घरफिचर्समहिलाशक्तीला विविध आर्थिक पर्यायांचे पंख !

महिलाशक्तीला विविध आर्थिक पर्यायांचे पंख !

Subscribe

‘चूल-मूल’ आणि माजघरातील चौकटीमध्ये व उंबरठ्याच्या आत अडकलेली स्त्री कधीच मोकळी झालेली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुशलतेने उत्तुंग कामगिरी करते आहे. ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ या वचनापासून आपल्या मुली आता खूप पुढे गेलेल्या आहेत, केवळ नोकरी नव्हे तर करिअर म्हणून उच्च-पद सांभाळणे व नवनवी क्षितिजे गाठणे त्यांनी सहजशक्य करून दाखवलेले आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी आर्थिक गुंतवणुकीचे विविध पर्याय त्यांनी कुशलतेने हाताळण्याची गरज आहे. त्यांनी त्या पर्यायांचा उपयोग करून त्या आर्थिकदृष्ठ्या सक्षम झाल्या आणि त्याचा प्रसार ज्यावेळी शहरापासून गावखेड्यापर्यंत राहणार्‍या महिलांपर्यंत पोहोचेल, त्याच वेळी खर्‍या अर्थाने महिला दिन साजरा होईल.

दरवर्षी मार्च महिन्यात आठ तारखेला जगभरात ‘महिला दिन’ विविध पद्धतीने साजरा होतो. आपल्याकडे ‘महिला दिन’ साजरा करण्याची प्रथा आहे, हा दिवस फक्त काही श्रीमंत-उच्चभ्रू महिलांच्या गौरवासाठी नाही, समाजातील अनेक घटकातील महिलांच्या कष्टाचा सन्मान करणे अत्यंत महत्वाचे आहे. किटी पार्टी, सोशल लाईफ यात रमणार्‍या रमणींना आणखीन एक ‘डे’ साजरा करणार्‍या विदुषींना ‘वुमन्स -डे’ म्हणजे और एक फंक्शन मनानेका होता है !! असे काहीही असेल तरी एका विशिष्ट दिवशी का होईना समस्त पुरुषवर्गाला जीवनातील अनेक रूपातील स्त्रियांप्रती आदर व्यक्त करण्याची संधी मिळते हीच मोठी बाब आहे. आपला उद्देश हा जास्तीत जास्त महिलावर्गाला आर्थिक साक्षर करण्याचा आहे. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण महिला बचत व गुंतवणूक आणि महिला उद्योजिका, नोकरी करणार्‍या व गृहिणींना मिळणार्‍या कर्जविषयक जाणून घेणार आहोत.

पार्श्वभूमी – ‘चूल-मूल’ आणि माजघरातील चौकटीमध्ये व उंबरठ्याच्या आत अडकलेली स्त्री कधीच मोकळी झालेली आहे. आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुशलतेने उत्तुंग कामगिरी करते आहे. ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ या वचनापासून आपल्या मुली आता खूप पुढे गेलेल्या आहेत, केवळ नोकरी नव्हे तर करिअर म्हणून उच्च-पद सांभाळणे व नवनवी क्षितिजे गाठणे त्यांनी सहजशक्य करून दाखवलेले आहे.

- Advertisement -

महिलांच्या बचतीचा मंत्र
महिला-दिन -बचत आणि गुंतवणुकीचा मंत्र – हा काही फक्त मिडलक्लास -जॉब करणार्‍यांसाठीच द्यायचा नसतो. कारण त्यांना गुंतवणूक साधने आणि बँकांची उत्पादने यांची माहिती अनेक पद्धतीने मिळत असते. त्यात जास्त लक्ष घातले जात नाही, कारण वेळच मिळत नाही ! हा वेगळाच मुद्दा !! पांढरपेशा मंडळींना अनेक माध्यमातून ताज्या माहितीचा ओघ मिळत असतो. तरीही ते कर बचतीसाठी ऐनवेळी सल्लागार, एजंट आणि ओळखीचे तज्ञ ह्यांच्याकडे धाव घेत असतात. पण खरी मदत व जागरूकता हवी असते ती तळागाळातील स्त्री कष्टकर्‍यांना -ज्यांचा उदरनिर्वाह होत असतो ते दिवसाकाठी मिळणार्‍या रोजंदारीवर काम करणार्‍या गोरगरीबांवर. वर्तमानपत्र, टीव्हीच्या बातम्या, व्हॉट्सअ‍ॅपवरील फॉर्वर्डस अशा सोर्सकडून मिळणार्‍या ताज्या -शिळ्या माहितीचा धबधबा त्यांच्याकडे नसतो.

