घरफिचर्ससाधी माणसं

साधी माणसं

Subscribe

आजही मामाच्या गावाला जातो तेव्हा थकलेला मामा त्याच्या अर्ध्या धोतरात प्रसन्न हसत उभा राहतो तेव्हा एक निर्मळ मनाचे झाड आनंदात न्हाऊन गेल्यासारखे दिसते आणि त्याच्या अंगावर नसला तरी समोरच्या माणसावर त्याने सुखी माणसाचा सदरा घातलेला असतो. दुसरी व्यक्ती म्हणजे माझी मावशी. आज मावशीच्या घरात श्रीमंती भरभरून वाहत आहे. आज मावशे या जगात नाहीत, पण मावशी आलेल्या भरपूर पैशाने बदलली नाही. आजही मला तिचा कष्टकरी चेहरा एका वेगळ्या तेजाने चमकलेला दिसतो तेव्हा तिच्या मुलाची श्रीमंती फिकी पडते.

काळ बदलला, माणसं बदलली… असं म्हणतात. पण, मी काही माणसं बघितली आहेत जी काही दशकांपूर्वी होती, तशीच ती आजही आहेत. बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी आपले रंगरूप बदलले नाही. ही साधी माणसे आयुष्यात खूप काही कमवती झाली नाही की त्यांच्या नावाचा डंका वाजला नाही, पण म्हणून ती मोठी झाली नाहीत का? माझ्या मते ती अतिशय साधी होती म्हणूनच त्यांची समाजात वेगळी ओळख आहे. रात्रीस खेळ चाले… या मालिकेत वच्छीचा नवरा आबा नाईक तुम्ही बघितला असेलच. किती सरळ रेषेत चालणारा माणूस. त्याच्या नशिबी संकटं कमी का आली, पण त्याने आपला सरळमार्गी स्वभाव कधी सोडला नाही. कदाचित अशा साध्या सरळ माणसांमुळे समाजाचा समतोलही साधला जातो. जगात माणूसरूपी गिधाडे पैसाअडका, संपत्ती, जमीनजुमल्यावरून एकमेकांचे लचके तोडतात, महिलांवर होणारे अधिकतर अत्याचार हे त्यांच्याच नातेवाईकांकडून मोठ्या संख्येने होतात तेव्हा अशी साधी माणसं स्वतःच्या चांगल्या वर्तणुकीने माणसांचा एकमेकांवरचा विश्वास आजही कायम असल्याची साक्ष देतात…

या साध्या माणसांपैकी माझ्यासमोर लगेच येतो तो माझा धाकटा मामा. इतका पाप्याचा पितर असलेला माणूस मी तरी आजतागायत बघितलेला नाही. शेती आणि बागायतीवर मोठ्या कुटुंबाचे भागणार नाही म्हणून मोठ्या मामाने त्याला मुंबईला गिरणीत नोकरीला पाठवले. पण, गिरणीतील साच्याचा प्रचंड आवाज ऐकून मामा घाबरला तो काही दिवसांत काम सोडून गावाला परत आला आणि पुन्हा त्याने मुंबईचे तोंड बघितले नाही. महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोव्यात शिरल्यानंतर काही मिनिटांत येणारे पेडणे तालुक्यातील उगवे हे माझ्या मामाचे गाव. दोन्ही मामा म्हणजे जणू राम लक्ष्मण! मोठ्या मामाच्या शब्दाबाहेर छोटा मामा कधी गेला नाही. मोठ्या मामांच्या नजरेतून त्याला सर्व काही समजायचे. दिवसभर शेतीभाती, बागायतीची कामे करायची आणि रात्री देवळात भजन कीर्तनात मन रमवायचे. बाहेरच्या सोडा कधी आपल्या माणसांनाही तो उलटून बोलला असे झाले नाही. त्याला स्वतःला मूलबाळ झाले नाही म्हणून तो दुःखीकष्टी दिसला नाही.

- Advertisement -

उलट भावाची मुले, त्याच्या तीन बहिणींची आम्ही मुले हीच त्याला आपली मुले वाटली. पाऊस, थंडी असो कायम उघडा. फक्त ढोपराच्या वर अर्धे धोतर. कोणाच्या लग्नात गेला तरच शर्ट पँट! लहानपणी या मामाच्या सहवासातील चार पाच दिवस ‘मामाचे गाव’ नाव सार्थक करणारे असायचे. भाचे आले की, त्याला एकच आनंद व्हायचा. आम्हाला घेऊन सकाळ संध्याकाळ नारळाच्या बागेत जायचा आणि शहाळी द्यायचा. हे झाले की, नदीत उडी मारून अचानक गायब व्हायचा. आम्हाला वाटायचे की, मामा बुडाला. काही वेळाने वरती आल्यावर त्याच्या धोतरात शिंपले भरलेले असायचे. पाच सहा डुबक्या मारून त्याने दिवसभर पुरून उरतील अशा शिंपल्या आणलेल्या असत. उकड्या तांदळाच्या पेजेबरोबर मामीने केलेल्या ताज्या ओल्या खोबर्‍याच्या सुक्या शिंपल्या खाणे म्हणजे स्वर्गीय आनंद असे.

ताजे मासे, सागोती वडे, आंबे, काजू अशी रेलचेल सतत असायची. मामाच्या बैलगाडीतून फिरण्याचा आनंदही झपाटून टाकणारा असायचा… मामाच्या गावाहून आमच्या घरी परतताना त्याने नारळ, तांदळाची मोठी भेट बांधलेली असायची. आताआतापर्यंत आम्ही मामाचे हे प्रेम अनुभवले आहे. देवाने जे काही आपल्याला दिले आहे त्यात आनंद मानून समाधानी राहण्याचा आणि त्यात दुसर्‍यालाही सामावून घेण्याचा गुण माझ्या तनामनात समावला आहे. आज मामा ऐंशीचे घर पार करून गेलाय, पण आजही मामाच्या गावाला जातो तेव्हा थकलेला मामा त्याच्या अर्ध्या धोतरात प्रसन्न हसत उभा राहतो तेव्हा एक निर्मळ मनाचे झाड आनंदात न्हाऊन गेल्यासारखे दिसते आणि त्याच्या अंगावर नसला तरी समोरच्या माणसावर त्याने सुखी माणसाचा सदरा घातलेला असतो…

- Advertisement -

ऐरणिच्या देवा तुला, ठिणगी ठिणगी वाहु दे
आभाळागत माया तुजी आम्हांवरी राहू दे
लेऊ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
जीनं व्होवं आबरुचं, धनी मातुर माजा देवा, वाघावानी असू दे
लक्शिमिच्या हातातली चवरी व्हावी वर खाली
इडापीडा जाइल, आली किरपा तुजी, भात्यांतल्या सुरासंगं गाऊ दे!
सुख थोडं, दुख्खं भारी, दुनिया ही भली बुरी
घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला, अंगी बळं येऊ दे!

हे गाणे आजही कानावर पडले की, माझी मावशी आणि मावशे समोर उभे राहतात. उगवे गाव सोडले की अर्ध्या एक तासात गोव्यातच मोरजी गाव लागते. आज जगाच्या पर्यटन वर्तुळात मोरजीचा समुद्र किनारा प्रसिध्द आहे. या गावात माझी मावशी आहे. ही मावशी आणि तिचा नवरा म्हणजे प्रामाणिक कष्टकरी माणसांचा एका जिता जागता अनुभव. खरेतर हे मावशे म्हणजे मोरजी गावचे मोठे भाटकर (जमीनदार). समुद्र किनार्‍याला लागून नारळाची मोठी बागायत. आजूबाजूला मोठी शेतीभाती. पण, काही वर्षांपूर्वी यातून खूप काही मिळत नव्हते. कष्ट करूनच वर्षाची बेगमी करायला लागायची. साधी माणसं सिनेमातील सूर्यकांत आणि जयश्री गडकरसारखी जणू ही जोडी होती. मावशांप्रमाणे मावशी एखाद्या पुरुषाला लाजवेल अशी कष्टाची कामे करणारी. फक्त मावशी झाडावर चढली नाही, इतकेच. बाकी पुरुषाला मागे सारेल, अशी सर्व कष्टाची कामे ती एक पाऊल पुढे जाऊन करत असे. या दोघांचा पहाटे सुरू होणारा दिवस अंधार झाल्यावरच संपायचा. पावसात भातशेती, उन्हाळ्यात कडधान्ये आणि आंब्याचा व्यापार. आधल्या दिवशी काढलेले आंबे मोठ्या टोपलीत भरून मावशी म्हापशाच्या बाजरात न्यायची. दिवसभर विकून ती थकून घरी यायची तेव्हा तिचा थकलेला चेहरा मी बघितला नाही. तिच्या हातची माशाचे कालवण (कडी) खाणे म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलवाला मागे पडेल, असा मस्त आनंदाचा ठेवा आहे.

तो कधीच विसरता येणार नाही. मावशे शहाळी सोलून हवी तेवढी खायला सांगत. मामाचे अर्धे धोतर तर मावशे कायम अर्ध्या पॅन्टीत. वर सदोदित उघडे. मावशी सतत बोलणारी, मावशे मात्र बोलायला फार कमी. मात्र सतत नाट्यगीते गुणगुणत घर आनंदाने भरून टाकत. घरची बेताची परिस्थिती असून आपल्या घरी आलेल्या माणसाच्या पदरात सुख टाकणारी अशी माणसं आता पाहायला मिळणार नाहीत. पुढे मोरजीला पर्यटनाचे चांगले दिवस आले आणि हा गाव श्रीमंतीने बहरून गेला. पण, कायम वर हात असणार्‍या मावशीने परदेशी पर्यटकांना घेऊन घेणार्‍या टुरिस्ट गाड्यांच्या चालक मालकांना कधी उपाशी पोटी सोडले नाही. त्यांना पोटभर जेवण आणि वर जाताना त्यांच्या खिशात काही पैसे ठेवण्याचा मावशीचा क्रमही कधी चुकला नाही. हीच जोडलेली माणसे पुढे मावशीचे हॉटेल हाऊसफुल्ल करून टाकत.

विशेष म्हणजे मालक असूनही दोघे कधी गल्ल्यावर बसले नाहीत. नोकरांच्या साथीने दिवसभर काम करण्यात त्यांना आनंद असायचा. उलट नोकरांना अदलून बदलून पैसे घ्यायला बसवले जायचे. आज मावशीचा मुलगा गावचा श्रीमंत हॉटेल व्यावसायिक आहे. मावशीच्या घरात श्रीमंती भरभरून वाहत आहे. आज मावशे या जगात नाहीत, पण मावशी खूप पैशाने बदलली नाही. आजही मला तिचा कष्टकरी चेहरा एका वेगळ्या तेजाने चमकलेला दिसतो तेव्हा तिच्या मुलाची श्रीमंती फिकी पडते…

आनंद हा मानण्यात असतो. तो तुमच्यातून एका निर्मळ झर्‍यासारखा वाहत राहणारा असावा लागतो. त्यासाठी गाडी घोडे, पैसा अडका, बंगले दागिनेच असायला हवेत, याची गरज नाही. सुखाची नक्की व्याख्या काय, असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा माझ्यासमोर ही साधी माणसं उभी राहतात. आपल्या सहजसुंदर जगण्यातून त्यांनी आपल्याबरोबर आजूबाजूच्या माणसांना जो काही आनंद दिलेला असतो त्याची किंमत कुठल्याच सोन्या नाण्याने होणार नाही…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -