घरफिचर्सभटकंतीतला पाऊस.... पावसातील भटकंती.....

भटकंतीतला पाऊस…. पावसातील भटकंती…..

Subscribe

युवा पिढी ट्रेकला ट्रिप म्हंजे गिर्यारोहणाला, सहल समजून चालल्याने थोडी समस्या येत आहे. गिर्यारोहणात साहस, सोबत्यांची काळजी, निसर्ग पाहण्याची इच्छा, महत्त्वाचा इतिहास या गोष्टी पाहण्याऐवजी, अय्याशी, ‘फुल टु मजा’, अशा वेगळ्या संकल्पनांचे खेळ सुरू आहेत. पूर्वी हौशी संस्था असायच्या. आता चक्क व्यावसायिक संस्था सुरू झाल्या आहेत. वाढत आहेत. त्यांना युवा ट्रेकर्सचे लाड पुरवून बक्कळ पैसा अनायासे मिळवायचा आहे. युवापिढी फेसबुक-इंटरनेटच्या मायावी जगात ‘लाईक्स’ च्या मोहपाशात गुरफटत जात आहे.

जून महिन्यात, आकाशात काळे ढग जमायला सुरुवात झाली की घुमक्कडांच्या पावसाळी भटकंतीच्या गप्पा रंगात यायला सुरुवात होते! लोहगड चढताना पाऊस कसा ‘टोचत’ होता, ठोसेघरचा धबधबा चाळकेवाडीतून कसा पूर्णपणे कोसळताना दिसतो, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या चोरला घाटात राहण्याची गंमत कशी न्यारी आहे? अशा असंख्य तुकड्यांच्या गप्पा तासाचा काटा विसरायला लावतात. गप्पांच्या ओघात ‘कौन कीतना पानीमें’ हे जोखण्यासाठी जरा वेगळे हटके मार्ग, ठिकाणं सुचवली जातात आणि बाहेर पावसाचा वाढलेला वेग आणि त्यात भिजण्याचा तारुण्यसुलभ मनाचा आवेग, एकमेकांवर कडी करून बेधुंद, रोमांचित मन संवेदनशील, हळूवार होऊन जातं. हा सारा मामला पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी वर्षभरात कधी नाही एवढी गर्दी केवळ पावसाळ्यातल्या चार महिन्यात, सह्याद्रीतल्या दर्‍याखोर्‍यांत अक्षरशः फुलून येते.

बरं, सह्याद्रीत पावसाळी पर्यटनासाठी अक्षरशः असंख्य जागा असल्याने, दर शनिवार-रविवारी ठराविक जागांवर गर्दी ओसंडून वाहत असते. कर्जत-कसारा-खोपोली-लोणावळा ही सार्‍या भटक्यांची आवडती ठिकाणं आहेत. झिम्माड पावसात भेट द्यायला, परंतु भोर-आंबवडे-बनेश्वर, चाफळ-पाटण-कोयना-नवजा किंवा अजिंक्यतारा-ठोसेघर-कास किंवा वाडा-खोडाळा-जव्हार किंवा घोटी जवळचे भंडारदरा, महाराष्ट्राला लागूनच गुजरात राज्यातलं सापुतारा-उद्वाडा, अशी कितीतरी ठिकाणं भटक्यांच्या आवर्जून जायच्या यादीत असतात..

- Advertisement -

भर पावसात कोकणात केलेली भटकंती तर कुणीच विसरू शकणार नाही अशी असते. आरे-वारे रस्त्याने गणपतीपुळे -विजयदुर्ग मार्गावर असंख्य ठिकाणांना भेट देत केलेली भटकंती, दीर्घकाळ मनात घर करते. घुमक्कड हळूच वर्गवारी करून, पावसात डोंगरावर फिरायचं?

समुद्रकिनारी लाटा अनुभवायच्यात? फेसाळलेला समुद्र बघायचाय? धबधबे अनुभवत दिवसभराचा शीण घालवायचाय? अशा विचारात असतो. पावसात चंचल झालेल्या मनाला कुठल्याच गोष्टी मोजून मापून केलेल्या आवडत नाहीत. त्यामुळे गाडीने केलेली दूरवरची रपेट, माळशेज घाटातल्या धुक्यात हरवून जाणं, लयदार वळणं घाटांतून घेताना असंख्य धबधब्यांची माळ बघत, त्यात भिजत-भिजत पुढे जाणं हे सारं श्वासाइतकं सहज असतं पावसात भटकताना! उगाच नाही निर्जन समुद्रकिनार्‍यावर भर पावसात मनाजोगत्या साथीबरोबर तरुणाईला आनंद लुटावंसं वाटतो ते!

- Advertisement -

काही भटक्यांना धबधब्यात डुंबायला, धबधबे ओलांडायला, साहसीवीरांना धबधब्यातून रॅपलिंग करायला खूप आवडतं. अशा सर्व भटक्यांना नेरळ, वांगणी, भिवपुरी, कर्जत, कसारा, वाडा, मोखाडा, पांडवकडा, खोपोली, लोणावळा, माळशेजघाट, ताम्हीणीघाट आणि असंख्य ठिकाणचे धबधबे साद घालीत असतात.

बर्‍याच आबालवृद्धांना ‘भुशी डॅम’सारख्या नावाजलेल्या ठिकाणी जाऊन पायरीवरून ओसंडून वाहणार्‍या पाण्यात बसायचे असते. काहींना वैतरणा धरणाच्या पाण्याला डोळेभरून पाहायचे असते. तो शांत डोह, शांत जलाशय, रम्य परिसर, पाहत हिंडायचे असते. काहींना साध्या, मोठ्या किंवा तारांकित रिसॉर्ट्मधे फक्त ‘पडायचं’ असतं.

परंतु या सार्‍या भटकंतीत ट्रेकर्सवाल्यांचं एक अनोखं असं विश्व असतं. वेगवेगळ्या ऋतूंत आपलं वेगळेपण आगळ्यावेगळ्या पद्धतीने दाखवणारा निसर्ग, वर्ष ऋतूंत ट्रेकर्सना जलधारांत चिंब भिजवून, बाहुपाशातच घेतो जणू! साहजिकच ट्रेकर्स, त्यातही नव्या नव्हाळीचे ट्रेकर्स किंवा सळसळती युवावस्था देहबोलीतून व्यक्त करू पाहणार्‍या ट्रेकर्सनादेखील, पावसाळ्यात ट्रेकिंगचा-जास्तीचा आनंद लुटावासा वाटला तर ते फारसं चूक म्हणता येणार नाही.

नेमक्या याच धुंद-स्वच्छंद वातावरणात, तणावरहीत मुक्त भटकंती चालू असताना, खाताना दाताखाली खडा यावा त्याप्रमाणे काही अघटित अनपेक्षित घटनांची चाहूल समस्त पर्यटनविश्वाला काळजी करायला भाग पाडत आहे आणि बघायला गेलं तर तो आज सार्‍या पर्यटकांच्या चिंतेचाच मुद्दा बनल्याने, सर्वत्र चर्चेत आहे. मुद्दा असा की, पुण्या-मुंबई-नाशिक जवळच्या डोंगरांवर अचानक अलोट गर्दी कशी काय व्हायला लागली? धबधब्यांच्या ठिकाणी, धबधब्याच्या पाण्यात खेळण्याऐवजी धबधब्यात रॅपलिंग करणार्‍यांची संख्या सतत वाढती कशी काय? अचानक डोंगरांवर एखादा गिर्यारोहक अडकून पडल्याचं पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात ऐकू येऊ लागलं ते कसं काय? पूर्वीपेक्षा अपघातांची संख्या वाढली ती कशी काय? आणि हरिहर, लोहगड, कळसुबाई आदी ठिकाणी ट्रेकर्सची अलोट गर्दी, अचानक कशी वाढायला लागली?

वरील सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हिमसह्याद्री क्लबचे सर्वेसर्वा आणि पालघर जिल्हा गिर्यारोहण महासंघाचे सचिव विठ्ठल आवारी यांच्याशी संपर्क साधला असता आवारी म्हणाले, तरुणाईला अफाट खुळ आहे सेल्फीचं. सेल्फीचे फोटो फेसबुकवर टाकण्याचं. त्यावर भरपूर लाईक्स मिळवण्याचं आणि आपण भव्य दिव्य असं काही केल्याचं समाधान आपल्या खात्यावर जमा करण्याचं! त्या एका छंदापायी अनेक जण तसेच जणी पुढच्या वेळेला आपल्या मित्र-मैत्रिणींनादेखील सोबत घेऊन जातात. दुसरी गोष्ट म्हंजे ही युवा पिढी तंत्रकुशल असल्याने आपल्या ट्रेकिंगच्या मार्गाचं आलेखन करू शकते. अचूक वेळी अचूक ठिकाणी असू हे ताडू शकते. म्हणूनच, जीपीएस वगैरे गोष्टींच्या आधारे, तरुणाईच्या भाषेत ‘टकाटक’ ट्रेक करण्याकडे युवा पिढीचा कल असतो. शिवाय या पिढीकडे पैसा आहे. पैसा असल्याने गाड्या, मोटारसायकली, पार जंगलांपर्यंत नेऊन ट्रेकच्या आयोजकांना अक्षरशः मागतील ते दाम देण्याची तरुणाईची ताकद असते. हीच गोष्ट गावकरीही जाणतात.

किरकोळ किमतीची झुणकाभाकर ऐन गर्दीच्या वेळी खूप खूप अधिक किमतीला मिळायला लागते. किंवा हल्ली मांसाहारी जेवणाचीसुद्धा सोय गावकरी करू लागल्याने गावकर्‍यांकडूनदेखील, ‘जो जास्त देईल त्याचीच खातिरदारी’ करण्याची वाढती सवय दिसून येते. या सगळ्याचा परिणाम एकूणातच ट्रेकिंगवर होतो आहे असं दिसतं. ज्या गडावर पूर्वी वेगळ्या भारलेल्या अभिनिवेशाने ट्रेकर ट्रेक करायचा, तिथे आता टेक्नोसॅव्ही, तंत्रकुशल ट्रेकर यशस्वी मोहिमेचं, गाजता पराक्रम दाखवण्यासाठी (?) ट्रेक करतो अशा पद्धतीचा सारा खेळ बघण्यात येत आहे. कळसुबाई शिखरावर चढाईच्या मोहिमेच्यावेळेस आलेल्या अनुभवाचा दाखला द्यावासा वाटतो. मी जेव्हा रात्रीच्या वेळी कळसुबाई शिखरावर चढाईसाठी माझा चमू घेऊन गेलो, तेव्हा ‘बारी’ गावापासून ते पार शिखरापर्यंत असंख्य विजेर्‍या (बॅटर्‍या) चमचमताना मी पाहिल्या. कळसुबाई शिखरावर चढताना लागणार्‍या तिन्हीही शिड्यांवर तमाम पब्लिक ‘अडकलेल्या’ अवस्थेत होतं. गर्दीच्या वेळी एखादी दुर्घटना होऊ शकते हे भान कुणालाच राहिलं नाही.

विठ्ठल आवारींनी सांगितलेला प्रसंग केवळ ऐकतानासुद्धा अंगावर काटा येत असताना, ट्रेकिंगमधे हा फरक कसा होत गेला? आणि वॉटर रॅपलिंगबद्दल तुमचं मत काय? असं विचारल्यावर विठ्ठल आवारी म्हणाले, मी सुद्धा तरुणाईला वॉटर रॅपलिंगला घेऊन जायचो. हल्लीच्या अनेक संस्थांपेक्षा जास्त सुरक्षित घेऊन जायचो. दरवेळी नवा रोप (दोर) लावून सर्व मोहीम करायचो. परंतु मला त्यात दोन गोष्टी आढळल्या. एक म्हंजे आत्ताच्या तरुणाईला एकदा कार्यक्रमाचे पैसे घेतले म्हंजे कुठल्याही परिस्थितीत तो कार्यक्रम व्हायलाच हवा या ‘मोड’ (हव्यासात) मधे ते असतात. त्यामुळे वॉटर रॅपलिंगला इथे पाणी नाही तर पुढे, पुढे नाही तर आणखी पुढे जाणं वॉटर रॅपलिंगसाठी आवश्यक झालं जे नकोसं वाटू लागलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हंजे कितीही सुरक्षितरित्या आपण वॉटर रॅपलिंग केलं तरी पावसाच्या वाढीव पाण्यामुळे वाहून येणारे दगड-धोंडे हे अपघाताचं प्रमाण वाढवू शकतात. शिवाय कातळावर रोप (दोर) घासला गेल्याने तो सतत बदलणं, त्यानिमित्ताने सगळीच यंत्रणा अत्याधुनिक करणं हे आवश्यक झाल्याने, विशेषतः वॉटर रॅपलिंग हा साहसप्रकार न करण्याजोगा वाटल्याने मी थांबलो. आज हा साहसी प्रकार कुणी करू नये कारण तो अयोग्य आहे असं मला वाटतं.

साहजिकच डोंगरावरील ट्रेकर्सच्या गर्दीचा विषय आला. त्याबद्दल विचारलं असता विठ्ठल आवारी म्हणाले, आता लोहगड किल्ल्याचे दरवाजे सकाळी ७ वाजता उघडतात. संध्याकाळी ७ वाजता बंद होतात. किंवा कास पठाराचं ‘ऑन लाईन बुकिंग’ केल्याशिवाय कास पठारावर जाता येत नाही किंवा अंधारबन, ताम्हीणीघाटात केवळ १५० लोकांनाच जाण्याची संधी मिळणार आहे हे वाचून कसं वाटतं? आता वनव्यवस्था समिती निवडक माणसांना किल्ल्यावर पाठवू लागली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली जिल्हा समिती काम करू लागली आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने, जिल्हावार गिर्यारोहण समितीची स्थापना करायला सुरुवात केली आहे. आता ट्रेकिंग ग्रुप नोंदणीकृत असणं, ग्रुपमधे डॉक्टर असणं, तज्ज्ञ ट्रेकर असणं, पोलीस चौकीला कळवलेलं असणं, रेस्क्यू(बचावकार्य) समितीला कळवलेलं असणं, नव्हे सार्‍यांची परवानगी असणं हे आता बंधनकारक आहे. थोडक्यात वाटलं आणि गेला ट्रेकला असं आता होणं शक्य नाही. आता आगाऊ आरक्षण करून मगच गाद-किल्ल्यांवर जाता येणार आहे. त्यामुळे ज्यांना तातडीने किल्ले बघायचे आहेत त्यांना दूरवरचे, वहिवाटीवर नसलेले किल्ले बघावे लागणार आहेत. गेल्या काही वर्षात बदलत गेलेलं हे चित्र आता फार फार वेगळ्या वळणावर आहे.

विठ्ठल आवारींशी बोलल्यानंतर महाबँक ट्रेकर्सचे फाऊंडर मेंबर आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, मुंबई जिल्हा या संघटनेचे सचिव असलेल्या वीरेश चौधरींना ट्रेकिंगमधील गर्दीच्या आणि इतर समस्यांबद्दल विचारलं असता, चौधरी म्हणाले, युवा पिढी ट्रेकला ट्रिप म्हंजे गिर्यारोहणाला, सहल समजून चालल्याने थोडी समस्या येत आहे. गिर्यारोहणात साहस, सोबत्यांची काळजी, निसर्ग पाहण्याची इच्छा, महत्त्वाचा इतिहास या गोष्टी पाहण्याऐवजी, अय्याशी, ‘फुल टु मजा’, अशा वेगळ्या संकल्पनांचे खेळ सुरू आहेत. पूर्वी हौशी संस्था असायच्या. आता चक्क व्यावसायिक संस्था सुरू झाल्या आहेत. वाढत आहेत. त्यांना युवा ट्रेकर्सचे लाड पुरवून बक्कळ पैसा अनायासे मिळवायचा आहे. युवापिढी फेसबुक-इंटरनेटच्या मायावी जगात ‘लाईक्स’च्या मोहपाशात गुरफटत जात आहे. आत्ताशी कुठे ट्रेकर्सच्या मुक्त संचारावर निर्बंध लावण्याचे उपाय केले जाण्याची तयारी सुरू केली असल्याने नजीकच्या भविष्यात मार्ग सापडावा अशी आशा करूया.

३५-४० वर्षांपूर्वी ट्रेकिंग करणार्‍या पिढीला आज ट्रेकिंग विश्वाला लागलेलं हे वेगळं वळण आक्षेपार्ह वाटेलसुद्धा, परंतु युवा पिढीच्या बदलत्या आव्हानांना सामोरं जाऊन पर्यटनविश्वात शिस्त कशी टिकवता येईल हेच सच्चा घुमक्कडाने पाहिलं पाहिजे. नाहीतर भरपूर संख्येने गाड्या, चिक्कार बाटल्या आणि घुस्मटवून टाकणारी गर्दी निसर्गाबरोबर माणुसकीही ओरबाडायला लागेल! आणि ती वेळ कुणावरही येऊ नये असेच कुणालाही वाटेल!!

पावसाळा २०१९.
घुमक्कडांसाठी खास वेगळ्या वाटा.

१. मुंबई- मनोर-चारोटीनाका-जव्हार-दाभोसा-विक्रमगड-मुंबई.
२. मुंबई-बनेश्वर-आंबवडे-मुंबई.
३. मुंबई-चाफळ-पाटण-कोयनानगर-नवजा -मुंबई.
४. मुंबई-दाभोसा-खानवेल-उद्वाडा-मुंबई.

-उदय ठाकूरदेसाई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -