घरक्रीडाआपण गुडघे टेकले !

आपण गुडघे टेकले !

Subscribe

नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने भारताचा २-० असा पुरता धुव्वा उडवला. भारताला ४ पैकी ३ डावांत तर २०० धावांची मजलही मारता आली नाही. फलंदाजीची अशी त्रेधातिरपीट उडत असताना गोलंदाज तरी काही चमत्कार करतील असं वाटत होतं. मात्र, त्यांनाही खास कामगिरी करता आली नाही. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत यजमान न्यूझीलंड भारतापेक्षा सरस ठरला.

विराट कोहली, रवी शास्त्री या जोडगोळीला परदेश दौर्‍यात आणखी एका मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे. न्यूझीलंड दौर्‍यातील वनडे मालिकेत ३-० असा मार खाल्यावर कसोटी मालिकेत भारताचं २-० असं वस्त्रहरण झालं! जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) स्पर्धेत कोहलीच्या भारतीय संघाचा केन विल्यमसनच्या किवीजनी २-० असा धुव्वा उडवला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत यजमान न्यूझीलंड संघ भारताला भारी पडला.

न्यूझीलंडने विराट कोहलीच्या भारतीय संघाचा पिच्छा पुरवलाय. वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत किवीजनी भारताची विजयी घोडदौडीला लगाम घातला, त्यानंतर सहा महिन्यात त्यांनी पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील विजयी कामगिरीला खीळ घातली. तसे करताना किवीजनी भारतीय संघाच्या फलंदाजीचे वस्त्रहरण केलं. संघनायकाची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. ४ डावात ९.५० च्या सरासरीने ३८ धावा! गेल्या ५-६ वर्षात विराटच्या बॅटला विळखा पडण्याची ही पहिलीच खेप. २०१४ इंग्लंड दौर्‍यात विराटला १० डावात जेमतेम १३१ धावा करता आल्या. मात्र, त्या इंग्लंड दौरापेक्षाही भयंकर कटू आठवणी या न्यूझीलंड दौर्‍यात विराटला नक्कीच सतावतील.

- Advertisement -

कसोटी मालिकेत २-० असा पुरता धुव्वा उडाला. भारताला ४ पैकी ३ डावात तर २०० धावांची मजलही मारता आली नाही. वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर पराभव भारतीय संघाच्या पाचवीलाच पुजले आहेत. यंदाही पराभवाचा सिलसिला कायम राहिला. ख्राईस्टचर्चच्या हॅग्ले ओव्हलवरील खेळपट्टी म्हणजे हिरवा गालिचाच. साऊथी, बोल्ट, जेमिसन, वॅग्नर, डी ग्रँडहोम या तेज पंचकासमोर भारताच्या तथाकथित नामवंत फलंदाजांनी नांगी टाकली ती पण एकदा नव्हे तर दोनदा!

सलामीची समस्या हे तर भारतीय क्रिकेटचं जुनंच दुखणं. सुनील गावस्कर, विरेंद्र सेहवाग यांसारखे यशस्वी सलामीवीर भारताला लाभले! पण कसोटी क्रिकेटमध्ये अपवादात्मक प्रसंग वगळता भारताची सुरुवात डळमळीतच असते, न्यूझीलंड दौराही त्याला अपवाद नव्हताच. मयांक अगरवाल वेलिंग्टन कसोटीत खेळपट्टीवर उभा राहिला. मात्र, दुसर्‍या कसोटीत साऊथी, बोल्ट, जेमिसन, वॅग्नर या किवीजच्या तेज चौकडीसमोर तो लवकर माघारी परतला. पृथ्वी शॉने दुसर्‍या कसोटीत फटकेबाज अर्धशतक झळकावलं, तरी त्याच्या फलंदाजीतील तांत्रिक दोष उघड झाले. विंडीजविरुद्व कसोटी पदार्पणात शतक फटकावणारा पृथ्वी दीर्घ काळानंतर भारतीय संघात परतलाय, पण संघात कायम राखण्यासाठी त्याला खूप मेहनत निश्चितपणे करावी लागेल. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा ही भारताची मधली फळी पार कोसळली आणि त्यातून संघ सावरलाच नाही.

- Advertisement -

फलंदाजीची अशी त्रेधातिरपीट उडत असताना गोलंदाज तरी काही चमत्कार करतील असं वाटत होतं. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात त्यांच्यामुळे भारताने ७० वर्षांत प्रथमच कसोटी मालिका विजय साजरा केला होता. न्यूझीलंड दौर्‍यात मात्र गोलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. बुमराहने एका कसोटीचा अपवाद वगळता या दौर्‍यात सुमार कामगिरी केली. प्रमुख फलंदाजांना झटपट बाद केल्यावर तळाच्या शेपटाने भारताला तंगवले, परिणामी किवीजची धावसंख्या फुगत गेली आणि भारतीय संघ पिछाडीला पडत गेला.

परदेशात खास करुन इंग्लंड, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत भारताच कसोटी विजय दुर्मिळच आहेत. तब्बल सात दशकांनंतर भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून प्रथमच कसोटी मालिका जिंकल्यावर रवी शास्त्री-विराट कोहली यांनी एवरेस्ट सर केल्याच्या थाटात विजयोत्सव केला. मात्र, या मालिकेत स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर बंदीमुळे खेळू शकले नव्हते ही बाबदेखील नजरेआड करता येणार नाही. अ‍ॅशेस मालिकेत वॉर्नर, स्मिथ दोघे पण खेळले आणि रंगतदार मालिकेचा आनंद प्रेक्षकांनी लुटला.

खेळाडूंच्या दुखापती तर अटळ आणि खेळाचा अविभाज्य घटक, पण ऐन मोक्याच्या क्षणी झालेल्या दुखापतीचा फटका भारताला बसला. नवोदितांना संधी लाभली, पण त्याचा पूर्ण फायदा त्यांना उठवता आला नाही. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत यजमान न्यूझीलंड भारतापेक्षा सरस ठरला आणि त्याचेच प्रतिबिंब २-० या निकालात उमटलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -