घरफिचर्ससंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वयू

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वयू

Subscribe

वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती या तीन शस्त्रांच्या आधारे आजीवन पुराणमतवाद्यांशी लढा देत पुरोगामी महाराष्ट्रासाठी जीवन वेचलेले प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र. १७ सप्टेंबर १८८५ रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे त्यांचा जन्म झाला. थोर समाजसुधारक महात्मा फुले हे त्यांचे आदर्श होते. त्यांनी महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केला. या अभ्यासाअंती समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. त्यामुळेच महात्मा फुले यांचा पुण्यात कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात समाजसुधारणांचा त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठी प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते.
बालविवाह, विधवांच्या केशवपनाची रुढी, देवळांमधील ब्राह्मण पुजार्‍यांची अरेरावी, हुकूमशाही, अस्पृश्यता, हुंडाप्रथा या समाजातील कुप्रथांच्या समूळ उच्चाटनासाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, पण या अडथळ्यांवर मात करत त्यांनी विरोधकांची दाणादाण उडवून दिली. वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती या तीन शस्त्रांच्या आधारे त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला. समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे हे मत त्यांनी मांडले होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमधील स्त्रियांवर अन्याय होतो. अशिक्षित जनता या रुढींखाली भरडली जात असल्याचे पाहून त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला. यासाठी संत एकनाथांच्या जीवनावरील ‘खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खर्‍या ब्राह्मणांची भूमिका मांडली.
पुण्यातील कार्यानंतर प्रबोधनकार ठाकरे मुंबईत स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळीला सुरुवात केली. यासाठी त्यांनी सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन केली. या माध्यमातून त्यांनी अनेक वरपित्यांना हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. प्रेमविवाहाला तीव्र विरोध असणार्‍या त्या काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. सामाजिक सेवेचा ध्यास घेतलेले प्रबोधनकार ठाकरे हे उत्कृष्ट लेखक, पत्रकार व इतिहास संशोधक सुद्धा होते. नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक विचारांचा प्रसार केला. यामध्ये सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधन या नियतकालिकांचा समावेश आहे. प्रबोधन मासिकामुळे ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जाऊ लागले. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथांसह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रबोधनकारांच्या जीवनातील महत्त्वाचा लढा होता. या चळवळीत त्यांनी कुशल संघटकाची भूमिका बजावली. चळवळीत सामील वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य त्यांनी केले. चळवळी, प्रचारासाठी हाती वृत्तपत्रासारखे साधन हवे याची जाणीव प्रबोधनकारांना झाली. या जाणिवेतून त्यांनी वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यावेळी ते सरकारच्या सार्वजनिक खात्यात नोकरीला होते. सरकारी नोकरदारांना वृत्तपत्र चालविण्यास बंदी होती, पण केशव सीताराम ठाकरे यांनी तशी परवानगी मिळवली होती. त्यानंतर १६ ऑक्टोबर १९२१ रोजी के. सी. ठाकरे यांचे प्रबोधन पत्र पाक्षिक सुरू झाले. पत्राच्या नावाबरोबर उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत असे संस्कृत वचन होते. त्याबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि नैतिक गोष्टींना हे पत्र वाहिले असल्याचा उल्लेखही इंग्रजीत होता. पत्राच्या पहिल्या अंकापासूनच कवी वसंतविहार यांच्या समाजहितवादी कविता त्यात प्रसिद्ध होत असत. प्रबोधनचा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसार झाला. मुंबईत परप्रांतीय, विशेषतः दाक्षिणात्य मंडळी मोठ्या संख्येने येऊ लागली. त्यामुळे मराठी माणसांची गैरसोय होऊ लागली. त्याला ‘प्रबोधन’ने १९२२ मध्ये सर्वप्रथम तोंड फोडले. वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती या तीन शस्त्रांच्या आधारे आजीवन पुराणमतवाद्यांशी लढा देत पुरोगामी महाराष्ट्रासाठी जीवन वेचलेले प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -