नितीश जिंकले, नितीश हरले!

Nitish Kumar JDU

बिहार निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. निकालाचा कल बघता एनडीए आघाडीवर असून महागठबंधन मागे पडले आहे. कलाचा अंदाज घेतला असता मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि भाजप यांची एनडीए २४३ पैकी १२२ जागांवर आघाडीवर आहे. तर तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, कम्युनिस्ट यांच्या महागठबंधनने ११३ जागांवर आघाडी घेतली आहे. सत्तेसाठी कांटे की टक्कर दिसत असली तरी एकूणच एनडीए पुन्हा एकदा सत्तेवर येऊन ठरल्याप्रमाणे नितीश कुमार मुख्यमंत्री होतील, अशी चिन्हे आहेत. विशेष म्हणजे भाजपचे नेते तसे सांगत आहेत. पण, गेली १५ वर्षे भाजप तसेच आरजेडी यांच्या साथीने मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नितीश कुमार भलेही आता चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील, पण ते आता जिंकले आहेत आणि हरलेही आहेत, असे बिहारच्या निवडणुकीच्या निकालांचे एकूण वर्णन करता येईल. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप वाढताना दिसतआहे. भाजपने मागील निवडणुकीपेक्षा यंदा जास्त जागा जिंकून आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. २०१५ मध्ये भाजपला ५३ जागा मिळाल्या होत्या. त्या आता वाढून ७२ पेक्षा जास्त जागांचा आकडा गाठताना दिसत आहेत. याचवेळी जेडीयू ७१ वरून ४४ वर थांबले आहे. तर आरजेडी ७४ जागांवर बाजी मारताना दिसत आहे. एकूण २४३ जागांपैकी १२२ जागा बहुमतासाठी आवश्यक आहे आणि कल लक्षात घेता जेडीयू आणि भाजप यांच्या एनडीएला तेवढ्या जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे एनडीएची पुन्हा एकदा सत्ता येण्यास काही अडचण असेल, असे दिसत नाही. मात्र मागच्या प्रमाणे आरजेडी आपल्या कामगिरीत सातत्य दाखवत असताना नितीश कुमार यांच्या कामगिरीचा आलेख घसरत चालला असून भविष्याचा विचार करता तो जेडीयूसाठी धोकादायक आहे. मुख्य म्हणजे भाजप आता बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला असून नितीश छोटे भाऊ झालेत. जसे महाराष्ट्रात शिवसेनेचे झाले तसेच बिहारमध्ये जेडीयूचे झाले आहे.

आपण दोघे भाऊ भाऊ असे भाजप एनडीएतील सर्व प्रादेशिक पक्षांच्या बाबत बोलत असले तरी मोठ्या भावाचा हात सोडून लहान भाऊ सर्वत्र सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे आणि गरज संपली तर नंतर त्याचा हातच नाही तर साथ सोडायची भाजपची तयारी असते. गरज सरो वैद्य मरोप्रमाणे. भले दिल्या शब्दाप्रमाणे भाजप त्यांना मुख्यमंत्री करतीलही, पण याआधी तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवताना नितीश यांचा शब्द अंतिम असायचा तो आता असणार नाही. खूर्ची तुमची, रिमोट आमचा, असे भाजपचे आता सूत्र राहील. कदाचित २०२५ मध्ये जेडीयूचे अस्तित्व दिसणार नाही आणि तेच भाजपला हवे आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचार करताना नितीश यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हणाले होते. खरेतर तीन वेळा एक माणूस एका राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि चौथ्यांदा लोकांना सामोरे जाताना मात्र निरोपाची भाषा करतो, हा हताशपणा राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचा वारसा चालवणाऱ्या नितीश कुमार यांना शोभणारा नाही. अंधेरे मे एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश… असा नारा देशभर घुमत इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीविरोधात हल्लाबोल करत असताना त्या आंदोलनातून पुढे आलेल्या अनेक तरुण नेत्यांपैकी एक म्हणजे नितीश आहेत. बिहारमधील मातीच्या कणाकणात राजकारण आहे. तिथे सामान्य पानवाला, रिक्षावाला जातीपातीचे समीकरण मांडून राजकारणावर जे काही भाष्य करेल ते भल्या भल्या विचारवंतांना जमणार नाही. जेपींच्या आंदोलनातून जसे नितीश कुमार आले तसेच लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादवही आले. पण, राज्यकारभार चालवताना जो नीतिमुल्याचा वारसा नितीश यांनी दाखवला तो ना लालू, ना मुलायम यांना दाखवता आला. मुख्य म्हणजे लालू यांच्या राजवटीत बिहार म्हणजे दरोडेखोरांचे राज्य झाले. भ्रष्टाचार, खंडणी, अपहरण, खून, बलात्कार, हिंसा यांच्या बजबजपुरीने मोठा राजकीय आणि सांकृतिक वारसा लाभलेल्या बिहारची शोकांतिका झाली. आया बहिणींना सूर्य मावळला कि घराबाहेर पडणे अशक्य झाले. या साऱ्या अराजकातून नितीश कुमार यांनी लोकांना बाहेर काढले. मोकळा, निर्भय श्वास घेऊ दिला. सत्तेचा आशीर्वाद घेऊन बाहुबली बनलेल्या गुंडांना जरब बसवली. मुख्य म्हणजे सत्तेच्या तिजोऱ्या फोडणाऱ्या लोकांना तुरुंगाची हवा दाखवली. सत्तेचा मलिदा खाऊन गब्बर झालेले लालू आज तुरुंगात खडी फोडत आहेत, त्याचे सारे श्रेय नितीश यांना जाते. यामुळे नितीश यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना ते जेव्हा, ‘जा आणि आपल्या आई बहिणींना विचारा त्या सुरक्षित आहेत की नाहीत’, असे सांगतात त्यावेळी त्यांच्यातील एक प्रामाणिक, निर्भय मुख्यमंत्री समोर येतो. जयप्रकाश नारायण यांच्यानंतर मधू लिमये, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडीस या साथींच्या साथीने बिहारमध्ये आपली मुळे घट्ट करताना बिहारसारख्या बिमारू राज्याला एका नव्या वाटेवर घेऊन जाण्याचा नितीश यांचा प्रयत्न नक्कीच इतिहासाने नोंद घेण्यासारखा आहे आणि तसा तो राहीलही. पण, आज मागे वळून बघताना त्यांनी जेडीयू पक्ष म्हणून वाढवला पाहिजे होता. आपला वारस म्हणून नवीन नेतृत्व पुढे आणले पाहिजे होते, पण तसे झालेले नाही. हा त्यांचा पराभव आहे. खरेतर ही समाजवादी चळवळीची शोकांतिका आहे. विचार, आचार, मूल्य याबाबत समाजवादी चळवळीचा हात कोणी धरणार नाही. पण, माणसे टिकत नाहीत आणि टिकली तर पुढे आणली जात नाही. तसेच आज जेडीयूचे झाले आहे. नितीश कुमार यांना दुसरा नितीश तयार करता आलेला नाही आणि आता त्यांनी भाजपला आपणहून मैदान साफ करून दिले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे भाजप याचीच वाट बघत होते. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा त्यांचा डाव यशस्वी झाला आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली, मात्र भाजपने ४५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात १२५ पेक्षा जागा मिळवून मीच पुन्हा मुख्यमंत्री होईन,अशी गर्जना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पक्षाला १०५ जागांवर समाधान मानावे लागताना पाहावे लागले. मुख्य म्हणजे शेवटी सत्ताही गमवावी लागली. आज शिवसेना, अकाली दल भाजपच्या एनडीए आघाडीत नाही. उद्या कदाचित नितीश यांची जेडीयू नसेल आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. भले मुख्यमंत्री नितीश असतील. पण आज ते जिंकलेत आणि हरलेही आहेत. वर्तमान जिंकले असे सांगत आहे आणि भविष्य पराभवाच्या काळ्या रात्रीची चाहूल दाखवत आहे.

आज नितीश हे इतिहास होऊ पाहत असताना राजदचा तरुण चेहरा तेजस्वी यादव नव्या तेजाने चमकताना दिसत आहे. आपल्या पक्षाचा भ्रष्टाचारी चेहरा पुसून काढत बिहार युवकांच्या हाताला काम देण्याचे स्वप्न दाखवणारा तेजस्वीची ही लढाई एकहाती होती. ना वडिल लालू यांची साथ ना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भक्कम आधार. पण असे असताना सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून त्याने राजदला पुढे आणले आहे. देशाच्या राजकारणात एक युवा चेहरा पुढे येत आहे, हे आश्वासक चित्र आहे. शेवटी बिहार निवडणुकीच्या निकालातून हाती काय आले याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नितीश जिंकून हरले असताना तेजस्वी बिहारचा उगवता तारा ठरलाय.