घरफिचर्ससंपादकीय : स्वस्त मरणाची निर्दयी रेल्वे!

संपादकीय : स्वस्त मरणाची निर्दयी रेल्वे!

Subscribe

कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें?                                                                                            कशासाठी उतरावे तंबू ठोकून?                                                                                              कोण मेले कोणासाठी रक्त ओकून?                                                                                        जगतात येथे कुणी मनात कुजून!                                                                                              तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे?

दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून.
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून,
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे!

- Advertisement -

अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी,
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी.
देई कोण हळी, त्याचा पडे बळी आधी,
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे….

सामना चित्रपटातील या गाण्यातील आरती प्रभू यांच्या ओळी आजही पाच दशकानंतर माणसांच्या वेदना, त्यांची दुःखे, जगण्याची धडपड, मृत्यू या सार्‍यांच्या खोल दरीत घेऊन जातात. आरती म्हणतातही रक्त ओकून माणसे मरतात तरी येथे गुलाब कसे फुलतात…जगण्याच्या शर्यतीत मरण स्वस्त झाले असले तरी रोज माणूस या शर्यतीत का उतरतोय…मरणाला आव्हान देऊन. हे आव्हान आहे की अगतिकता? कोणी याला स्पिरिट वैगरे म्हणत असेल तर हे सगळे साफ खोटे आहे. माणसांचं मरण स्वस्त झालंय. गावकुस आणि खेडी ओस पडलीत आणि भारतभराचा माणूस जगण्यासाठी मुंबईत येऊन रोज मरतोय…रेल्वेखाली. खरंतर मुंबई उपनगरीय रेल्वेने आमच्याकडे मरण स्वस्तात मिळेल, असे बोर्ड लावायला काहीच हरकत नाही. तितका निर्दयीपणा रेल्वेमंत्री पियुष गोयल, वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे प्रशासन यांच्यात तर नक्कीच आलाय. अन्यथा गेल्या ५ वर्षांत मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर मिळून १६ हजारपेक्षा माणसे मरण पावत असताना रेल्वे इतकी मुर्दाड कशी? कोणालाच काही कसे वाटत नाही. लोकांना मरणाच्या दारी आणून सोडत शांत निवांत बसलेल्या एखाद्या मंत्र्याचा मुलगा किंवा एका अधिकार्‍याची मुलगी रेल्वे अपघातात गेली तर एवढे स्वस्त मरण त्यांनी फक्त अश्रू गाळून निमूटपणे सहन केले असते? मग त्यांना सविता नाईक हिच्या वडिलांचा आक्रोश का ऐकू येत नाही. पाच जणांच्या नाईक कुटुंबातील घरातील एकुलती एक कमावती मुलगी मध्य रेल्वेवर प्रचंड गर्दीच्या चालल्या लोकलच्या दरवाजातून खाली पडून मरण पावली. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील गर्दीतून वाट काढत तिने कशीबशी लोकल पकडली, पण गर्दीमुळे तिला डब्यात आत शिरता आले नाही. प्रचंड गर्दीच्या रेट्यामुळे ती लोकलमधूम खाली पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. नाईक कुटुंब उघड्यावर पडले. तिच्या कुटुंबाचा आक्रोश डोंबिवली सोडून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या कानी गेला नाही. कदाचित ते फलाटावर वायफाय, लिफ्ट, फूट ओव्हर ब्रिज, मोफत पाणी अशा सेवा देण्यासाठी बैठका घेत असतील किंवा रेल्वे स्टेशन चकाचक कशी दिसतील याचेही चिंतन करत असतील किंवा गेला बाजार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेल्या बुलेट ट्रेनचा आराखडा तयार करत असतील. एकूणच ते रेल्वेच्या विकासासाठी १२ तास काम करत असतील…यामुळे स्वस्तात मरण पावलेल्या सविताच्या वडिलांनी आपल्या मुलीचा निपचित देह पाहिल्यानंतर फोडलेला हंबरडा त्यांच्या कानी कसा जाणार? भारताला जागतिक महाशक्ती बनवायचे भाषण भाजपला निवडणुकीत मतदान मिळवून देण्यासाठी युवकांना आकर्षित करलेही, पण याच युवकांपैकी एक असलेली सविता नव्हती काय? मुंबई उपनगरीय रेल्वेने भारताची रेल्वे पोसायची, पण हा पोशिंदा रोज मेला तरी चालेल. यावर कोणाला आंदोलन करावेसे वाटत नाही. जन आशीर्वाद, महा जनादेश आणि संघर्ष यात्रा निवडणुका जिंकण्यासाठी काढणे फायद्याचे आहे. कारण निवडणुका जिंकून आपल्या सात पिढ्यांसाठी कमवून ठेवायचे आहे. सविता नाईक मेली म्हणून त्यात काय एवढे? अशा सविता नाईक रोज मेल्या पाहिजेत. लोकल रेल्वे अपघातात गेल्या गुरुवारी एकाच दिवशी १६ जणांचा मृत्यू झाला. वर्षाला ३ हजारपेक्षा माणसे मरण पावतात, ५ हजारांहून अधिक जखमी होतात. हे जखमीपण म्हणजे कायमचे मरण. रोज मरत, मरत जगणे. त्यापेक्षा एकदाच मरण पावलो असतो तर या मरणयातना रोज मला आणि माझ्या कुटुंबाला भोगाव्या लागल्या नसत्या, अशा मरण नरकातून जाणारे हजारो जखमी आपल्या आजुबाजूला रेल्वेचे भोग भोगत आहेत. तरीही गुलाब येथे फुलणार?
मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे… ही नामदेव ढसाळ यांच्या कवितेतली मुंबई आजही तशीच आहे.
मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे
ये व माझा स्वीकार कर…
ही कविता लिहिताना परिस्थितीनुसार पहिल्यांदा नामदेव ढसाळ यांना उद्ध्वस्तपणाची जाणीव झाली आणि ढसाळांच्या आयुष्याला व्यापून टाकलं. त्यातूनच ढसाळांची कविता जन्माला आली, जिने जातीप्रथेविरुध्द, परंपरेविरुध्द, सामाजिक अन्यायाविरुध्द आवाज उठवला. ढसाळांचा हा आवाज आजही फक्त आवाज बनून राहिलाय. परिस्थिती तशीच. नाही तर सविताच्या वडिलांना धाय मोकलून आज का रडावेसे वाटले असते? सविताचे वडील तरी रडले. त्यांचे मन थोडे तरी मोकळे झाले, पण ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम यांच्या डोळ्यातील अश्रू तर गोठून गेले आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा कबीर रेल्वे प्रवास करत असताना बाहेरून फेकून मारलेला दगड वर्मी बसल्याने मरण पावला होता…आपल्या आप्तजनांच्या विरहाचे दुःख भोगायला मागे राहिलेल्या नाईक, लागू कुटुंबाच्या अश्रूंना काही किंमत आहे की नाही? पियुष गोयल सांगा…आरती प्रभू म्हणतात ते मग बरोबर आहे. दोन डोळे, दोन काचा आणि दोन खाचा…येथे प्रश्न कुठे येतो आसवांचा…आज रोज उपनगरीय लोकलमधून मध्य आणि हार्बर रेल्वेवर ४५ लाख लोक प्रवास करतात, तर पश्चिम रेल्वेवर ३५ लाख माणसांचा प्रवास होतो. याच माणसांच्या जीवावर आज रेल्वेचा मोठा खर्च भागतो, पण पोट जाळण्यासाठी रोज जगायला बाहेर पडणार्‍या माणसांच्या जीवाचा भरवसा काहीच नाही. गाडी सुरू झाल्यानंतर लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, याची चर्चा होते, पण मार्ग निघत नाही. रेल्वेने जवळपास बहुतेक फाटके बंद केली, पण फलाटावरून उड्या मारून जाणार्‍या माणसांना अजून रोखता आलेले नाही. दरवाजे अडवून ठेवणार्‍या लोकांवर तात्पुरती कारवाई होते, पुढे ठप्प. लोकल रेल्वेच्या बाजूला उभ्या असलेल्या ८ हजारांच्या वर अनधिकृत झोपड्या तुम्हाला आम्हाला दिसतात, पण रेल्वेला दिसत नाही. नोटिसा देऊन मोकळे होतात, पण कारवाई शून्य. वाढते गर्दुल्ले, हिजड्यांचा हैदोस, माजलेले भिकारी, दादागिरी करणारे फेरीवाले रेल्वेला दिसत नाही. मग सर्व १५ डब्यांच्या गाड्या आणि त्यासाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा हव्यात, हे तरी पियुष गोयल यांना कसे दिसणार? पियुषजी, आपण मुंबईकर आहात, आपल्याला मुंबईकरांच्या जगण्याची घुसमट माहीत आहे. याआधीच्या बिहार, उत्तर प्रदेशच्या रेल्वेमंत्र्यांना मुंबईकर रोज मेल्याचे सोयरसुतक नव्हते. किमान तुम्ही तरी सविता नाईकच्या वडिलांचा हंबरडा ऐका…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -