कोकणावरील निसर्गकोप !

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, रोहा, अलिबाग या तालुक्यांना जास्त बसला आहे. पेण, खालापूर, कर्जत या तालुक्यांमध्ये देखील नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांवरील छप्पर उडून गेले आहे. फळबागायती भुईसपाट झाल्या आहेत. २२ हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन हे तालुके पर्यटनावर अवलंबून आहेत. आधीच करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीमुळे पर्यटन व्यवसायाचे अर्थचक्र ठप्प झाले होते. तरीदेखील बागायतदार शेतकरी नारळ, सुपार्‍या, आंबे, काजू, फणसाच्या उत्पन्नावर तग धरून होता. असे असताना निसर्ग चक्रीवादळाच्या मार्‍याने बागायती जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे हा शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हरिहरेश्वर आणि रत्नागिरीमधील कोळथर, केळशी, आंजर्ले तसेच समुद्र किनार्‍यावरील गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत शासनाच्या मदतीची वाट न पाहता कोकणी माणूस पुन्हा उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. निसर्गरम्य कोकणाला निसर्गानेच दिलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी धडपडत आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळ गेल्या बुधवारी रायगडात येऊन धडकले आणि धुळधाण करून गेले. त्यात रायगड जिल्ह्यातील १९०५ गावे बाधित झाली आहेत. १ लाख ७५ हजार घरांचे नुकसान झाले असून २२ हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागा मातीमोल झाल्या आहेत, तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. माड, पोफळीच्या बागांनी नटलेली गावे पडलेल्या झाडांनी ओसाड दिसू लागली आहेत. शेतकरी, बागायतदार, श्रमिक, कामगार भुईसपाट झाला. झालेले नुकसान भरून निघण्यासाठी निदान पुढची दोन दशके लागतील. उद्ध्वस्त होणे काय असते हे आता येथील भूमिपुत्र अनुभवतोय. शिवाय घरे कोसळली असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनाही बंद झाल्या आहेत. एका वाक्यात सांगायचे झाले तर सर्व संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. संपूर्ण आभाळच फाटलंय तिथे ठिगळ कुठे कुठे लावायचे, अशी अवस्था प्रत्येकाचीच झालेली आहे. कोकणातील मुख्य उपजीविकेचे साधन असणारी नारळ, सुपारी, काजू व आंब्याच्या बागा नष्ट झाल्या आहेत. तसेच मच्छीमार बांधवांच्या नौकांची इंजिने खराब झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. आता या संकटातून सावरण्याची आणि आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी रायगडकरांना खूप कष्ट पडणार आहेत. तसेच शेजारील हरिहरेश्वर आणि रत्नागिरीमधील कोळथर, केळशी, आंजर्ले तसेच समुद्र किनार्‍यावरील गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोक पुन्हा सावरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून स्वत:ला सावरण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थ धडपड करताना दिसत आहे, ही खूप आशादायक बाब आहे.

चक्रीवादळाचा तडाखा श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, रोहा, अलिबाग या तालुक्यांना जास्त बसला आहे. पेण, खालापूर, कर्जत या तालुक्यांमध्ये देखील नुकसान झाले आहे. परंतु, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा या तालुक्यांमध्ये जास्त नुकसान झाले आहे. या तालुक्यांमधील फळबागायती नाहीशा झाल्या आहेत. २२ हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन हे तालुके पर्यटनावर अवलंबून आहेत. आधीच करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीमुळे पर्यटन व्यवसायाचे अर्थचक्र ठप्प झाले होते. तरीदेखील बागायतदार शेतकरी नारळ, सुपार्‍या, आंबे, काजू, फणसाच्या उत्पन्नावर तग धरून होता. त्यामुळे या वर्षीचा पर्यटन हंगाम पूर्णपणे हातचा जाणार हे गृहीत धरूनच रायगडकर दिवस ढकलत होता. असे असताना निसर्ग चक्रीवादळाच्या मार्‍याने बागायती जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे हा शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पडलेली घरे दुरुस्त करता येतील. पत्रे टाकून तात्पूर्ती निवार्‍याची व्यवस्था करता येईल. परंतु, लागती झाड पडल्यामुळे झालेले नुकसान कसे भरून निघणार, हा गहन प्रश्न आहे. नारळ, सुपारी, आंबा, फणस, चिंच, काजू यांची झाडे उत्पन्न देण्यासाठी तयार व्हायला १० ते १५ वर्षे लागतात. त्यामुळे इथला बागायतदार शेतकरी आता १५ वर्षे मागे फेकला गेला आहे. त्यातून सावरण्याचे मोठे आव्हान त्याच्या समोर उभे आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई देण्याच्या पद्धतीमध्ये काही त्रुटी आहेत, त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानभरपाई देताना हेक्टरमध्ये दिली जाते. कोकणातील बागायतदारांना त्याचा लाभ मिळत नाही. जी नुकसानभरपाई मिळते ती अगदीच तुटपुंजी असते. त्यामुळे कोकणातील माणूस ही नुकसानभरपाई घेण्यासाठी जात नाही. त्यामुळे कोकणात हेक्टरचा निकष न लावता गुंठ्यांचा निकष लावून आणि झाडांच्या संख्येवर नुकसानभरपाई दिली गेली पाहिजे. ज्यांची फळझाडे उन्मळून पडली आहेत त्याना झाडांची रोपे, कलमे उपलब्ध करून द्यायला हवीत.

मच्छीमारांचे नुकसान
वादळात शेतकरी, बागायतदार, छोटे व्यापारी यांचे नुकसान झाले त्याचप्रमाणे जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांचेदेखील नुकसान झाले आहे. वादळाची सूचना दोन दिवस अगोदरच मिळाल्यामुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी किनार्‍यावर लावल्या होत्या. त्यामुळे मोठे नुकसान टळले असले तरी किनार्‍यावर लावलेल्या बोटी वादळामुळे एकमेकांवर आपटून फुटल्या आहेत.

महावितरणला शॉक
चक्रीवादळाने जिल्ह्यात विजेचे खांब, उच्चदाब वाहिनी, लघुदाब वहिनी तसेच ट्रान्सफॉर्मर पडलेत. वीजयंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. महावितरणचे मोठे नुकसान झाले असून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. वीज उपकेंद्र सुरू करणे गरजेचे होते. कर्मचार्‍यांनी ती सुरू केली असून लघुदाब वाहिनीही काही ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. महावितरणचे रायगड जिल्ह्यातील मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे सध्या दुसर्‍या जिल्ह्यातील कर्मचारी शासनाने रायगडला पाठविले आहेत.

जनरेटर्सची मागणी वाढली
चक्रीवादळात विजेचे खांब उन्मळून पडले त्याचा मोठा परिणाम वीज पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शिवाय काही भागातील नागरिक अजूनही अंधारात आहेत. परिणामी टँकर आणि जनरेटर्सची मागणी वाढली आहे. काही शहरातील व त्यांच्या आसपासच्या परिसरामधील वीज पुरवठा सुरळीत झाला असला तरी ग्रामीण भागात तो सुरळीत होण्यात अडचणी येत आहेत. गावात तसेच जंगल भागात विजेचे खांब पडले आहेत. वीजवाहक तारा तुटल्या आहेत. वीज जोडणीचे काम आणखी काही दिवस चालणार आहे.

पाणीपुरवठा योजना बंद
वीज नसल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना ठप्प आहेत. निमशहरी भागातदेखील इमारतींना पाणीपुरवठा होत नाही. अनेक ठिकाणी खासगी टँकर्स मागवले जात आहेत. पाणी आले तरी ते वरच्या टाकीत चढवण्यासाठी वीजच नाही. त्यामुळे नागरिकांना तीन ते चार मजल्यांपर्यंत पाणी वाहून न्यावे लागत आहे. जनरेटर्सच्या मदतीने पाणी वरच्या टाकीत सोडले जात आहे. त्यासाठी जनरेटर्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे जनरेटर्सचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. त्यातच लॉकडाऊन असल्याने मुंबई-पुण्यातील बाजारपेठा बंद असल्याने ही मागणीदेखील पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत. वीज नसल्यामुळे इन्व्हर्टर चार्ज झालेली नाहीत. त्यामुळे आता मेणबत्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

पत्र्यांचा तुटवडा
चक्रीवादळाने लाखो घरांचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या घरांच्या छतावरील पत्रे उडून, झाडे पडून अतोनात नुकसान झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानेे घरावरील पत्रे बसविणे गरजेचे आहे. सध्या पत्र्यांची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे पत्र्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. याचा गैरफायदा घेऊन व्यापार्‍यांनी पत्र्यांचे दर वाढवले आहेत. घर बांधणीचे इतर साहित्यदेखील महागले आहे. पैसे हातात नाहीत. इंटरनेट बंद असल्यामुळे एटीएम बंद आहेत. बँकांचे व्यवहार ठप्प आहेत. अशा परिस्थितीत करायचे काय, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. त्यांना तातडीची आर्थिक मदत मिळणे आवश्यक होती. ती मिळालेली नाही. पंचनामे होऊन नुकसानभरपाई शासन देईल, त्याला वेळ लागेल. लोकांना घर दुरुस्तीसाठी शक्य तितकी तातडीने रोख रकमेची मदत शासनाने द्यायला हवी.

संपर्क यंत्रणा कोलमडली
चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील संपर्क यंत्रणा कोलमडली होती. त्यामुळे कुणाशीही संपर्क होऊ शकत नव्हता. सर्वच जॅम झाले होते. अशा कठीण परिस्थितीत हॅम रेडिओ ऑपरेटर यंत्रणा अविरत काम करत होती. त्यामुळे शासकीय यंत्रणा एकमेकांशी संपर्क साधत होती. मोबाईल सेवा बंद झाली. संपर्क होत नव्हता. अशा वेळी हॅमची यंत्रणा अखंडित काम करत होती. त्यामुळे शासकीय यंत्रणेला माहिती मिळू शकली. नुकसान कुठे झाले. कुठे घरे पडलीत, कुठे झाडे पडलीत याची माहिती मिळाली. त्यानुसार पथके पाठविण्यात आली. रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडल्यामुळे रस्ते बंद होते. गावांमध्ये पोहचता येत नव्हते. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला होता. गावकरी आणि शासकीय यंत्रणांनी ही झाडे दूर केली. दोन दिवसांनी रस्ते वाहतूक सुरू झाली. मोबाईल सेवा पूर्णपणे ठप्प होती. आता हळूहळू मोबाईल सेवा सुरू झाली आहे.

कचर्‍याचे ढिगारे
वादळामुळे झाडे उन्मळून पडली. घरावरचे पत्रे उडाले. त्यामुळे सर्वत्र कचर्‍याचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. हे ढिगारे उचलले नाहीत तर आरोग्यासाठी घातक ठरणार आहेत. कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्याचबरोबर ज्यांच्या वाडीत झाडे पडली आहेत त्याचे काय करायचे हा प्रश्न लोकांना पडला आहे. त्या साफसफाईसाठी भरपूर खर्च येणार आहे. झाडपाल्याने नाले भरले आहेत. ते आजही तसेच आहेत. पावसाळ्यात येणार्‍या साथीच्या आजाराला कचर्‍याने भरलेले नाले आमंत्रण देतील, अशी स्थिती आहे.

जीवितहानी कमी झाली
पूर्वी वादळाच्या सूचना वेळेत मिळत नसत. परंतु, प्रथमच वादळाची सूचना तीन दिवस आधी मिळाली. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले. वादळाची माहिती ७२ तास अगोदर मिळाल्यामुळे संभाव्य धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली. धोकादायक घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यामुळे जीवितहानी कमी झाली. वादळ येण्यापूर्वी प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे मोठे नुकसान टळले. रायगड प्रशासनाने दाखवलेली ही तत्परता नक्कीच प्रशंसनीय आहे.

अंदाज चुकले
वादळाची सूचना अगोदर मिळाल्यामुळे जीवितहानी कमी झाली. सूचना आगाऊ मिळाली तरी वादळ नेमके कुठे धडकणार हे नक्की सांगता येत नव्हते. दरदिवशी अंदाज चुकत होते. सुरुवातीला हे वादळ श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे धडकेल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर २ जून रोजी हे वादळ अलिबागला धडकणार असे सांगण्यात आले. परंतु, ३ जून रोजी हे निसर्ग चक्रीवादळ हरिहरेश्वर येथे आले. यापूर्वी छोटी-छोटी वादळे रायगड जिल्ह्यात आली होती. मात्र असे भयानक चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात प्रथमच आले. त्यामुळे हे वादळ काय करेल याचा कुणालाच अंदाज नव्हता. वादळाने जीवितहानी कमी झाली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. नेमकी किती हानी झाली हे अद्याप शासकीय यंत्रणा सांगू शकलेली नाही.

घर कौलारु
या चक्रीवादळात सर्वाधिक नुकसान झाले आहे ते घरांचे. १ लाख ७५ हजारपेक्षा जास्त घरांचे कमीअधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील ९० टक्यांपेक्षा जास्त घरांची छपरे पत्र्यांची होती. वार्‍याच्या तडाख्याने पत्रे उडाले. परंतु, कौलारु घरांचे मात्र मोठे नुकसान झाले नाही. कौलारू घरांचे नुकसान झालेच नाही असे नाही. झालेच असेल तर ते तुरळक आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते कोकणच्या वातावरणात कौलारू घरेच उपयुक्त आहेत.

भूमिगत विद्युत वाहिन्या काळाची गरज
चक्रीवादळ आणि अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वरून जाणार्‍या विजेच्या तारा तुटून, पोल कोसळून अनेक प्रकारे नुकसान व जीवितहानी होत असते. शिवाय विद्युत पुरवठा खंडित होऊन जनजीवनावर परिणामही होत असतो. हे टाळण्यासाठी भूमिगत विद्युत प्रणाली तयार करून सशक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प अंतर्गत समुद्रकिनार्‍या जवळील शहरांमध्ये विद्युतवाहिन्या भूमिगत टाकण्याची योजना जागतिक बँकेच्या मदतीने राबविली जात आहे. या प्रकल्पासाठी अलिबाग शहराची निवड करण्यात आली आहे. या कामाचे सर्वेक्षण झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. अलिबाग शहरात विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू झाले असून दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. विद्युतवाहिन्या भूमिगत झाल्यानंतर अलिबाग शहरात विजेच्या तारा तुटून, पोल कोसळून अपघात होण्याचा धोका टळणार आहे. परंतु, हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ते लवकर पूर्ण करायला हवे. समुद्र किनार्‍यावरील मुरुड, श्रीवर्धन व उरण या शहरांसाठीदेखील अशाप्रकारचा प्रकल्प राबवायला हवा. आपत्ती निवारण कार्यक्रमांतर्गत समुद्र किनार्‍यावरील गावांमध्ये आपत्ती निवारा शेड बांधण्यात येणार होती. गावांना धोका असल्यास गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागते. त्यासाठी अशी निवारा शेड उभारण्यात येणार होती. ती उभारलीच गेली नाही.

या चक्रीवादळात खासगी मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. त्याचबरोबर शासकीय मालमत्तेचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या इमारती दुरुस्त केल्या जातील. पुन्हा उभ्या राहतील. आता पुढे सर्व शासकीय इमारतीचे बांधकाम वादळ प्रतिरोधक पद्धतीनेच व्हायला हवे. या इमारती वादळातदेखील भक्कमपणे उभ्या राहतील अशाप्रकारे बांधण्याची गरज आहे. म्हणजे वारंवार होणारे नुकसान टाळता येईल. वादळ आले, अतिवृष्टी झाली किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये संपर्क यंत्रणा चालू असणे आवश्यक असते. ती कोलमडली की परिस्थिती अवघड होते. निसर्ग चक्रीवादळात तेच घडले. संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. अशावेळी धावून आले हॅम रेडिओ ऑपरेटर. प्रत्येक वेळी पोलिसांची बिनतारी संदेश यंत्रणा उपयोगी पडेलच असे नाही. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हॅम रेडिओ केंद्र सुरू करणे ही काळाची गरज आहे.

या चक्रीवादळात लोकांची घरे कोसळली. काही घरांचे पूर्ण तर काही घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या. संसार उघड्यावर आले. होत्याचे नव्हते झाले. असे असतानादेखील रायगडमधला कोकणी माणूस सरकारी मदत मिळत नाही म्हणून रडत बसला नाही. येथील लोकांनी स्वतःच्या पैशातून दुरुस्तीची कामे सुरू केलीत. इतकेच नाही तर आपले दुखः विसरून कोकणी माणूस शासकीय यंत्रणेलादेखील मदत करत आहे. रस्त्यांवरील झाडे उचलून रस्ता मोकळा करणे, विजेचे खांब उभारणे आदी कामात येथील माणसे शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या संकटाला रायगडचा माणूस धैर्याने तोंड देतोय. संकटाकडे पाठ न फिरवता तो संकटाला सामोरा जातोय. यापूर्वी देखील रायगड अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन उभा राहिला आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून रायगड सावरेल, पुन्हा उभा राहील. त्यासाठी येथील माणसांच्या पाठीशी उभे राहून फक्त लढ म्हणायला हवे.