एक मनसे जुगाड

Subscribe

मोदीयुगात त्यातले अनेक नेते इतरत्र निघून गेले आणि उरलेले होते, त्यांना पुन्हा निवडूनही येणे शक्य राहिले नाही. तिथून मनसे पक्षाची घसरण सुरू झाली. किंबहुना पुढल्या काळात राज्याचे राजकारण इतके बदलत गेले, की मनसेला त्यात आपले स्थान शोधणेही अवघड होऊन गेले. त्यामुळे गेल्या दोन-चार वर्षांत राज ठाकरे यांना आपली नवी ओळख निर्माण करणे भाग झाले. राज्यातला तो सगळा अवकाश सेना-भाजपने व्यापलेला असल्याने त्यांना भूमिकेसह नव्याच रंगरूपात उभे रहाणे भाग होते.

राज्यात महाविकास आघाडी आता स्थिरावू लागली आहे. शिवसेनेने आपल्या हिंदुत्ववादी अजेंड्याला थोडी मुरड घालून सेक्युलर गोतावळ्यात स्वत:ला रुळवू पाहात आहे. भाजप शिवसेनेला महायुती तोडल्याबद्दल दोषारोपण करण्यात व्यस्त आहे, अशा राजकीय जत्रेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला वेगळा ठसा उमटू पाहात आहे. बातम्या आहेत की मनसे हिंदुत्ववादी मुद्याकडे वळण्याची शक्यता आहे. सेक्युलॅरिझमचा टीळा लावण्यास उत्सुक असलेल्या शिवसेनेमुळे निर्माण झालेली पोकळी मनसे भरून काढू इच्छित आहे. त्यात वावगं असे काहीच नाही. आपल्या पक्षाचा विस्ताराचा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यासाठी योग्य, अयोग्य मार्ग निवडण्याची प्रक्रिया त्याच पक्षाच्या नेत्याला पूर्ण करायची आहे. मनसे वेगळे काहीच करत नाही. महायुती मोडून शिवसेना मुख्यमंत्रिपद मिळवायला दोन्ही काँग्रेसच्या गोटात दाखल झाली. त्यानंतर शरद पवार त्या नव्या आघाडीचे प्रेरणास्थान झाले. या हालचाली सुरू असताना एक किरकोळ मराठी पक्षाशी एका लहान महापालिकेसाठी भाजपाने महापौर निवडणूक जिंकण्यासाठी हातमिळवणी केलेली होती. नाशिक महापालिकेत भाजपची संख्या चांगली असली तरी त्यांचेच काही नगरसेवक विधानसभेच्या वेळी बंडाचा झेंडा घेऊन उभे राहिले होते. म्हणून महापौर निवडणुकीत भाजप साशंक होता.

कारण मुख्यमंत्रिपद मिळवायला शत्रुत्व घेणार्‍या शिवसेनेने महापालिकातही भाजपला धडा शिकवण्यासाठी कंबर कसलेली होती. त्यासाठी नाशिकमध्येही दोन्ही काँग्रेस सोबत घेऊन भाजपला घाबरवले होते. अशा वेळी अचानक तिथे नगण्य वाटणारा मनसे हा पक्ष भाजपच्या मदतीला धावून आला आणि तिथे भाजपचा महापौर बिनविरोध निवडून येण्यापर्यंत मजल गेली. मुद्दा त्या एका महापौर पदाचा नसून गेल्या पाचसहा वर्षात नामोहरम होऊन गेलेल्या मनसे या प्रादेशिक पक्षाचा आहे. त्याने नव्याने आपली जमीन शोधण्याचा आहे. २००९ सालात लागोपाठ मोठी मजल मारत निघालेल्या राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष मोदी लाटेनंतर भरकटत गेला होता. त्यातून सावरण्यासाठी त्यांना नवनवे प्रयोग व कसरती कराव्या लागलेल्या आहेत. शिवसेनेशी वाद नको म्हणूनही भाजपला मनसेशी अनेकदा हातमिळवणी करणे शक्य झालेले नव्हते. आता तो रस्ता नाशिकच्या महापौर निवडणुकीने खुला केला आहे. यात आज मनसेची असलेली ताकद दुय्यम असून त्याची विस्ताराची क्षमता मोलाची आहे. मनसे हा शिवसेनेतून बाजूला झालेला गट असून शिवसेनेला पर्यायी असा नवा प्रादेशिक पक्ष होऊ शकतो. जिथे शिवसेना आपली भूमी सोडत जाईल, ती व्यापण्याची भाजपला शक्यता नसेल तर मनसेने तिथे आपले बस्तान बसवण्याला भाजपही रणनीती म्हणून प्रोत्साहन देऊ शकतो. उद्धव ठाकरे सरकारवरील बहुमत प्रस्तावाच्या वेळी मनसेचा एकमेव आमदार तटस्थ राहिला, हे विसरून चालणार नाही.

- Advertisement -

आयुष्यभर काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशीच दोन हात करून शिवसेना विस्तारलेली आहे. नेत्यांचे आग्रह व अट्टाहास भागवण्यासाठी त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांनी पत्करलेली भांडणे संपत नाहीत. मुंबईत नेत्यांची युती, आघाडी झाल्याने त्या गल्लीबोळातील कार्यकर्ते स्थानिक नेत्यांमधली वैरभावना संपुष्टात येत नाही. सहाजिकच अशा वरवरच्या आघाड्या जमवल्या जातात, तेव्हा त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची पुरती तारांबळ उडत असते. त्यांना हाती काहीही न लागता नुसती शरणागती पत्करणे रास्त वाटत नाही. म्हणूनच असे कार्यकर्ते अन्य मार्ग शोधू लागतात. जर नेते आपल्या मतलबासाठी पक्षाच्या भूमिका सोडून वाटेल ते करणार असतील, तर कार्यकर्तेही तसेच आपल्या सोयीचे पर्याय शोधू लागतात. म्हणूनच या नव्या आघाडीतील शिवसेनेतील चलबिचल महत्त्वाचा टप्पा आहे. त्या शिवसैनिकांची घुसमट वाढत जाणार आहे आणि त्यांची तगमग नव्या मार्गांचा शोध घेऊ लागणार आहे. असा वेगळा मार्ग थोडाफार परिचित असण्याला प्राधान्य आहे. तो परिचित मार्ग मनसे आहे. कारण हा पक्षच मुळात शिवसेनेतून बाहेर पडलेला गट आहे आणि त्याचेही नेतृत्व ठाकरेच करतात हा योगायोग आहे. किंबहूना अनेक शिवसैनिकांना राज यांच्यात आपले लाडके साहेब दिसत असतात. त्यामुळे नाराज शिवसैनिकांसाठी ‘प्रतिक्षानगर’ किंवा पर्याय म्हणून मनसे असू शकते. एकीकडे शिवसेनेमधली चलबिचल हळुहळू कानी येऊ लागलेली आहे आणि दुसरीकडे भाजपने मनसेची मदत घेतलेली आहे. त्यातून भविष्यात या दोन पक्षांमध्ये नवे काही समीकरण जुळण्याची शक्यताही आकारास येऊ शकते. अर्थात तेही इतके सोपे काम नाही. कारण लोकसभा व विधानसभेच्या काळात राज ठाकरे यांनी भाजपावर मुलूखमैदान तोफ़ा डागलेल्या आहेत. त्यामुळेच भाजपच्या गोटात लगोलग दाखल होणे त्यांच्यासाठीही सोपे राहिलेले नाही, पण ज्या गतीने युती मोडून शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस गोटात जाऊ शकली, तसेच मनसेचे काम अवघड मानायचे कारण नाही.

मनसे हा शिवसेनेचा फुटलेला गट होता आणि त्याला सेनेचा प्रभाव असलेल्या भागातच प्रतिसाद मिळणार हे उघड होते. त्या मर्यादेत राहिल्यावर योग्य लाभ उठवता आला होता. पण, पुढल्या काळात महापालिका वा अन्य निवडणुकातून मिळालेले यश मनसेला पचवता आले नाही, तिथे त्यांचे नुकसान होत गेले. राज ठाकरे यांच्यामागे आलेला कार्यकर्ता वा दुय्यम नेते कितीही निष्ठावान असले, तरी त्यांना मत देणारा त्यांचा वेठबिगार नव्हता. त्याने प्रथम लढणार्‍या पक्षाला दिलेली मते सदिच्छा होत्या. तर त्याचा सदुपयोग करून असा मतदार हक्काचा बनवणे अगत्याचे असते. तिथेच मनसेची चूक होऊन गेली आणि अवघ्या पाच वर्षांत त्या पक्षाचा आकार खंगत गेला.

- Advertisement -

मोदीयुगात त्यातले अनेक नेते इतरत्र निघून गेले आणि उरलेले होते, त्यांना पुन्हा निवडूनही येणे शक्य राहिले नाही. तिथून मनसे पक्षाची घसरण सुरू झाली. किंबहुना पुढल्या काळात राज्याचे राजकारण इतके बदलत गेले, की मनसेला त्यात आपले स्थान शोधणेही अवघड होऊन गेले. त्यामुळे गेल्या दोन-चार वर्षांत राज ठाकरे यांना आपली नवी ओळख निर्माण करणे भाग झाले. राज्यातला तो सगळा अवकाश सेना-भाजपने व्यापलेला असल्याने त्यांना भूमिकेसह नव्याच रंगरूपात उभे रहाणे भाग होते. तिथून मग राज यांनी कडवा मोदी विरोधक म्हणून पवित्रा घेण्याला पर्याय शिल्लक राहिला नाही. म्हणून तर २०१४ मध्ये मोदींसाठी प्रचार करणारे राज ठाकरे, अकस्मात २०१९ मध्ये मोदींचे कट्टर विरोधक म्हणून पुढे आले. त्याचे कारण त्यांना नव्याने आपली जागा शोधावी लागते आहे. ती जागा प्रस्थापित भूमिकेत वा सेना भाजपशी जुळणारी असून उपयोगाची नाही. त्याचा कुठलाही लाभ मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. त्यापेक्षा जी जागा रिकामी आहे व बळकावणे शक्य आहे, तिथेच जाण्यालाही पर्याय नाही. तो अवकाश मोदी विरोधातला आहे. तो मोदी विरोधातील अवकाश शोधताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपवर जोरदार टीका केली. मोदी, शहा हेही त्यांच्या आरोपांपासून लांब राहू शकले नाहीत. त्यामुळे मनसे-भाजप एकत्र येण्याची शक्यता नाही. पण, दरम्यानच्या काळात शिवसेनेतील कुरबुरी जशा वाढत जातील, तसा मनसेकडे शिवसैनिकांचा ओढा वाहू लागणे शक्य आहे. केंद्रातली सत्ता हातात असताना व राज्यातही आपले बळ वाढलेले असताना भाजप अशा घटनेला प्रोत्साहन देऊ शकतो. त्याला आज शिवसेनेने शत्रूच मानलेले आहे, तर शत्रूपक्ष खच्ची होण्याला भाजपने हातभार लावला, तर कोणी भाजपला दोषही देऊ शकणार नाही. पण, जे कोणी सेनेतले नाराज असतील, त्यांना मनसेकडे वळवण्यासाठी भाजप आपली शक्ती लावू शकतो.

भविष्यात सेनेऐवजी नवा प्रादेशिक पक्ष म्हणून भाजप मनसेला जवळ घेऊ शकेल. नाराज शिवसैनिक भाजपकडे येण्यात अडचण असली तर त्याला मनसेकडे वळवण्याची रणनीती भाजपही खेळू शकतो. शरद पवारांच्या नादी लागून तरी मनसेने काय मिळवले आहे? मग शिवसेनेतील नाराजी आपले हत्यार बनवून राज ठाकरे कामाला लागले, तर भाजप त्याला अप्रत्यक्षपणे हातभार लावण्याची मोठी शक्यता आहे. त्याची सुरुवात नाशिक येथील महापौर निवडणुकीत झाली नसेल, असे कोणी म्हणू शकेल काय? एक निश्चित आहे. भाजपाच्या युतीत राहून जी मस्ती शिवसेना दाखवित होती, ती नव्या आघाडी समीकरणातले मित्र पक्ष अजिबात सहन करणार नाहीत. त्यातूनच शिवसेनेचा संवेदनशील उत्साही कार्यकर्ता अधिक दुखावला जाणार आहे आणि तोच तर मनसेच्या मेगाभरतीचा कच़्चा माल असणार आहे. भाजपाने त्याला फक्त खतपाणी घालायचे आहे. कारण भाजपचे चाणक्य राज ठाकरे यांची क्षमता ओळखण्याइतके हुशार नक्कीच आहेत. त्यांना भविष्यातला एक नवा प्रादेशिक पक्ष घडवण्यात जुन्या मित्रपक्षाला धडा शिकवण्याचा डावही खेळता येणार आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -