घरफिचर्सगुलाल,व्यवस्थेचे विदारक चित्र

गुलाल,व्यवस्थेचे विदारक चित्र

Subscribe

दुहेरी स्तरावर चालणारा सत्तासंघर्ष हा ‘गुलाल’मधील लाल रंगाला अधिक क्लिष्ट कंगोरे प्राप्त करून देतो. रणंजय आणि बानाशी असणार्‍या संबंधांमुळे दिलीपला या सगळ्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार हे काहीसं साहजिक ठरतं. बदलत्या राजकीय समीकरणांसोबतच चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेली पात्रंही बदलत जातात.

पियुष मिश्राची गाणी ही ‘गुलाल’मधील तीव्र आणि प्रौढ अशा सामाजिक-राजकीय भूमिकेची उत्प्रेरक आहेत. त्यातील ‘दुनिया’ मागे गुरुदत्तच्या ‘प्यासा’तील (१९५७) ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हैं’ची प्रेरणा दडलेली आहे. याच ‘प्यासा’मध्ये असलेलं साहिर लुधियानवीचं आणखी एक गाणं, ‘जिन्हें नाज हैं हिंद पर वो कहाँ हैं’ अजूनही तितकंच कालसुसंगत आहे. तत्कालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीची जाण ही या दोन्ही चित्रपटांमधील एक समान बाब असावी. त्यांचं हे आपल्या भूमिकेबाबत, आशयाबाबत सजग असणं हे त्यांच्या कालसुसंगततेचं महत्त्वाचं कारण मानता येईल. त्यामुळेच जेव्हा सभोवताली राजकारणाची चर्चा सुरू असते, तेव्हा कश्यपच्या २००९ मध्ये बनलेल्या, मात्र अजूनही तितक्याच परिणामकारक असणार्‍या ‘गुलाल’ची आठवण येणं अपरिहार्य ठरतं.

- Advertisement -

फार कमी चित्रपटकर्ते आणि पर्यायाने चित्रपट आपल्या राजकीय भूमिकेबाबत ठाम असतात. अर्थात संस्कृती, वारसा या गोष्टींसोबतच राजकारणाबाबतही हळव्या (की अतर्क्यरित्या आक्रमक?) असणार्‍या भारतीय समाजात चित्रपटकर्त्यांसोबत घडणार्‍या घटना पाहता अनेकांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत अलिप्त असणं साहजिक आहे. खासकरून जेव्हा आपली राजकीय भूमिका व्यवस्थेविरोधी, सत्तारूढ पक्षाविरोधी असते तेव्हा तर असं घडणं तार्किकही आहे. मात्र ट्विटरवर राजकीय आणि अराजकीय दोन्ही प्रकारच्या ट्रोल्सना पिटाळून लावणार्‍या आणि आपल्या राजकीय भूमिकेबाबत ठाम असणार्‍या कश्यपबाबत ही गोष्ट दिसून येत नाही. कायमच अँटी-एस्टॅब्लिशमेंट भूमिका घेताना दिसून आलेल्या कश्यपच्या चित्रपटातही ही बाब प्रतिबिंबित होते. त्यामुळेच जेव्हा एका व्यापक संदर्भात त्याच्या ‘गुलाल’चा विचार करायची वेळ येते, तेव्हा त्यात मांडलेल्या गोष्टी कुणा एका पक्षाच्या किंवा राजकीय प्रवाहाच्या विरोधात नसून थेट व्यवस्थेच्या विरोधातील आहेत हे लक्षात येतं. नेमकी हीच गोष्ट त्याला अधिक बंधनमुक्त बनवते. ज्यामुळे सदर चित्रपट स्थळ-काळाची बंधनं ओलांडत सत्तासंघर्षाचं जीवघेणं राजकारण आणि व्यवस्थेची चिकित्सा करण्याच्या अनुषंगाने कायम रेलेवंट राहण्याची क्षमता बाळगतो.

दिलीप सिंग (राज सिंग चौधरी) हा राजस्थानमधील एका काल्पनिक शहरात कायद्याचं शिक्षण घेण्यास आला आहे. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जागा नसल्याने अनपेक्षितपणे का होईना; पण एका बारमध्ये येऊन बसावं लागलेल्या दिलीपची ओळख रणंजय सिंगशी (अभिमन्यू सिंग) होते. रणंजय आपल्या राजपुताना वारशाबाबत प्रचंड अभिमान बाळगून आहे. दिलीपदेखील राजपूत असल्याने त्या दोघांमध्ये जवळीक साधली जाण्यात फारशी अडचण येत नाही. दुसर्‍या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर तिथे घडताना दिसणारी रॅगिंग ही पुढे जाऊन घडणार्‍या घटनांपुढे सौम्य वाटते.

- Advertisement -

रणंजयच्या निमित्ताने दिलीपचा संबंध डुकी बानाशी (के. के. मेनन) येतो. बानाला राजपूत समाजाला राज्याच्या सत्ताकेंद्रात महत्त्व मिळत नसल्याची खंत आहे. बाना राजपूत समाजाला महत्त्व मिळवून देण्यात सहाय्यक ठरेलशा बंडाची आखणी करतो आहे. हे बंड केवळ प्रतिकात्मक नसून प्रत्यक्ष हिंसेसारख्या संभाव्य घडामोडींचा अंतर्भाव असलेलं आहे. बानाच्या राजकीय महत्त्वाकांक्षेतून निर्माण होणारा हा संघर्ष ‘गुलाल’च्या महत्त्वाच्या उपकथानकांपैकी एक आहे. जेव्हा शहराच्या राजकारणाचा विचार केला जातो, तेव्हा विद्यार्थी संघटना आणि महाविद्यालयीन निवडणुका महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे इथल्या सत्तासंघर्षाचं आणखी एक फलित म्हणजे बानाने रणंजयला आपल्या बाजूने महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये लढवायला सांगणं. हा दुहेरी स्तरावर चालणारा सत्तासंघर्ष हा ‘गुलाल’मधील लाल रंगाला अधिक क्लिष्ट कंगोरे प्राप्त करून देतो. रणंजय आणि बानाशी असणार्‍या संबंधांमुळे दिलीपला या सगळ्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार हे काहीसं साहजिक ठरतं. बदलत्या राजकीय समीकरणांसोबतच चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेली पात्रंही बदलत जातात. नाही म्हणायला दिलीप शेवटपर्यंत कथेच्या (आणि परिणामी चित्रपटाच्या) केंद्रस्थानी असला तरी दरम्यानच्या काळात इतरही बरीच पात्रं स्पॉटलाइटमध्ये येतात. जात, धर्म, लिंग, संस्कृती, वारसा अशा शब्दांना अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रातील एका राज्यात कायद्याचं शिक्षण घेऊ पाहणारी व्यक्ती कायदा वेशीवर टांगला जाताना अनुभवते आणि स्वतः त्यात सहभाग घेते याहून मोठा उपरोध आणि विरोधाभास असूच शकत नाही. विरोधाभास हा इथल्या व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक आहे.

बानाचा भाऊ पृथ्वीच्या (पियुष मिश्रा) इतरांना असंबद्ध वाटणारी, मात्र प्रत्यक्षात चित्रपटाच्या विश्वाचा विचार करता स्फोटक असणारी त्याची गाणी ही ‘गुलाल’ला परिपूर्णत्व बहाल करणारी आहेत. पडद्यावरील पात्रांच्या आयुष्यात घडणार्‍या घडामोडी आणि संघर्षाचं काव्यात्म रूप असलेलं ‘आरंभ हैं प्रचंड’ चित्रपटातील पात्रांच्या मनातील राजकारणाचं समर्पक असं चित्र उभं करतं. (त्यांच्या राजकारणाची व्याख्या रक्तरंजित घडामोडी आणि धार्मिक रंगाशी जोडलेली आहे हा भाग वेगळा.) ‘शहर’ आणि ‘दुनिया’ या विश्वातील हेलावून टाकणार्‍या वास्तवाचं चित्र रेखाटतात. ज्यामुळे ‘गुलाल’मध्ये प्रतिबिंबित होणारे सामाजिक-राजकीय रंग अधिक गहिरे होत जातात. चित्रपटात रेखाटलं जाणारं, अंगावर येणारं गडद वास्तव त्याच्या परिणामात भर घालणारं ठरतं. शिवाय, या सगळ्या चित्रातून भारतीय समाजव्यवस्था आणि राजकारणाचा खरा चेहरा समोर येतो तो वेगळा.

‘गुलाल’ काही कश्यपचा सर्वोत्तम चित्रपट नाही. तो सर्वार्थाने परिपूर्णदेखील नाही. तरीही तो ज्या धाडसी वृत्तीने आणि परिणामकारक पद्धतीने राजकारण हाताळतो ते त्याला लक्षवेधी बनवतं. त्यामुळेच अलीकडील काळातील कल्ट म्हणाव्याशा चित्रपटांचा विचार करत असताना त्याला वगळून चालत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -