घरफिचर्सदिलगिरी कसली; हा तर इंदुरीकरांचा उद्दामपणा!

दिलगिरी कसली; हा तर इंदुरीकरांचा उद्दामपणा!

Subscribe

‘नवसे कन्यापुत्रे होती । तरी का करणे लागे पती‘ असे ठणकावून सांगून जनतेला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढणार्‍या संत तुकाराम महाराजांची परंपरा जपणारा वारकरी संप्रदाय आजही प्रबोधनाचा वसा जपतोय. सामाजिक असमता, भोंदूगिरीविरोधात साडेसातशे वर्षांपूर्वी वारकरी संतांनी आरोळी ठोकली. संत नामदेव, संत ज्ञानदेव ते वारकरी संप्रदायाचे कळस म्हणून ओळखल्या गेलेल्या तुकाराम महाराजांनीदेखील अंधश्रद्धेविरोधात जोरदार जागरण केले. जुन्या रुढी-परंपरा आणि देवा-धर्माच्या नावाने समाजाचे शोषण करणार्‍यांविरोधात या संतांनी अक्षरश: कोरडे ओढले. त्यांनी केलेल्या समाजमनाच्या मशागतीमुळेच महाराष्ट्रात सुधारणावादी विचारांची पेरणी झाली. संत जनाबाईंनी ‘स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास । साधू संता ऐसे केले जनी॥ असा आशावाद जागवला. ही परंपरा पुढे चालवण्याची जबाबदारी आता ज्यांना मोठ्या जनसमुदायाने डोक्यावर उचललेले आहे त्या कीर्तनकारांवर आहे आणि ती बखुबी उचललीही जातेय. पण त्यातील मोजके काही कीर्तनकार काहीबाही बरळतात, नको तेथे त्यांची जिभ घसरते आणि त्यानंतर सुरू होते त्यांच्या समर्थक- विरोधकांमध्ये वाक्युद्ध. सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचीही जिभ अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी घसरली. ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्रीसंग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते.’ असे विधान करत त्यांनी थेट प्रसवपूर्व परीक्षणतंत्र कायद्यालाच आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी समितीने इंदुरीकरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तरही इंदुरीकर महाराजांनी दिले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे पत्र सोशल मीडियावर पसरवले जात आहे. पण या पत्राचे वाचन करता त्यात इंदुरीकरांना आपल्या विधानाचा अजिबातच पश्चाताप झालेला दिसत नाही. उलटपक्षी वादग्रस्त विधानानंतर इंदुरीकर महाराज आता वेगवेगळी भावनिक वक्तव्ये करुन आपल्या बाजूने जनमत वळवू पाहताहेत. माध्यमांनी आपले विधान विपर्यास करुन दाखवले आणि त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे महाराजांनी म्हटले आहे. म्हणजे चुका स्वत: करायच्या आणि त्याचे खापर माध्यमांवर फोडून मोकळे व्हायचे. म्हणूनच इंदुरीकरांची कथित दिलगिरी ही दिलगिरी नसून तो उद्दामपणाच म्हणावा लागेल.मुळात भागवतधर्म वा वारकरी पंथ हा प्रचंड सहिष्णू आहे. तो बदलाचा पाईक आहे. प्रामाणिकपणा हे वारकरी संप्रदायाचे बलस्थान आहे. त्यामुळेच झालेली चूक प्रामाणिकपणे मान्य करुन इंदुरीकरांनी आपले समाज प्रबोधन पुढे सुरू ठेवणे अपेक्षित होते. तसे न करता आपण धर्मग्रंथांचा आधार घेऊन अभ्यासपूर्ण वक्तव्य केले असल्याचा दावा करत ते अजूनही कायद्याला अमान्य करताना दिसत आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणे अटळ आहे. अर्थात त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीने त्यांचे समर्थक कमालीचे अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता सध्या इतकी वाढलेली दिसतेय की ते इतरांचे म्हणणेदेखील ऐकून घ्यायला तयार नाहीत. इतकेच काय तर कुणी इंदुरीकरांच्या चुकीच्या विधानाकडे अंगुलीनिर्देश केले तरीही त्याला समाजमाध्यमांवर ट्रोल केले जात आहे. पण कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहणार आहे का? इंदुरीकरांच्या या वादग्रस्त प्रवचनाचे सर्वप्रथम वृत्त ‘आपलं महानगर’ने प्रसिद्ध केले होते. त्यात पीसीपीएनडीटी कायद्याचे कसे उल्लंघन इंदुरीकरांच्या कीर्तनातील काही विधानांमुळे झाले आहे, याविषयीची माहिती देण्यात आली होती. असंख्य समर्थक असलेल्या इंदुरकरांकडून चुटकीभर जरी चूक झाली तरी ती विषासारखी पसरायला वेळ लागणार नाही. कारण त्यांचे अनुकरण करणारी असंख्य मंडळी आहे. याच भावनेतून ‘आपलं महानगर’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. पण अजूनही इंदुरीकरांसह त्यांची समर्थकमंडळी कायदेभंगाची बाब मानायलाच तयार नाही. इंदुरीकरांनी काही धर्मग्रंथांतील माहितीचा उल्लेख केल्याचा दावा केला जातोय. धर्मग्रंथातील एखादी माहिती जर सांप्रतकाळात नीतीमत्तेच्या आणि कायद्याच्या कसोटीत बसत नसेल तर केवळ धर्मग्रंथात म्हटले म्हणून त्याचा उदोउदो करायचा? इंदुरीकरांच्या बाबतीतही तेच झाले आहे. आपण अभ्यास करुनच बोलल्याचे ते आजही दावा करत आहेत. इतकेच नव्हे तर आयुर्वेदातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातही असे संदर्भ आढळत असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. मुळात हे केवळ संदर्भ म्हणून देण्यात आले आहेत. त्याला शास्त्रीय आधार असल्याचे कोठेही म्हटलेले नाही. शिवाय हे संदर्भ ज्या ठिकाणी देण्यात आले आहेत, त्याच ठिकाणी पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन कसे होते याचीही माहिती उधृत करण्यात आली आहे. म्हणजेच या संदर्भाचा सल्ला म्हणून उपयोग होता कामा नये याचा इशाराच अभ्यासक्रमात देण्यात आलाय. त्यामुळे आयुर्वेदातील या अभ्यासक्रमाचा आधार घेऊन कुणी जर इंदुरीकरांच्या चुकांवर पांघरुन घालत असेल तर तो प्रयत्न कदापिही यशस्वी होऊ शकणार नाही. इंदुरीकर समर्थकांनी वादाचे मूळ काय आहे हेदेखील शांतचित्ताने समजून घेणे गरजेचे आहे. महिला अत्याचाराचे मूळ आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत दडले आहे. म्हणूनच स्त्री पुरुष समानतेची बीजे रोवली की असे प्रकार घडणार नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारने वेळोवेळी कठोर पावले उचलली आहेत. मुलगा आणि मुलगी या दोघांना समसमान दर्जा मिळावा म्हणून विविध व्यक्ती आणि संस्थांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. शतकानुशतकांपासून लिंगभेद मिटविण्यासाठी सुरु असलेल्या संघर्षाला आता कुठे यश येताना दिसत आहे. त्यातच जर मुलगा वा मुलगी होण्यासाठीच्या काळात जमा झालेल्या संकल्पना पुढे आणल्या तर त्यातून पुन्हा एकदा विषाचे बीज रोवले जाईल. हळूहळू हा प्रकार वाढत जाऊन त्यातून स्त्रीभ्रूणहत्येसारखे गंभीर प्रकार वाढण्याची भीती आहे. स्त्री-पुरुष भेदाची मुळे समाज प्रबोधन करणार्‍यांनीच जर पायदळी तुडवली, तर त्यांचे अनुकरण करणार्‍यांकडून सत्कर्माची अपेक्षा तरी कशी करणार? या मंडळींकडून लिंगसमानता आत्मसात करणे तर दूरच, उलट अशा महाराजांच्या सान्निध्यात येणार्‍या प्रत्येकाला सम आणि विषम तारखांची गणिते आपल्या वंशाला दिवा देण्यासाठी अधिक सोयीची वाटू लागतील. मग अशी वक्तव्ये हा समस्त स्त्री जातीचा अपमान नव्हे काय? असे विघातक विधान एखाद्या महाराजाने केल्यानंतर दुसरा त्याची पुढची पायरी गाठण्यास तयारच असतो.‘मासिक पाळीत स्वयंपाक करणार्‍या महिला पुढील जन्मी कुत्र्यांचा जन्म घेतील व त्यांच्या हातचे खाणारे बैल जन्म घेतील’ असे बेताल वक्तव्य करत कृष्णस्वरुपदास नावाच्या एका साधूने विकृतीचा कळस गाठला आहे. त्यामुळे अशा बुवा-बाबा आणि महाराजांना वेळीच अटकाव होणे गरजेचे आहे. इंदुरीकर महाराज प्रकरणी यापुढे प्रशासनावरील जबाबदारी वाढली आहे. राजकीय मंडळी मतपेटीकडे लक्ष ठेवत ठोस भूमिका घ्यायला तयार दिसत नाही. किंबहुना काही नेते तर केलेल्या विधानाकडे दुर्लक्ष करत इंदुरीकरांचे समर्थन करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे प्रशासनाने सामाजिक दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे चौकशी करणे गरजेचे आहे. जेणेकरुन यापुढील काळात कायदेभंग होईल, अशी विधाने करण्यास कुणी धजावणार नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -