Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग ओबामा, पवार आणि राहुल गांधी

ओबामा, पवार आणि राहुल गांधी

Related Story

- Advertisement -

बराक ओबामा हे आता दोन टर्म अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवून सक्रिय राजकारणातून निवृत्त झालेले आहेत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक केवळ दोन वेळाच लढवता येईल, असे त्यांच्या राज्यघटनेचे बंधन असल्यामुळे ओबामा आता पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता नाही. दुसरे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. पवारांशिवाय महाराष्ट्रातील पान हलत नाही, असे म्हटले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणातील पवार हे एक वादळी व्यक्तिमत्व आहे हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेले आहे. पवारांसाठी महाराष्ट्रात नथिंग इज इम्पॉसिबल अशी स्थिती असते. कारण महाराष्ट्रात ते काहीही करू शकतात. ज्या गोष्टींची सहजासहजी कुणी कल्पना करणार नाही, अशा गोष्टी पवार घडवून आणतात. २०१९ ची विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मेगाभरती सुरू होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार यांचा प्रभाव संपला असे भाजपवाले छातीठोकपणे सांगून आमचीच सत्ता येणार असे दावा करत असताना पवारांनी एक पावसाळी सभा घेतली आणि सगळे चित्रच पालटून गेले. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला एकत्र आणून शरद पवारांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली.

अजित पवारांचे बंड मोडून काढले. पण हे सगळे महाराष्ट्रात घडवणार्‍या पवारांना दिल्लीचे तख्त काही काबीज करता आले नाही. कारण आपण या देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी पवारांची खूप इच्छा आहे. त्यांनी त्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करून पाहिले, पण अजून पवारांना त्या पदावर बसता आलेले नाही. पवारांचा नुकताच ८० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. पवारांनी आरोग्यविषयक भयंकर आव्हानांवर मात केलेली आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, शरद पवारांचे हे आता राजकीय निवृत्तीचे वय आहे. त्यांनी अजित पवार यांच्याकडे जबाबदारी देऊन आराम करावा. पण निवृत्त होतील ते पवार कसले. उलट, ते अधिक जोमाने काम करत असतात. कारण त्यांच्या मनातून पंतप्रधानपदाचा विचार निवृत्त व्हायला तयार नाही. महाराष्ट्रात ते असले तरी दिल्ली त्यांना खुणावत असते. त्यामुळे काही दिवासांपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेसप्रणीत युपीएच्या प्रमुखपदाचा ताबा घ्यावा आणि देशातील सगळ्या प्रादेशिक पक्षांना एकत्र करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचावे, असा सूर उमटला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होण्यात जसा शरद पवारांचा सिंहाचा वाटा आहे, त्यात तशीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची महत्वाची भूमिका आहे. कारण राऊत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही भूमिका लावून धरली. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

- Advertisement -

संजय राऊत आणि शरद पवार हे दोघेही खासदार असल्यामुळे त्यांचे दिल्लीला सतत येणे जाणे असते. त्याचसोबत पूर्वीपासून या दोघांचे वैयक्तिक पातळीवरही चांगले संबंध आहेत. त्यामुळे जसे आपण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले, तसेच आता शरद पवारांना युपीएचे प्रमुख करून त्यांना पंतप्रधान बनविण्याची आकांक्षा संजय राऊत यांच्या मनात घोळत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण अलीकडेच त्यांनी असे म्हटले होते की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देशपातळीवर पुढाकार घेऊन विविध राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना एकत्र करावे आणि केंद्रात नरेंद्र मोदींना पर्याय उभा करावा. सातत्य आणि चिकाटी हे गुण व्यक्तीला यशाचा मानकरी बनवतात, हे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बसवून सिद्ध करून दाखविले आहे. हिच चिकाटी आणि सातत्य जर त्यांनी कायम ठेवले तर ते शरद पवारांना पंतप्रधानपदीही कदाचित बसवू शकतील. कारण वार्‍याची दिशा बघून आपल्या बोटीचे शिड लावणारा शर्यतीत पुढे जात असतो. राजकारणातील वार्‍यांची दिशा ओळखून राऊत यांनी शिड लावले तर कदाचित पुढील काळात ते त्यांची आकांक्षा पूर्ण करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. राष्ट्रीय पातळीवर आपल्याला प्रोजेक्ट करणारा कुणी तरी माणूस पवारांना हवा होता तो संजय राऊत यांच्या रूपाने त्यांना मिळाला आहे. त्यामुळे शरद पवारांचे वय निवृत्तीचे झालेले असले तरी त्यांची आशा अजूनही कायम आहे आणि ती पल्लवित करणारी व्यक्ती त्यांंच्यासोबत आहे. त्यातच पवार हे कधीही निवृत्तीवादी नव्हते, तर ते प्रवृत्तीवादी आहेत. म्हणूनच त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसला राज्यात सत्ता स्थापण्यासाठी सोबत येण्याला प्रवृत्त केले.

शरद पवारांसारखी वयाची ८० वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती दिल्लीचे आव्हान स्वीकारण्यासाठी प्रवृत्त होत असताना दिल्लीत अशी एक तरुण व्यक्ती आहे, जिला परंपरेने सगळे मिळालेले असताना ती काही केल्या प्रवृत्त व्हायला तयार नाही. ती व्यक्ती म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आहेत. राहुल गांधी यांना त्यांच्या बळावर फार काही चमक दाखवता आली नाही. कारण जिथे राहुल गांधी यांनी प्रचार केला, तिथल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. म्हणजे एखाद्या हिरोला वडिलोपार्जित ओळख आहे, म्हणून अनेक निर्माते आपल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका देतात, पण ते चित्रपटच चालत नाहीत. सुपर डुपर होण्याची शक्यता केवळ कल्पनाविलासच म्हणावा. मागील दोन लोकसभा निवडणुका राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आल्या. पण या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. तो इतका दारूण होता की, देशावर मागील बहुतांश काळ सत्ता गाजवणार्‍या काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्ष होण्यासाठी ज्या जागा लागतात, तितक्याही जिंकता आल्या नाहीत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले होते. पण निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गांधी घराण्याव्यतिरिक्त कुणी तरी काँग्रेसचे नेतृत्व करावे, असे त्यांनी पद सोडताना सांगितले. गांधींशिवाय काँग्रेस ही कल्पनाच अशक्य आहे, हे वेळोवेळी दिसून आलेले आहे. कारण गांधी घराण्याला आव्हान देणार्‍यांना ते खूपच महागात पडलेले आहे. त्यामुळे राहुल यांना डावलून काँग्रेस अध्यक्षपदावर आरूढ होण्यास आपण तयार आहोत, असे सांगायला कुणी तयार नाही.

- Advertisement -

बराक ओबामा यांनी आपल्या निवृत्ती काळात लिहिलेल्या ‘अ प्रॉमिस्ड लॅण्ड’ या आत्मचरित्रपर पुस्तकात राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी अधिक सक्षमपणे काम करायला हवे. त्यांच्यात पुरेसा उत्साह दिसत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यात सातत्य नाही, असे विधान केले होते. ते राज्यातील काँग्रेस नेत्यांना खूप लागले होते. त्यांनी पवारांना प्रत्त्युतर दिले. राहुल गांधी यांना समजून घेण्यात पवार कमी पडत आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पवारांना सुनावले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांची रविवारी दिल्लीत बैठक झाली त्यात पाच तास चर्चा झाली. त्यात ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेससारखा मोठा पक्ष नेतृत्वाशिवाय मोकळा राहणे ठिक नाही. त्यामुळे त्याला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, अशी या नेत्यांची मागणी होती. काही ज्येष्ठ नेत्यांनी यापूर्वीच सोनिया गांधींना पत्र पाठवून लवकरात लवकर काँग्रेसला अध्यक्ष द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. रविवारी दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांचा एकूणच सूर हा राहुल गांधी यांनी अध्यक्षपद पुन्हा स्वीकारावे, असा होता. पण स्वत: राहुल गांधी मात्र त्यासाठी प्रवृत्त होताना दिसत नाहीत. याचा अर्थ बराक ओबामा आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेविषयी केलेली विधाने खरी मानायची का?

- Advertisement -