलाची भूमिका धमाल केली आहे. सारेजण कथानकाबरोबर अगदी एकरूप झाले आहेत. गाणी आपसूकच येत राहतात. पॉप ग्रुपबरोबरचा वाद आणि प्रात्यक्षिक हा प्रसंग छान जमला आहे. संगीत कोणतेही चांगले. तुम्ही आपल्या संगीताला नावे ठेवू नका. पाश्चातत्य लोक आपले संगीत शिकत आहेत हे ध्यानात ठेवा आणि शिकायचे तर पाश्चात्य संगीतही नीटपणे शिका, असे शंकरशास्त्री त्या त्यांच्या पॉपमधील नैपुण्याने चकित झालेल्या तरुणांना सांगतात.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच निवेदनात संस्कृत सुभाषिताचा वापर करून संगीत हे सर्वांना, लहानापासून थोरांपर्यंत, मुले प्राणी, साप अशा सार्‍यांनाच प्रिय असते. ती एक कला आहे आणि भारतीय संगीताची ती जीवनधाराच आहे. असे निवेदन येते. स्वतः दिग्दर्शक के. विश्वनाथ यांनी हे निवेदन केले आहे. त्यातील सत्यता चित्रपट पाहताना प्रत्ययाला येते. कथा, पटकथाही त्यांचीच आहे. छायाचित्रण बालू महिंद्रू यांचे आहे. निर्मिती एदिदा नागेश्वर राव यांनी पूर्णोदय आर्ट निर्मिती या बॅनरखाली केली आहे. प्रमुख भूमिकेसाठी शिवाजी गणेशन आणि काही ख्यातकीर्त अभिनेत्यांचा विचार झाला होता. पण अखेर सोमयाजुलू या नाटकांतील कलाकाराची निवड झाली. असे सांगतात की नोकरीमुळे चित्रपटासाठी सलग वेळ देता येणार नाही, असे सांगितल्यावर निर्मात्याने काही काळ थांबून ते निवृत्त झाल्यावर चित्रपटाचे काम सुरू केले होते. मंजू भार्गवी म्हणजे तुलसी असेच वाटते. खरे तर नंतर गिरीश कार्नाड आणि जयप्रदा यांना घेऊन स्रूर संगम नावाचा हिंदी चित्रपट करण्यात आला, तो चांगला वाटला, तरीही शंकराभरणमची सर नाही यावर ज्यांनी दोन्ही पाहिले अशांचे एकमत होते.

शंकराभरणम ला सर्वोत्तम चित्रपट म्हणून राष्ट्रीय पारितोषिक मिळालेच पण त्याबरोबरच सर्वोत्तम संगीतकार म्हणून के. व्ही. महादेवन यांची, सर्वोत्तम पुरुष आणि स्त्री गायक म्हणून अनक्रमे बालसुब्रह्मण्यम आणि वाणी जयराम यांचीही निवड झाली होती. सीएनएनने या चित्रपटाची निवड शंभर उत्कृट भारतीय चित्रपटांत केली होती, तर सर्वोत्तम 25 भारतीय अभिनेत्यांच्या भूमिकांमध्ये सोमयाजुलू यांना फोर्बसने स्थान दिले होते. राज्य पातळीवरही त्याला अनेक पारितोषिके मिळाली होती. रसिकांनी शक्य होईल तेव्हा हा चित्रपट पहावा आणि वेगळा अनुभव घ्यावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -