नागपूरमधील गुन्हेगारी फोफावली! पोलीस महासंचालकांची कबुली

Nagpur
crime
प्रातिनिधीक फोटो

होय! नागपुरातील गुन्हेगारी वाढली, ही प्रांजळ कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) संजीव दयाल यांनी दिली आहे. सोबतच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती. दयाल हे नागपुरात आले होते. त्यांनी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. इतकंच नाहीतर त्यांना गुन्हेगारी थांबवण्याबाबत तंबीही दिली. पण तरीही गुन्हेगारी अद्याप थांबलेली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराची आज एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. नागपूर शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून कुप्रसिद्ध होतेय. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघही या संत्रानगरीतच आहे. त्यामुळे गृहखाते असलेल्या मुख्यमंत्र्यांनी निदान आपल्या मतदार संघात तरी गुन्हेगारीला आळा घालावा, अशी अपेक्षा रास्त आहे. पण गेल्या चार वर्षांपासून स्वत: मुख्यमंत्री नागपुरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरले आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रकाशित करून मुख्यमंत्र्यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यातच नागपुरात हत्यासत्र सुरू असून ११ दिवसांत ९ हत्या घडल्या आहेत. त्यामुळे नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरला दर्जा आहे. परंतु नागपुरात चोऱ्या, दरोड्यांचेआणि हत्यांचे दोन नवे विक्रम प्रस्थापित होत आहे. नागपुरात घडत असलेल्या गुन्हेगारीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेहमीच विरोधकांकडून टीका होत असते. नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीबद्दल विरोधकांनी, विधिमंडळातही अनेकदा सरकार विरोधात आवाज उठविला, पण फारसा फरक पडलेला दिसत नाही. गुन्हे घडतात, त्याची टक्केवारी काढली जाते. ते कमी की अधिक मोजले जातात. आकडे काढून विरोधकांच्या तोंडावर फेकले जातात. गुन्हेगारांवर जरब बसवून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात आजवर नागपूर पोलीस अपयशी ठरले आहेत. मात्र निर्दोष, सर्वसामान्यांवर दमदाटी करण्यात नागपूर पोलीसांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूर शहरामध्ये राजकीय पक्षही गुन्हेगारीवर उतरले आहेत. नागपूर शहराने वाढ नोंदवत गुन्हेगारीतील आपले द्वितीय स्थान यंदाही राखले आहे. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ तर्फे जाहीर करण्यात आलेल्या २०१७ सालच्या गुन्हेगारी आकेडवारीत ही बाब समोर आली आहे. नागपूर शहर हे सध्या क्राईम कॅपिटल झाले आहे. ‘माझ्या शहराला बदनाम करू नका’ असं कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मागच्या नागपूर अधिवेशनात केले होते. पण मुख्यमंत्र्याना असे आवाहन करण्याची वेळ का आली?

हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील गुन्हेगारीबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. त्या कार्यक्रमात ते म्हणाले होते की, नागपुरातील संपूर्ण गुन्हेगारी संपवायची आहे. नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्यामुळे सध्या देशभर नागपूरचीच चर्चा असते. त्यात गुन्हेगारीनेही नागपूर शहराला बदनाम केले आहे.

होय! नागपुरातील गुन्हेगारी वाढली, ही प्रांजळ कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) संजीव दयाल यांनी दिली आहे. सोबतच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती. दयाल हे नागपुरात आले होते. त्यांनी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. इतकंच नाहीतर त्यांना गुन्हेगारी थांबवण्याबाबत तंबीही दिली. पण तरीही गुन्हेगारी अद्याप थांबलेली नाही.

तक्रारी दाखल करून घेण्यास टाळाटाळ करायची आणि गुन्हे (क्राईम रेट) कमी असल्याचे दाखवायचे, असा प्रकार नागपूर पोलिसांकडून आता सुरू झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गुन्हेगारी किती पटीने वाढली असेल याची कल्पनाच न केलेली बरी. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. पण अद्याप गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश बसलेला नाही.

गुन्हेगारीमध्ये आर्थिक फसवणुकीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या प्रकरणांच्या तपासाची प्रक्रिया थोडीशी वेळखाऊ असते. पुराव्याची साखळी जोडण्यात फार वेळ जातो. अशी प्रकरे हाताळण्यात नागपूर पोलीस अपयशी ठरले आहेत. नागरिकांना गंडविणाऱ्यांना पोलीस पकडणार कधी असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. वाढते सायबर क्राईम आणि पोलीस कस्टडीतील मृत्यू तसेच सीसीटीव्हीसंदर्भात नागपूर पोलिसांची प्रगती न विचारात घेतलेलीच बरी.

पोलिसांच्या रखडलेल्या बदल्यांबाबत तर कोणीच बोलण्यास तयार नाही. नागपूर मध्यवर्ती कारागृहात सर्रास मोबाईल, अंमली पदार्थ वापरले जात असून, आत असलेले गुंड तेथूनच आपल्या साथीदारांकडून खंडणी वसूल करीत आहेत. गुन्हेगारीचे हे वाढते स्वरूप असेच कायम राहिले तर नागपूरचा बिहार होण्यास फार काळ लागणार नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनाही ते भूषावह होणार नाही. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जर तेथील गुन्हेगारी मोडून काढत असतील तर फडणवीसांनाही ही गोष्ट अशक्य नाही. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची.


नितीन बिनेकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here