मुलींसमोरील शिक्षणाचे आव्हान
मुली-विद्यार्थीदशेतील – मग ती ग्रामीण भागातील असो किंवा मोठ्या महानगरातील. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेतास बात असेल तर शिक्षण घेणे हे एक मोठे आव्हान असते. जरी फी माफ असली, शिष्यवृत्ती असली तरी दैनंदिन गरजा भागवणे जरुरीचे असते. पॉकेट-मनीचा प्रश्नच नसतो, पण जे काही पैसे मिळत असतात, त्यातून स्वतःचे बचत खाते उघडले शिवाय जमले तर पीपीएफ खाते तर स्वतःसाठी काही पैसे जमा होऊ लागतील. त्यावर व्याजरूपी उत्पन्न मिळू शकेल. काही मुली ट्युशन्स किंवा पार्ट टाइम काम करून स्वतः पैसे कमावीत असतात. असा पैसे शिल्लक राहिला तर प्रत्येकवेळी घरातील मदतीवर अवलंबून न राहता आपली सोय आपण करू शकतो. हे स्वावलंबन दीर्घकालीन फायद्याचे ठरू शकते.

- Advertisement -

कमावत्या पण अविवाहित तरुण मुली- आपले शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी करणार्‍या मुलींनी बचत व गुंतवणूक दोन्हीकडे काही प्रमाणात तरी लक्ष दिले पाहिजे. स्वतःसाठी पैसे खर्च करणे काही चुकीचे नाही,पण पद्धतशीरपणे आपल्या व कुटुंबाच्या मोठ्या गरजांसाठी पैसे उभे करणे केव्हाही चांगलेच. उदाहरणार्थ – जागा घेणे, स्कुटरसारखे वाहन घेणे, आई-वडिलांच्या इच्छा पुरवणे किंवा स्वतःच्या लग्नासाठी पैसा जमा करणे. याकरिता निव्वळ सेव्हिंग खाते असून चालणार नाही.

विवाहित महिलांची जबाबदारी
विवाहित स्त्रियांना मुलांसाठी, घरासाठी सारे काही करायचे असते, पण स्वतःसाठी करायला जमत नाही. पती व मुलांबरोबर जॉईंट खाते ठेवा, पण स्वतःचे स्वतःसाठी स्वतंत्र खाते असावे. आपल्या गरजा, हौसमौज ही आपल्या कमाईने करणे काहीच गैर नाही. मुलांचे शिक्षण, पतीचे आजारपण याचा विचार करताना स्वतःचा मेडिकल इन्शुरन्स विसरू नका. जीवनातील अनेक टप्पे पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ लागते, हे जाणून प्रत्येक वळणे म्हणजे मुलांचा जन्म, शिक्षण, लग्नकार्य याकरिता कसे पैसे उभे करता येतील, त्यानुसार बँक-ठेवी, पीएफ, नित्य गुंतवणूक योजना अशा माध्यमांतून पैसे बाजूला काढा. दागिन्यांचा सोस नसला तरी दागिने घालणे हे सर्वच स्त्रियांना आवडते. मात्र दागिन्यात पैसे गुंतवताना पेपर-गोल्डमध्ये काही पैसे गुंतवा. नियमित व पारंपरिक पर्याय आहेतच, पण शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स यांच्याकडे दूरदृष्टी व दीर्घकालीन पर्याय म्हणून जरूर पाहावे.

घटस्फोटित महिलांनी काय करावे
घटस्फोटित महिलांना आर्थिक सबळ असणे हे खूप गरजेचे असते. कारण संसार चालवण्याची जबाबदारी ही एकटीवर असते. मुलांना कोणत्याही बाबतीत उणीव भासू न देता, अशी आर्थिक-मानसिक-सामाजिक जबाबदारी पेलवणे सोप्पे नसते. नोकरी किंवा स्वतःच्या कौशल्यावर आधारित स्वयंरोजगार सांभाळताना मुले-घर याकडे बघायचे असते. त्यांच्या व स्वतःच्या गरजा ह्यांना प्राधान्य असते. अतिरिक्त पैसा कमावताना वेळेचे गणित जमवावे लागते. नियमित पोटगी मिळत असेल, तरीदेखील ती काही पुरेशी नसते. पेन्शनसुद्धा दरवर्षी महागाईला सामना करण्यासाठी प्रतिवर्षी वाढते, मग पोटगीच का ‘फिक्स्ड’ असावी ? ज्या महिलेला एकदाच एक रकमी पोटगी मिळाली असेल, तर ती योग्य ठिकाणी गुंतवून मासिक उत्पन्न मिळवले पाहिजे. अधिक व्याजाच्या मोहाने अनधिकृत स्कीम्समध्ये न गुंतवता, विश्वासार्हता व कमी जोखमीच्या साधनांत पैसे ठेवले पाहिजेत.

वंचित, कष्टकरी महिलांनी काय करावे
वंचित व कष्टकरी स्त्रिया – शहरातील, गावकुसाबाहेरील अशिक्षित स्त्रियांना कोणी वाली नसतो. पण बँकिंग प्रतिनिधी, जनधन बँक खाते, पोस्ट अशा ठिकाणी किंवा बचतगट माध्यमातून त्यांना बचतीकडे वळवले जाते. त्यांच्या नवर्‍याच्या व्यसनात वाया जाणारा पैसे वाचवणे हे सोप्पे नसते. रोजच्या कमाईतून उदरनिर्वाह करून काही रुपये शिल्लक पडले तर उद्याचे आजारपण, आकस्मिक संकट, मुलेबाळे व वृद्धांसाठी पैसे कामी येऊ शकतात. खोट्या योजना व फसवणुकीपासून रक्षण करणे अवघड असते. अडाणीपणाचा गैरफायदा घेणारे अनेक असतात. अशावेळी आपण पुढे येऊन जमेल तिथे गाईडन्स दिले पाहिजे. मग आपल्या गावातील रखमा असो किंवा घरात भांडी-कपडे करणारी शैला असो ! साधे खाते उघडणे, अधून मधून पैसे खात्यात भरणे अशी आठवण करून त्यांना प्रवृत्त करणे हे आपले काम आहे. त्यांच्यातील कोणी पोळ्या करणे, पापड विकणे असे काही घरगुती लघु-उद्योग करीत असतील तर त्यांना कर्ज मिळवून दिले व परतफेडीसाठी मार्गदर्शन केले पाहिजे. केवळ देणग्या देऊन आपली सामाजिक जबाबदारी संपत नाही. हस्तकला, आदिवासी कला, ग्रामीण वस्तू -पदार्थ करीत असलेल्या महिलांना कर्ज व बाजारपेठ मिळाली तर नक्कीच त्यांना आपल्या पायावर उभे राहता येईल.

वृद्ध, आजारी, महिलांनी काय करावे
वृद्ध, आजारी, अनाथ, परित्यक्ता अशा अनेक प्रकारच्या महिलांना रोजचे दोन घास मिळणे जिकिरीचे असते. कष्ट करणे अशक्य असते, स्वकमाई नाही, घरच्यांचे लक्ष नाही किंवा निराधार असल्यास दिवस कसे काढणार? त्यातून मोठा आजार असेल तर औषधपाणी कसे करणार? विदेशात वृद्धांना पेन्शन व वैद्यकीय सुविधा असतात, पण आपल्याकडे वृद्धाश्रम किंवा एनजीओ मदत करतात, ती अपुरीच आहे. आपण त्यांच्याकरिता देणगी देऊ शकतो का? वाढदिवस किंवा मृतांच्या स्मरणार्थ भुकेलेल्याना अन्नदान करू शकतो का ? याचा विचार केला पाहिजे. रेड लाईट एरियातील वेश्यांनी आपल्या कमाईतले ‘चार पैसे’ भविष्य -आरोग्य व मुलांसाठी बाजूला ठेवावेत म्हणून कोलकाता व मुंबईत सहकारी पतपेढी -संगिनी महिला सोसायटी कार्यरत होती. कचरा-वेचणारे व अनेक असंघटित श्रमकरी वर्ग -विशेषतः महिला आर्थिक सुविधांपासून वंचित आहेत. त्यांचे जीवनमान सुधारायचे असेल तर बचत करण्याची सोय असली पाहिजे. हे काम अनेक एनजीओज करीत आहेत सर्वस्तरीय महिलांचा उत्कर्ष झाला तरच महिला दिनाला महत्व.

समाजातील विविध प्रकारच्या स्त्रियांबाबत आपल्या मनात जाणीव निर्माण व्हावी व त्यांना आर्थिक आधार देण्याचा विचार आणि कृती झाली तरी महिला-दिनाचे ‘पुण्य’ आपल्याला मिळू शकेल !! अन्यथा दरवर्षी सत्कार समारंभ होतात, दुसर्‍या दिवशी ‘पेज-थ्री’ वर चकाचक फोटो येतात आणि एक रुटीन विषय संपतो, पुन्हा पुढच्या वर्षाची वाट बघत.!! तळागाळातील महिलेपर्यंत महिला दिनाचा कवडसा पोहोचला तर तोच खरा सुदिन -महिला दिन !!

-राजीव जोशी -बँकिंग व अर्थ अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -