घरफिचर्ससारांशकेव्हा न-मावळणारा, सह्यपुत्र-अरुण सावंत !

केव्हा न-मावळणारा, सह्यपुत्र-अरुण सावंत !

Subscribe

प्रिय,अरुण माझ्या वेगवेगळ्या उपक्रम मोहिमांना तुझी हमखास दाद मिळे. आज,तू कोकणकड्यापाशी विसावलायस. एक वर्ष होईल. गिर्यारोहण माझा श्वास त्यामुळे तुझे प्रतिदिन स्मरण नित्याचेच. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-भिरंवडेचा सुपुत्र तू. जिल्ह्यात आजही गगनबावडा, फोंडा, आंबोली तिन्हीं घाटात कोणती आपत्ती ओढवल्यास रेस्क्यू ऑपरेशन टीम इथे अद्यापही नाहीय. तुझ्या कार्यकर्तृत्वाचा स्मरण-सन्मान म्हणून मी माझ्या ‘सिंधू-सह्याद्री ऍडव्हेंचर क्लबद्वारे’ जिल्ह्यातील युवकांना तू सुरुवात केलेल्या ‘रेस्क्यू ऑपरेशनचे’ प्रशिक्षण देऊन तुला ही आदरांजली वाहतोय.

गतवर्षी इतक्यात मन संतोष शिखर चढाई मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. उद्या निघायचेय या उत्साहात आवराआवर करीत असतानाच दत्तू शिंदेचा फोन आला. सरळ म्हणाला,तुला कळले कारे ? रामेश्वर, अरे अरुण कोकणकड्यावर missing आहे. खोपोलीची यशवंती टीम सर्चला गेलीय.
काय ?? missing ?? आणि अरुण ?? केव्हाही शक्यच नाही. चक्क हसलो मी. समजा छोटा मोठा फॉल जरी झाला असेल तरी तो कुठूनही बेलपाडा गाठेल किंवा नळीची घळ गाठून कोकणकडा गाठेलच. किंबहुना, इतक्यात तो परतलाही असेल असे दत्तास बोलून परत मला अपडेट कर सांगून मी पद्माकरचा नंबर शोधू लागलो.
अरुण पोहोचलाही असेल, नाहीतर?? नाहीतर काय ?? या भयानक विचारातही मी कोलमडून जात होतो.
जो कोकणकडा अरुणचा लाडका तिथे अरुण missing ?? केवळ असंभवनीयच. मग, संभवनीय काय ?
अवघ्या 8 मिनिटांत पुन्हा दत्तातो, काही बोलायच्या आत मीच त्याला म्हणालो, सापडला ना? अरे अरुण तो. 63 वर्षाचा नाहीय तर अजूनही 36 वर्षांचा सळसळता उत्साह तो. दत्तू मध्येच मला थांबवून सावकाश बोललाअरे, अरुण कायमचा missing. गेला रे पूर्ण दिवस फक्त वेदना  वेदना आणि आक्रोश !
मी ज्या क्षेत्रात काही मिळवलं, ज्या क्षेत्राने मला खूप काही देऊ केलं, ज्याच्यासोबत आणि साक्षीने माझा आत्तापर्यंतचा प्रवास झाला. तो अरुण अकस्मात मावळला, हे मनाला आजही पटू शकत नाहीय.
आयुष्याला वळण देणार्‍या गोष्टी अकल्पितपणे वाट्याला येतात. अंगभूत क्षमतांना आकार देण्याचे काम त्या करतात. ज्या क्षेत्रात काही करून पहावे लागते व प्रत्यक्षात आपण केलेले नसते त्या क्षेत्रात आपल्या कर्तेपणाने मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक लागतोच.अरुण त्या अर्थाने माझा गुरुबंधू होता.
माझा सखा-जिवलग. इतकंच काय, तर माझा गिर्यारोहण क्षेत्रातील बाप. माझ्या दिवंगत वडिलांच्या जाण्यानं मी इतका केव्हा व्यथित झालोही नसेन पण अरुणच्या जाण्यानं मी अक्षरशः घायाळ झालोय.
एकेकाळी उत्तुंग शिखर प्रस्तरारोहणाचा हव्यास असलेली अरुण-रामेश्वर ही जोडी वर्तमानपत्रांचे रकाने साहसाने भरत होती.
भले काही वर्षांपूर्वी आमचे मार्ग भिन्न झालेतही. पण, जिव्हाळ्याचे ऋणानुबंध केव्हाच आटले नव्हते. फोनवरील संवादातही भावनिक उत्कटता होती. काही क्षणांच्या संवादातही आंतरिक अद्वैत अनुभवण, असं नातं होतं. कोणतेही व्यावहारिक गणित नसल्याने जमाखर्च नव्हता होती फक्त भावभक्ती !
माझा‘ अरुण’ म्हणजे, गिर्यारोहण क्षेत्रातला हुकमी एक्का. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर सराईतपणे वावरणारा  सळसळत्या उत्साहाचा, उत्स्फूर्ततेचा जणू झराच.
अरुण म्हणजे एक स्वतंत्र प्रतिभानवनिर्मितीची सदैव स्फूर्तीसृजन क्षमतेचे एक रम्य रूप. त्याच्या त्या प्रतिभेचे आविष्करण कोणत्या क्षणी व कोणत्या रूपात घडेल हे सांगणे अवघड होते.
बरं, आज तो कुठे विसावलाय तर, त्याच्या आवडीच्या स्थलावर. कोकणकड्यावर !
माहीत नाहीय यालाच  विधिलिखित म्हणावं का ?
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एकमेवाद्वितीय असा हा कातळ शिल्पी-रौद्रभीषण कोकणकडा !
माळशेज घाटावरील हरिश्चंद्रगडाची ही मावळत बाजू. या कड्याची उभी उंची निव्वळ 1600 फूट आणि त्या खाली बेलपाड्यापर्यंत खोल विस्तीर्ण खोरे. घेर म्हणाल तर आडवा किमान दोन किमी. बरं, हा कडा एकसंध बेलाग आणि वाटीसारखा अंतर्वक्र. माथ्यावरून उभ्याने खाली पहाण्याची हिंमत होत नाही. वरून रॅपलिंग करणारा कड्यावरून 4-5 फूट उतरला की थेट 800 फुटांवर टेकावा. तोपर्यंत फक्त अधांतरीबुलंद काळाकभिन्न कड्याचे ते रौद्रभीषण रूप फक्त पहात खाली रोप फीड करीत रहायचा.
90च्या दशकात अरुण आणि मी  कित्येकदा कोकणकड्यावर वेगवेगळ्या मार्गांनी अगदी उन्हाळी-पावसाळी भटकलोय. सच्चा गिर्यारोहकास कोकणकडा नेहमीच सादावतो. निसर्ग वेड्या मिलिंद बर्वेने केवळ कोकणकड्याचे भव्यदिव्य अजस्त्र रूप पाहून तिथेच तीन हजार फूट उंचीवरून स्वतःस झोकून दिले होते. नंतर त्याचे शव काढण्याच्या निमित्ताने रेस्क्यू ऑपरेशन करताना अरुण पहिल्यांदा कोकणकड्यास भिडला होता.
त्यानंतर अरुण शिखरांशी भीडतच गेला. कोणत्याही शिखरावर शक्यतो अजिंक्य मार्गाने आरोहण करायचे, ही अरुणची खास ओळख. माझ्यापेक्षा अरुण 13 वर्षांनी मोठा. त्यामुळे ज्येष्ठ भावाच्या नात्यानं काळजी घेत आणि गुरूच्या नात्यानं विश्वास ठेवत मला शिखरावर बहुतेकदा पहिला भिडवायचा. चुकलोच तर दम द्यायचा आणि कमी वेळेत जास्त पल्ला सर केला तर मिठी मारायचा. क्लाइंबिंग करताना बर्‍याचदा फॉलसुद्धा होतात, हे गृहीत असते. मला आजही आठवतंय, श्री मलंग गडाच्या समोरील देवणी शिखरावर अजिंक्य साऊथ फेसने चढाई करीत असताना माझा सर्वात जास्त उंचीचा म्हणजे जवळपास 120 फुटाचा फॉल झाला होता. फ्री फॉल टेकनिक घेत असताही गोंधळून मी रोपला हात घातलाच त्यामुळे दोन्हीं हाताचे तळवे घर्षणाने चक्क जळले होते. शिवाय रोपच्या लुपमध्ये अडकलेले लुझ दगड खांद्यावरही आदळले होते. बेसकॅम्पवर पुढील 4 दिवस अरुणकडून फक्त सेवा प्रेम मिळत होतं.
अरुण म्हणजे कोणत्याही भीतीची तमा न बाळगणारा खराखुरा सह्यपुत्र. जिकरीचे ट्रेक्स कोकणकडा-ड्युक्सनोज सारखी गगनभेदी शिखरं असोत, पाताळयंत्री खोल दर्‍या असोत किंवा त्यातली रेस्क्यु ऑपरेशन असोत, की गुहा-गुंफांचा ठाव घेणार्‍या भुयार संशोधन मोहिमा असोत. प्रत्येक मोहिमेवर अरूणची स्वतःची एक छाप असायचीच. माझ्या मागील 32 वर्षांच्या गिर्यारोहण क्षेत्रात अरुणसारखा गुरु-मित्रसखा अन्य मला कुणी भेटला नाही.  त्याच्या क्षमतेचा ‘गिर्यारोहक’ ऐकला सुद्धा नाही.
मागील 40 वर्षे गिर्यारोहण क्षेत्रात अरूणचा कमालीचा ठसा होता. किंबहुना आजही तो निवृत्ती नंतरही जास्तच सक्रिय होता. अरुणमुळे ईतर गिर्यारोहक आणि गिर्यारोहण संस्थांना नकळत का होईना, पण प्रेरणा मिळून स्वतःचे विविध विशेष उपक्रम मोहिमा घेण्याची सुदृढ निकोप स्पर्धा निर्माण झाली होती.
इतकेच नव्हे, तर अननुभवी लोकांनाही साहस करू द्यायची कल्पना अरुणनेच जास्त प्रभावी राबविली.
आपण जर लाखमोलाचा अनुभव सुरक्षितपणे जर देतोय, मेहनत करतोय तर परवडणारे शुल्क का घेऊ नये,असेही त्याचे ठाम मत होते. पण त्याने त्याला बाजारू स्वरूप केव्हाच येऊ दिले नाही.
गिर्यारोहणात प्रतिस्पर्धी असतो निसर्ग. आणि निसर्गनिर्मित आव्हानांचा सामना करत ध्येय गाठायचे; तर जोखीम घ्यावी लागते, ते साहस करावेच लागते. म्हणून गिर्यारोहणाचा साहसी खेळात समावेश झाला. यात शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी लागते म्हणून साहसी खेळांना एक्स्ट्रीम स्पोर्ट देखील म्हटले जाते.
गिर्यारोहणात जोखीम असते. पण ही जोखीम हे बेभान साहस नसते, तर निसर्गाच्या आव्हानातील धोके व त्यावर मात करण्यासाठी लागणारी आपली क्षमता याचा विचार करून मोजून मापून घेतलेली जोखीम (calculated risk) असते. त्यामुळे गिर्यारोहणात जोखीम आणि साहस यांचे साहचर्य असते.
इतर खेळ व साहसी खेळ या दोन्हीमध्ये तत्त्व सारखेच असते. इतर खेळात मानवाची मानवाशी स्पर्धा असते आणि साहसी खेळात मानवाचा प्रतिस्पर्धी निसर्ग असतो. दोन्हीमध्ये मानवी क्षमतेचा कस लागतो.
गिर्यारोहक आणि गिर्यारोहण संस्था हेच साहसी क्रीडा प्रकाराची वाढ व प्रसार करण्याचे कार्य आजवर करतायत. अरुण सावंत स्वतः एक गिर्यारोहणातील चालती बोलती गिरी-संस्थाच होती.
काही गोष्टी दैवाने द्याव्यात आणि माणसाने घ्याव्यात अशा असतात याउलट काही गोष्टी माणसाने कराव्यात, दैवाने पाहाव्यात आणि नियतीने नोंदवाव्यात अशा असतात. अरुणचे उपक्रम आणि त्याच्या भन्नाट कल्पना हे एक निर्विवाद त्याचे कर्तृत्व होते.
अरुणने, नुसते काही गिर्यारोहकच घडविले नाहीत तर सामाजिक बांधिलकीचे एक परिमाण दिले. त्यामुळे, आजही घाट खिंडीत वाहनास कुठे अपघात झाला किंवा कोणी धोकादायक परिस्थितीत अडकले की त्यांना मदत करण्यासाठी गिर्यारोहण संस्था कोणत्याही अपेक्षेशिवाय कर्त्यव्य भावनेने धावून जातात. रेस्क्यु ऑपरेशन म्हटले की त्यावेळीसुध्दा अरुणचेच नाव अग्रक्रमाने घेतले जायचे.त्याचा पुढाकार असायचा.
अरुणने आणि आम्ही समकालीन गिर्यारोहक, गिर्यारोहण संस्थांनी आजही  स्वच्छंदी-सुरक्षित निसर्ग साहसाला साहस-अभ्यास-संशोधन म्हणून प्राधान्य दिलेय. प्रोफेशनल किंवा एक्सपर्ट म्हणून ओळख झाली, मानमरातब मिळालेत पण  गिर्यारोहण केव्हाही धंदा  होऊ दिले नाही.
अरुणचे जाणे, हा नैसर्गिक अपघात नसून त्याच्या  बिले न घेण्याच्या थोड्याशा गाफीलपणा मुळे झालाय. चूक ही चूकच. इथे सावरावयास कुणास संधी नसते. म्हणून अरूणच्या जाण्यानं ही चूक जास्त अधोरेखित झालीय. चुकीने धडा दिला. इतरांना दाखविला पण, त्यासाठी प्रिय अरुण तुला का किंमत द्यावी लागली? ही, मला आम्हा गिर्यारोहकांना सल बोचतच राहील.
‘काळ’ हे एक कोडेच होय. जगण्याचा एक भाग डोळ्यात दृष्टी, कानात श्रवणशक्ती नांदत असते त्याप्रमाणे माणसाच्या मनात दिक आणि काळ यांची जाणीव होत असते. जे पैलतीरी त्याला काळाचा स्पर्श होत नाही आणि जे ऐलतीरी,ते काळा शिवाय असू शकत नाही. माणूस एखाद्या क्षणी देहभान हरपून जातो तेव्हा तो कालातीत होतो.अरुण कोकणकड्यापाशीच देहभान हरपून एक झाला.
गिर्यारोहक-अरुण सावंत !.
या सम हा गिरीकंदरी माळरानी उपाशि तापाशी  शोधाच्या ध्येय्यापायी  वेडा होणारा पुन्हा दुसरा अरुण सावंत होणे नाही.
मला,असा गुरुबंधू मिळणे नाही
प्रिय,अरुण माझ्या वेगवेगळ्या उपक्रम मोहिमांना तुझी हमखास दाद मिळे. आज,तू कोकणकड्यापाशी विसावलायस. एक वर्ष होईल. गिर्यारोहण माझा श्वास त्यामुळे तुझे प्रतिदिन स्मरण नित्याचेच. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-भिरंवडेचा सुपुत्र तू. जिल्ह्यात आजही गगनबावडा, फोंडा, आंबोली तिन्हीं घाटात कोणती आपत्ती ओढवल्यास रेस्क्यू ऑपरेशन टीम इथे अद्यापही नाहीय. तुझ्या कार्यकर्तृत्वाचा स्मरण-सन्मान म्हणून मी माझ्या ‘सिंधू-सह्याद्री ऍडव्हेंचर क्लबद्वारे’ जिल्ह्यातील युवकांना तू सुरुवात केलेल्या ‘रेस्क्यू ऑपरेशनचे’ प्रशिक्षण देऊन तुला ही आदरांजली वाहतोय.
मला खात्री आहे, तू सदैव सोबत होतासआत्ताही अन पुढेही असशील !
कोकणकड्याच्या भव्य विवरात अरुण तुला माझी आर्त साद ऐकू येईल
अरुणने अगदी उत्कटतेने तन्मयतेने आपल्या जीवनातल्या भूमिकेची,आणि गिर्यारोहण क्षेत्राची उंची वाढविण्याचे कार्य अगदी शेवटच्या श्वासापर्यंत केले. पुन्हा गिर्यारोहण क्षेत्रात असा अरुणोदय होणे केव्हाही शक्य नाही.

- Advertisement -

रामेश्वर सावंत

लेखक गिर्यारोहत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -