ताश्कंद फाईल्समध्ये दडलेले गूढ !

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचा बरेच वेळा प्रयत्न झाला; पण आजवर ते शक्य झालेले नाही. ताश्कंद फाईल्स या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून तो प्रयत्न करण्यात आला. त्यात सगळ्या शक्यता समोर ठेवण्यात आल्या. आता तुम्हीच ठरवा नेमके काय झाले ते, असे सांगून हा चित्रपट गूढ कायम ठेवतो.

Mumbai

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचा बरेच वेळा प्रयत्न झाला; पण आजवर ते शक्य झालेले नाही. ताश्कंद फाईल्स या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून तो प्रयत्न करण्यात आला. त्यात सगळ्या शक्यता समोर ठेवण्यात आल्या. आता तुम्हीच ठरवा नेमके काय झाले ते, असे सांगून हा चित्रपट गूढ कायम ठेवतो. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६५ साली झालेल्या युद्धानंतर ताश्कंद येथे झालेल्या कराराच्या दुसर्‍या दिवशी शास्त्रींचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची विविध कारणे सांगितली जातात; पण त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला ? त्यामागे कोणती कारणे होती. जी कारणे दिली जातात त्यात तथ्य आहे की नाही, याविषयीही विविध शंका उपस्थित करण्यात येत असतात. देशाच्या पंतप्रधानाचा मृत्यू होतो आणि त्यामागील नेमके कारण समजत नाही, हेच एक गूढ मानले जाते. इतक्या उच्च पदस्थ व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी देशातील सर्वोच्च गुप्तचर यंंत्रणा कामाला लावल्या जाणार हे ओघाने आलेच. पण इतके होऊनही शास्त्रींच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे मात्र अजूनही एक गूढ होऊनच बसलेले आहे. ते गूढ उकलण्याचा आटापिटा अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘द ताश्कंद फाईल्स’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातही शक्यताच व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यांनाही शास्त्रीजींच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते याचा शोध घेता आला नाही. त्यांनी परिस्थिती समोर ठेवून त्यातून लोकांनीच मृत्यूचा काय अर्थ लावायचा तो लावावा असे सुचवले आहे.

शास्त्रीजींना हृदयविकाराचा त्रास होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला, असे म्हटले जाते. इतकेच नव्हे तर त्यांना विषबाधा झाली असाही तर्क त्यांच्या मृतदेहावरील बाह्यलक्षणे पाहून केला गेला. भारतात आणल्यावर त्यांच्या मृतदेहाची शवचिकित्सा का करण्यात आली नाही. त्यांच्या देहावर कापल्याच्या खुणा होत्या. त्यांच्या टोपीला रक्त कसे काय लागले होते, अशा अनेक घटना आहेत, ज्या शास्त्रींच्या मृत्यूचे गूढ अधिक गडद करत जातात. ‘ताश्कंद फाईल्स’ या चित्रपटात सरकारकडून चौकशी समिती नेमण्यात येते, त्यात समाजातील विविध स्तरातील मान्यवरांना समाविष्ट करण्यात येते. त्यात एका महिला पत्रकाराचा समावेश आहे. या पत्रकाराला कुणीतरी अज्ञात व्यक्ती शास्त्रींचा मृत्यू कसा झाला याविषयी माहिती देत असतो. थोडक्यात, त्याने विशेष बातमीच्या शोधात असलेल्या या पत्रकाराला आपल्या जाळ्यात अडकवलेले असते. मिथुन चक्रवर्तीच्या भूमिकेत असलेला हा नेता आपले इप्सित साध्य झाल्यानंतर त्या पत्रकाराला सांगतो, राजकारणात सगळे एकदुसर्‍याचा वापर करत असतात. आपण वापरले गेलो आहोत, हे त्या पत्रकाराच्या लक्षात येते. शेवटी शास्त्रींच्या मृत्यूचे गूढ हे गूढ बनून राहते. शास्त्रीजींसारख्या प्रामाणिक माणसांच्या मृत्यूचे गूढ न उकलता त्याचा सातत्याने राजकीय फायदा घेणेच सुरू राहील की काय असे वाटल्यावाचून राहत नाही. कारण ज्यावेळी नेमका आरोप कुणावर ठेवायचा हे कळत नाही किंवा कळत असूनही तो आरोप ठेवता येत नाही. कारण ज्यांच्यावर तो ठेवायचा तिच मंडळी सत्तेत असतात किंवा सत्ताधार्‍यांच्या जवळची असतात, इतकेच नव्हे तर सत्ताधार्‍यांना हाताळत असतात. त्यामुळे असे मृत्यू हे कायमस्वरुपी गूढ होऊन बसते.

लालबहाद्दूर शास्त्री हे मुळात खूप संवेदनशील व्यक्ती होते. ते रेल्वेमंत्री असताना दोन वेळा रेल्वे अपघात झाले. तेव्हा आपली नैतिक जबाबदारी समजून त्यांनी दोन वेळा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आज असा कुणी राजीनामा देईल, अशी आपण कल्पना तरी करू शकतो का? शास्त्रीजींचे जीवन देशाला समर्पित होते. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर देशाचा पंतप्रधान कोण होणार, असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्याचे उत्तर सापडणे तितके सोपे नव्हते. कारण नेहरुंची मुलगी या नात्याने ती जागा आपल्याला मिळावी, अशी इंदिरा गांधी यांची इच्छा होती. पण त्यावेळी इंदिरा गांधींपेक्षा वयाने मोठे आणि राजकारणातील अनुभवी नेते होते. त्यामुळे इंदिरा गांधी नेहरुंच्या कन्या असल्या तरी त्यांना पंतप्रधानपदासाठी सहजासहजी मान्यता मिळणे सोपे नव्हते. इंदिरा गांधी या मुळातच महत्त्वाकांक्षी होत्या. हे त्यांची एकूणच राजकीय कारकीर्द पाहिल्यावर दिसून येते. नेहरुंचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे इंदिरा गांधी यांना अव्हेरणे ज्येष्ठांनाही शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचा इंदिरा गांधी यांना विरोध होता. अशा वेळी त्यांनीच प्रामाणिक आणि निष्कलंक अशा लालबहाद्दूर शास्त्री यांची निवड करून त्यांना पुढाकार घ्यायला सांगितले. पुढे शास्त्रींना पाठिंबा देणार्‍या काँग्रेसमधील ज्येष्ठांना इंदिरा गांधींनी बाहेरचा रस्ता कसा दाखवला हे सर्वश्रुत आहे.

१९६५ साली पाकिस्तानने हल्ला चढवला; पण त्यावेळी भारतीय सैन्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यावर शास्त्री ठाम होते. त्यांनी जनतेला आवाहन केले की, वेळ आली तरी आपण एकवेळ जेऊ, पण देशावर झालेल्या आक्रमणाचा सामना करताना कुठलीही कसूर ठेवणार नाही. शास्त्रींसारखा खमक्या नेता लष्कराच्या पाठीशी असल्यामुळे भारत आपल्याला भारी पडणार हे पाकिस्तानला दिसू लागल्यानंतर त्यांनी सोव्हिएत संघ आणि अमेरिकेकडे धाव घेतली. या दोघांनाही आपल्या सोयीनुसार वापरण्यासाठी पाकिस्तानची गरज होती. तत्कालीन सोव्हिएत संघ म्हणजेच आताचा रशिया हा भारताचा मित्रदेश असला तरी त्यांना पाकिस्तानची गरज होती. त्यामुळे पाकिस्तान कसा जिवंत राहील, यासाठी त्यांची धडपड असायची. हिलटरला संपवण्यासाठी एक झालेले अमेरिका आणि सोव्हिएत संघ हे दुसर्‍या महायुद्धानंतर एकमेकांचे कट्टर वैरी झाले. त्यामुळे त्यांना एकमेकांच्या विरोधात कारवाया करण्यासाठी हस्तकांची गरज होती. तसे हस्तक देश त्यांनी जगभरात तयार केले होते. पाकिस्तान हा अशाच देशांपैकी एक आहे. पाकिस्तान कधी कुणाची बाजू घेईल, हे सांगता येत नाही. जो भारताच्या विरोधात त्यांना मदत करेल, तो त्यांचा मित्र असतो.

सोव्हिएत संघ हा भारताचा मित्र देश राहिलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरु हे सोव्हिएत क्रांतीमुळे भारावून गेले होते. त्यामुळे त्यांनी भारताच्या विकासासाठी पंचवार्षिक योजनेसारख्या काही संकल्पना स्वीकारल्या. सोव्हिएत संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर काही वेळा भारताच्या पारड्यात आपले वजन टाकले; पण त्याच वेळी ज्या ज्या वेळी पाकिस्तानला नमवण्याची वेळ आली त्यावेळी मात्र भारताच्या प्रयत्नात सोव्हिएत संघाने खोडा घातला. १९६५ च्या युद्धातही भारत पाकिस्तानला भारी पडलेला होता; पण त्यावेळी सोव्हिएत संघाने मधे पडून पाकिस्तानला वाचवले. ताश्कंद करारासाठी लालबहाद्दूर शास्त्रींना सोव्हिएत संघात बोलावणे हा पााकिस्तानला झुकते माप देण्याचाच भाग होता. शास्त्रीजींचा कणखर राष्ट्रवाद आणि त्यातूनच न झुकण्याची वृत्ती हेदेखील त्यांच्या मृत्यूचे कारण मानले जाते. सोव्हिएत संघाची केजीबी ही गुप्तहेर संस्था सरकारच्या धोरणाला अनुसरून काम करत होती आणि असते. त्यामुळे सोव्हिएत संघाला जे पोषक आणि सोयीचे आहे, त्यांना पाठबळ द्यायचे आणि जे गैरसोयीचे ठरतात, त्यांचा निकाल लावायचा हे काम त्यांना दिलेले असते.

नेताजी सुभाषचंद्र बोस, अणूशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा या दोघांचेही मृत्यू संशयास्पदरित्या विमान अपघातात झाले. त्यांच्या मृत्यूच्या मागचे गूढ संपलेले नाही. ‘ताश्कंद फाईल्स’ चित्रपटातील शास्त्रींच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी धडपडणारी पत्रकार शेवटी वैफलग्रस्त होऊन जोरात ओरडते की, दीज आर स्टेड स्पॉन्सर्ड लाईज, म्हणजे या सगळ्याला सरकारी पाठबळ आहे. अर्थात, मग ते कुठल्याही देशाच्या सरकारचे असो. तिच्या या विधानातच या महान नेत्याच्या मृत्यूचे गूढ दडलेले आहे.