घरफिचर्समाझ्या माहेरचा गणेशोत्सव !

माझ्या माहेरचा गणेशोत्सव !

Subscribe

शंभर वर्षांची परंपरा असलेला हा गणेशोत्सव आजही लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने सुरू केला होता, त्या हेतूपासून तसूभरही ढळला नाही. आज गणेशोत्सवाच्या नावाने जो व्यापार मांडला जातोय, जे राजकारण खेळलं जातय, जे अर्थकारण ढवळलं जातय त्यापासून आमचं मंडळ कोसो मैल दूर आहे. आमचा गणेशोत्सव म्हणजे नितांत श्रद्धा, मांगल्य आणि त्या विघ्नहर्त्याचं मनोभावे पूजन.

“सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर
तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर”

नदीची ही कथा, तर सासरी गेलेल्या आम्हा मुलींचं काय होत असेल! आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर माहेरची ओढ तसूभरही कमी होत नाही. आता तर आई-वडीलही नाहीत. पण माहेर तुटलं नाहीच; कारण आमची इंद्रवदन सोसायटी… आजही आम्ही त्याच ओढीने माहेरा जातो त्याला कारण आहे ते म्हणजे माझ्या माहेरचा गणेशोत्सव. यंदा शतकमहोत्सवी गणेशोत्सव साजरा होतोय आणि या शतगुणित आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हा माहेरवाशिणींना खास सांगावा धाडलाय. तेव्हापासून माझ्या आठवणींची गाडी भरधाव वेगात निघालीय.शंभर वर्षांची परंपरा असलेला हा गणेशोत्सव आजही लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने सुरू केला होता, त्या हेतूपासून तसूभरही ढळला नाही. आज गणेशोत्सवाच्या नावाने जो व्यापार मांडला जातोय, जे राजकारण खेळलं जातय, जे अर्थकारण ढवळलं जातय त्यापासून आमचं मंडळ कोसो मैल दूर आहे. आमचा गणेशोत्सव म्हणजे नितांत श्रद्धा, मांगल्य आणि त्या विघ्नहर्त्याचं मनोभावे पूजन. त्यासाठी आम्हाला आज २०१८ सालीही भव्य मूर्तीची गरज भासत नाही की डोळे दिपवणारी रोषणाई लागत नाही, की गल्लाभरू देखावा पडद्यामागे झाकावा लागत नाही. मध्यम उंचीची मोहक, सुबक मूर्ती, डोळ्यांना सुखावणारी आरास हे वैशिष्ठ्य आहे आमच्या गणेशोत्सवाचं.

- Advertisement -

स्थानिक कार्यक्रम, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी घेण्यात येणार्‍या स्पर्धा आणि रात्रीची आरती आजही आमच्यासाठी सुखाची निधानं आहेत. या व्यासपीठाने अनेक कलाकार घडवले. अनेक खेळाडू उदयाला आले आणि जो काही आनंद दिलाय तो शब्दातीत आहे.‘सार्वजनिक गणेशोत्सव’ हे नावापुरतंच, प्रत्येकजण आपला ‘घराचा गणपती’ समजूनच इथे झोकून देतो. कार्यकर्त्यांची फौज तर अहोरात्र झटत असते. मला खास काय भावतं तर पिढ्यान्पिढ्या हा चालत आलेला वारसा तितक्याच तोलामोलाने पुढे चालवला जातोय.आजचे “नेटिझन्स” गणेशोत्सवात “चाळकरी ” बनतात. कार्यक्रमांचा दर्जाही सातत्याने टिकवून ठेवणं सोपं नाही. पण कुठेही आजतागायत सवंगता आणली नाही. मराठी अस्मितेला धक्का पोहोचवला नाही.

यंदा साजरा होणारा शतक महोत्सवी गणेशोत्सव ही इंद्रवदन सहनिवासातील रहिवाशांसाठी अभिमानाची गोष्ट आहेच, पण संपूर्ण दादरच काय मुंबईसाठीही भूषणास्पद गोष्ट आहे. आज घरात जिथे दोन माणसांतला संवाद हरवलाय तिथे १५० घरांनी एकत्र येऊन उदंड उत्साहात शंभर वर्षे गणेशोत्सव साजरा करणं ही केवढी मोठी गौरवास्पद गोष्ट आहे आणि ती माझ्या माहेरच्या अंगणात साजरी होते, याने माझा ऊर अभिमानाने भरून येतोय. सहनिवासातील एकोपा, आदर, सलोखा, जिव्हाळा माहेरवाशिणींना गणेशोत्सवासाठी अगदी थेट परदेशातूनही खेचून आणतो. माझी गत तर विठूमाऊलीच्या ओढीने निघालेल्या वारकर्‍यासारखी होते. वर्षातून एकदा माहेरच्या गणेशोत्सवाची वारी केली की संपूर्ण वर्ष तो सुखकर्ता दु:खहर्ता मला आनंदात ठेवतो ही माझी मनस्वी श्रद्धा आहे.

- Advertisement -

तुम्हालाही विनवते

“माझिया माहेरा या”


– नीलम मुरलीधर जोशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -