गिरणी , कारखान्यांची मुंबई आता कॉर्पोरेट झाली

मुंबई भारताचं आर्थिक इंजिन असणारं शहर. महाराष्ट्र आणि केंद्राला मुंबईतून दरवर्षी ४० हजार कोटींपेक्षा अधिकचा कर मिळतो. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा भारतातील ९ राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही मोठा आहे. जगातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये मुंबईचा १२ वा क्रमांक लागतो. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये मुंबईचा वाटा ८७ टक्के एवढा आहे. मुंबई आणि आसपासच्या विभागातून ३६८ बिलियन (भारतीय रुपयांमध्ये) ची भर राज्याच्या जीडीपीमध्ये पडते.

Mumbai

मुंबईला १९९० पर्यंत मँचेस्टर ऑफ द इंडिया म्हटले जायचे. दत्ता सामंत यांनी पुकारलेल्या संपानंतर टेक्सस्टाईल मिल बंद होत गेल्या. गिरणी बंद झाल्यानंतर त्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. इथूनच मुंबईचे रुपडे बदलण्याची सुरुवात झाली. गिरण्यांच्या जागेवर आता सेवा क्षेत्राचे कॉर्पोरेट जाळे उभे राहिले. मल्टिप्लेक्स, आयटी सर्विसेस देणारी कार्यालये उभे राहिली. टेक्सस्टाईल इंडस्ट्री अशी ओळख असलेल्या मुंबईचे हळू हळू सर्विस इंडस्ट्रीत रुपांतर झाले, त्यानंतर मुंबई रिअल इस्टेटच्या क्षेत्रासाठी ओळखली जाऊ लागली. एकेकाळी कामगारांसाठी ओळखली जाणारी मुंबई आता व्हाईट कॉलर जॉब्ससाठी ओळखली जाऊ लागली.

फायनान्स सेक्टर

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज हे मुंबईत असल्यामुळे भारतीय स्टॉक मार्केटवर मुंबईचा दबदबा राहिलेला आहे. भारतीय कॉर्पोरेट सेक्टरमध्ये या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजचा हिस्सा हा जवळपास ९२ टक्के एवढा आहे. आर्थिक बाजारपेठेतील मोठे खेळाडू जसे की, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (FIIs), टर्म लेडिंग इन्स्टिट्यूशन्स, मर्चंट बँकर्स, ब्रोकिंग हाऊसेस मुंबईत आहेत. ८० टक्के म्युचअल फंड हे मुंबईत नोंदणी केले जातात. ९० टक्के मर्चंट बँकिंग व्यवहार हे मुंबईत घडत असतात.

आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटर मुंबईला मिळावे, अशी चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. लंडन, सिंगापूर इथे आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटर आहेत. अशा सेंटरमुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारांना चालना मिळते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात गुजरात येथे असे फायनान्स सेंटर होणार असल्याचे सांगितले. मात्र मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये प्रस्तावित असलेल्या सेंटरला अजूनही मुहूर्त मिळाला नाही. जर हे फायनान्स सेंटर मुंबईत झाले तर मुंबईसहीत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेग्युलेटरी एजन्सीसचे (नियामक संस्था) मुख्यालय मुंबईत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्था मुंबईत आहेत. दुसरं असं की, योग्य वित्तीय सेवा देण्यासाठी कौशल्यावर आधारीत असलेलं मनुष्यबळ आणि कामासाठी योग्य वातावरण या दोन्ही गोष्टी मुंबईत उपलब्ध आहेत. या महानगरात इंग्लिश बोलणार्‍यांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. तसेच व्यवस्थापन कौशल्य असलेल्यांची देखील इथे कमतरता नाही. मुंबईत एमबीए, चार्टर्ड अकाऊंटंट, कायदे सल्लागार आणि रिसर्च प्रोफेशनल्स मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट क्षेत्राला मुंबईत व्यापार करणं कधीही सोयीचं वाटतं.

आयटी सेक्टर
मुंबईच्या बदलत्या कॉर्पोरेट विश्वात आयटी सेक्टरचा खूप मोठा वाटा आहे. १९९० साली आयटी प्रॉडक्ट्सची (सॉफ्टवेअर) निर्यात १ टक्का होती. ती २००१ मध्ये वाढून १८ टक्के झाली होती. तर २०१७-१८ रोजी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या वार्षिक अहवालानुसार भारताने एकूण १०८.४ बिलियन (डॉलरमध्ये) सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्सची निर्यात केली होती. बंगळुरु शहरात मुंबईपेक्षा अधिक सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. मुंबईतील सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (सीप्झ), वाशीमधील इन्फोटेक पार्क आणि नवी मुंबईत अनेक आयटी कंपन्या कार्यरत आहेत.

जेम्स आणि ज्वेलरी सेक्टर
मुंबई ही भारताची ज्वेलरी इंडस्ट्रीचे हब आहे. सर्वात जास्त सोने आणि कच्चे हिरे मुंबईतच आयात केले जातात. तसेच दागिने आणि रत्नांची मोठ्या प्रमाणावर निर्यात देखील मुंबईतूनच केली जाते. गुजरातच्या सुरत, भावनगर येथे हिर्‍यांना पैलू पाडणारे सर्वात मोठे कारखाने आहेत. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. २०१९ साली मुख्यमंत्र्यांनी १४,४६७ कोटी खर्च करून अल्ट्रा-मॉडर्न आणि हायटेक ज्वेलरी पार्कची उभारणी करणार असल्याचे सांगितले आहे. नवी मुंबईत २१ एकर जागेवर या पार्कची उभारणी होईल.

कॉर्पोरेट सेक्टर
एकेकाळी कॉर्पोरेट सेक्टरसाठी दक्षिण मुंबई महत्त्वाची मानली जात होती. मात्र काळाच्या ओघात जागेची उपलब्धता आणि कार्यालयाचे वाढत जाणारे भाडे यामुळे कॉर्पोरेट कार्यालये हळूहळू उपनगराकडे वळायला लागली. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स त्याचं मोठं उदाहरण आहे. जागतिक बँक आणि खासगी बँकांची अनेक कार्यालये या परिसरात आहेत. फेसबुकसारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे देखील कार्यालय बीकेसीत आहे. बीकेसीला पर्याय म्हणून मधल्या काळात लोअर परळ येथे देखील अनेक कार्यालये थाटण्यात आली. जुन्या चाळी आणि गिरण्यांच्या जमिनींवर नवीन विकसित झालेल्या टोलेजंग इमारतींमध्ये कॉर्पोरेट कार्यालये सुरू झालेली आहेत.

कॉर्पोरेट क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सोयी-सुविधांचा विकास महत्त्वाचा असतो. २००८ साली मुंबईत मेट्रो प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. २०१४ साली वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या सेवेला सुरुवात झाली. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे जाळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे अंधेरीच्या पुढेही कॉर्पोरेट कार्यालयांची संख्या वाढू लागली आहे.

मुंबईत जागेची कमतरता आणि वाहतूक व्यवस्थेवरील ताण पाहता ठाणे आणि नवी मुंबईत देखील कॉर्पोरेट कार्यालये निर्माण होऊ लागली आहेत. बोरीवली ते ठाणे दरम्यान असलेल्या घोडबंदर रोडवरही अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांची कार्यालये थाटली आहेत. याच घोडबंदर रोडवर अनेक खासगी गृहप्रकल्पही विकसित झाले आहेत. त्यामुळे हा भाग वाणिज्य क्षेत्र म्हणून अलीकडे विकसित झाला आहे. इस्टर्न फ्री वे, प्रस्तावित शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक यामुळे देखील कॉर्पोरेट क्षेत्राचा विकास होत आहे. सध्या मुंबईत अनेक मेट्रो प्रकल्प पुर्णत्वास येत आहेत. कुलाबा ते सीप्झ, दहिसर ते अंधेरी या मेट्रो सेवांमुळे मुंबईच्या खासगी कॉर्पोरेट क्षेत्राला आणखी उभारी मिळेल.