घरफिचर्सविखेंचा सु‘जय’, भाजपचा पराजय !

विखेंचा सु‘जय’, भाजपचा पराजय !

Subscribe

राजकारणातील बेरजेचे गणित प्रमाण मानत मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेशाचे गणित जुळवून आणले. डॉ. सुजय विखे उद्या निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्क्याने जिंकतीलही, तथापि, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांनी त्यांचा हट्ट अव्हेरण्याचे धाडस केले असताना भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची निष्ठा गौण मानून डॉ. सुजय यांना कमळावर स्वार करून घेतले. या घडामोडीत राजकीय महत्त्वाकांक्षेच्या शिखरावर पोहचलेल्या विखे यांचा विजय झाला असला तरी भाजप मात्र हरली, असे म्हटल्यास ते मुळीच वावगे ठरणार नाही.

दिग्गज काँग्रेस नेते अन् विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याचा सुपुत्र सत्ताधारी पक्षात जाणे आणि त्याच्यासाठी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पायघड्या टाकणे म्हटले तर चर्चा होणारच ना. नगरमध्ये बडे प्रस्थ मानल्या जाणार्‍या विखे घराण्यातील तिसर्‍या राजकीय पिढीतील शिलेदार डॉ. सुजय यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत खांद्यावर भाजपचा झेंडा घेतला. या घडामोडीत व्यक्ती म्हणून विखे यांच्या पदरात सन्मान पडला असला तरी भाजपच्या वाटेला निष्ठावंतांच्या भावना पायदळी तुडवण्याचा पराजय वाटेला आला. आधीच पाय रोवून असलेल्या भाजपला डॉ.सुजय यांचा प्रवेश ‘बुस्टिंग’ वाटत असले तरी विखे घराण्याचा दलबदलू लौकिक पाहता ते किती काळ कमळाभोवती रूंजी घालतील, अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे…..

- Advertisement -

नगर जिल्ह्याच्या राजकारणात वजनदार म्हणून गणल्या जाणार्‍या विखे घराण्यातील डॉ. सुजय या ताज्यातव्याने नेत्याने हातातील पंजा निशाणीचे नामोनिशाण मिटवत भाजपच्या कमळाभोवती रूंजी घालण्याचा निर्णय घेतला. राजकीय अंगाने पाहता डॉ. सुजय यांचा निर्णय मुळीच धक्कादायक नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जाहीर केलेली भूमिका व तदनुषंगिक केलेली वाटचाल बघता आता झालेला निर्णय अपेक्षितच होता. विखे घराण्याचे राजकीयदृष्ठ्या महत्त्व लक्षात घेऊन थेट राज्याच्या मुखियाने डॉ. सुजय यांचा भाजप प्रवेश घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. डॉ. सुजय विखे यांनी राजकीय कुस बदलल्याचा लाभ भाजपला नक्की मिळणार असला तरी गेली अनेक वर्षे पक्षनिष्ठा ठेऊन असलेल्या दिलीप गांधी यांच्यासाठी ती वेदनादायी बाब ठरली नसल्यास नवलच. मुळात दिलीप गांधी यांनी गतवेळी नगरची जागा लक्षणीय मतांनी जिंकली असताना विखेंच्या प्रवेश मुद्यावर त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते.

पण राजकारणातील बेरजेचे गणित प्रमाण मानत मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेशाचे गणित जुळवून आणले. डॉ. सुजय विखे उद्या निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्क्याने जिंकतीलही, तथापि, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांनी त्यांचा हट्ट अव्हेरण्याचे धाडस केले असताना भाजपने विद्यमान खासदाराची निष्ठा गौण मानून डॉ. सुजय यांना कमळावर स्वार करून घेतले. या घडामोडीत राजकीय महत्त्वाकांक्षेच्या शिखरावर पोहचलेल्या विखे यांचा विजय झाला असला तरी भाजप मात्र हरली, असे म्हटल्यास ते मुळीच वावगे ठरणार नाही.

- Advertisement -

मराठी मुलखात राजकीय घराण्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या घराण्यातील सुभेदारांनी गल्ली ते दिल्लीतील सत्तास्थाने काबीज करून विशिष्ट पक्षांचे बस्तान बसवण्यात निर्णायक भूमिका वठवली. राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सहकार या क्षेत्रांमध्ये बिनीचे स्थान असलेल्या नगर जिल्ह्यातील विखे-पाटील हे घराणे त्यापैकीच एक. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे, बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे ही दमदार नेतृत्वाची फळी या घराण्याशी निगडित आहे. पैकी बाळासाहेब विखे यांनी राजकीयदृष्ठ्या लक्षणीय लौकिक प्राप्त करून स्वत:चे नाव थेट राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचवले होते. मात्र, राजकारणात शरद पवार विरोधक म्हणून असलेली छबी त्यांना त्या पदापर्यंत नेण्यातील मुख्य अडथळा ठरला. अगदी प्रारंभीपासून विखे-पवार यांच्यामध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते राहिले.

विखे यांचा दोस्ताना नांदेडच्या चव्हाण घराण्यासोबत राहिला. शंकरराव चव्हाण यांच्या मर्जीतील नेता अशी विखे यांची ख्याती होती. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तब्बल साडेतीन दशके बाळासाहेब विखे खासदार होते. पण लोकलेखा समिती अध्यक्ष पदापलीकडे त्यांच्या पदरी कधीच काही पडले नाही. हा काळ त्यांना पक्षांतर्गत संघर्षात घालवावा लागला. १९८० च्या दशकात शंकरराव चव्हाण, बाळासाहेब विखे आणि बी. जे. खताळ यांनी काँग्रेसमध्ये एक दबावगट तयार केला होता. त्याला ‘मसका काँग्रेस’ नावाने ओळखले जाई. विके ‘मसका’चे प्रदेशाध्यक्ष होते. शंकरराव चव्हाणांची ही पाठराखण बारामतीकरांच्या आसुयेचा भाग बनली आणि आजवर त्याचे दृश्यादृश्य पडसाद उमटत राहिले.

राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना बाळासाहेब विखे यांनी खासदारांचा एक दबावगट तयार केला होता. त्यासाठी ‘आम्ही पक्षात लोकशाही आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे’, असे समर्थन त्यावेळी करण्यात आले. मात्र, पक्षनेतृत्वाला ही बाब रूचली नाही आणि बाळासाहेब विखे नेतृत्वाच्या मर्जीतून उतरले. त्याचा पहिला फटका १९९१ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांना बसला. पक्षाने त्यांना थेट तिकीट नाकारून शरद पवार समर्थक यशवंत गडाखांना मैदानात उतरवले. मग अहंभाव दुखावलेल्या विखेंनी नेतृत्वाविरोधी शड्डू ठोकत अपक्ष उमेदवारी जाहीर केली.

पवारांनी गडाखांच्या विजयासाठी प्रयत्नांची शर्थ करून विखेंचा पराजय घडवून आणला. मात्र, विखे यांनी पवारांच्या वादग्रस्त भाषणाचा आधार घेत त्यांच्यासह गडाखांना उच्च न्यायालयात खेचले. हा खटला राज्यभर गाजला. न्यायालयाने गडाख यांची निवड रद्द करून पवारांवर ताशेरे ओढल्याने विखे आनंदले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने पवारांना दिलासा दिला. पण तेव्हापासून विखे-पवार यांच्यातील वैर शिगेला पोहचले आणि त्याचे प्रत्यंतर राज्याच्या राजकारणात वेळोवेळी आले. आताही पवारांनी नगरच्या जागेबाबत न केलेली तडजोड त्याचेच प्रत्यंतर देणारी मानली जात आहे.

महाराष्ट्रात १९९५ मध्ये सेना-भाजपचे सरकार आल्यानंतर बाळासाहेब आणि राधाकृष्ण या विखे पिता-पुत्रांनी ‘मातोश्री’चरणी लीन होत हाती भगवे कंकण बांधले. त्याची बक्षिसी म्हणून बाळासाहेब विखेंना केंद्रात प्रथम अर्थराज्यमंत्रीपद व नंतर अवजड उद्योगमंत्रीपद बहाल करण्यात आले, तर राधाकृष्ण हे राज्यात कृषीमंत्री झाले. मात्र, युतीची सत्ता जाताच विखेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत पुन्हा काँग्रेसच्या पालखीचे भोई बनण्यात धन्यता मानली. म्हणूनच एवढ्यात झालेला डॉ. सुजय यांचा भाजप प्रवेश कोणाला आश्चर्यजनक वाटला नाही. कारण चालत्या गाडीत बसणार्‍या घराण्यांपैकी विखे मानले जातात. एवढेच कशाला, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद उपभोगणार्‍या राधाकृष्ण विखे यांची मुख्यमंत्र्यांच्या खिशातील विरोधी पक्षनेता म्हणून खिल्ली उडवली जाते ती उगाचच नव्हे. विखे यांचे मुख्यमंत्र्यांशी साटेलोटे आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते देखील भाजपच्या तंबूत दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षाला लागलेली घरघर, नेतृत्वाचा अभाव, राज्यात युतीची घट्ट होत असलेली पाळेमुळे यांसह इतर राजकीय कारणांमुळे आता पुत्राने घेतलेल्या निर्णयाचा कित्ता राधाकृष्ण यांनी गिरवल्यास नवल ते काय.

विखे घराण्यातील राजपुत्र खासदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरली नसल्यासच नवल. भविष्यातील बेरजेचे राजकारण लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीने ‘संकटमोचक’ तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना विखेंची आणि भाजप यांच्यातील सेतुबांधणीची धुरा सोपवली. मग महाजन यांनी नेहमीप्रमाणे कामगिरी फत्ते करून मुख्यमंत्र्यांची आणखी एक शाबासकी मिळवली आणि पाहता-पाहता विखे यांचा पक्षप्रवेश दिमाखदार सोहळ्यात करण्यात आला. आता यामागे विखे यांना उमेदवारी पलीकडे काही आश्वासन देण्यात आले का, हे गुलदस्त्यात आहे. काहीही असले तरी विखे यांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री कमालीचे खूश जाणवले. त्यांची देहबोली बडा मासा गळाला लावल्याचे समाधान देणारी जाणवली. भाजपला एक-एक जागा महत्त्वाची असल्याने विखे यांच्या येण्याने जणू नगर जिंकल्याचे समाधान मुख्यमंत्र्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहताना दिसले.

आता प्रश्न राहिला तो डॉ. सुजय यांच्या प्रवेशाचा भाजपला कितपत लाभ होणार, तसेच काँग्रेसला ते किती हानीकारक ठरणार? मूळात विखे काँग्रेसमध्ये होते, तरीही नगर काय किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघ काय, तिथे काँग्रेस आघाडीला सलग दोन टर्म अपयशच पहावे लागले. एवढ्यात झालेल्या नगर महापालिका निवडणुकीतही काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. याचा अर्थ विखे यांच्या नेतृत्वाचा गेल्या लोकसभा अथवा महापालिका निवडणुकांत आघाडीला कितपत फायदा झाला, हा संशोधनाचा विषय बनावा. तद्वतच विखेंच्याच साम्राज्यात सेना-भाजप युती घट्ट पाय रोवून उभी आहे. दिलीप गांधी यांनी सलग दोन वेळा नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचा झेंडा दिमाखात फडकावत ठेवला आहे.

आताच्या राजकीय घडामोडींचा स्पष्ट अर्थ असा की, डॉ. सुजय यांच्या भाजपमध्ये जाण्याचा काँग्रेसला फार फरक पडणारा नाही. केवळ भाजपची पाळेमुळे घट्ट होण्याची त्यामुळे शक्यता निर्माण झाली आहे. विखे यांच्या महत्त्वाकांक्षेला फुंकर घालताना भाजपने निष्ठावंत स्वकीयांचे दुखणे दुर्लक्षित केले. डॉ. सुजय यांच्या पक्ष प्रवेशावेळी गांधी यांची असलेली अनुपस्थिती आणि त्यानंतर वृत्तवाहिन्यांना त्यांनी दिलेली प्रतिक्रिया द्यायचा तो संदेश देऊन गेली. याचा सर्वांगाने अर्थ काढावयाचा झाला तर या राजकीय घडामोडीत डॉ. सुजय जिंकले तर भाजप पराभूत झाला. शिवाय, काँग्रेसमुक्त भारताची भाषा करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप काँग्रेसयुक्त तर होऊ पाहत नाही ना, अशी भीती निष्ठावंत भाजपेयींनी व्यक्त केल्यास ती उचित नाही म्हणणे अगदीच अव्यवहार्य ठरेल, एवढेच !

-मिलिंद सजगुरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -