घरफिचर्सआत्महत्येस कारण की...

आत्महत्येस कारण की…

Subscribe

बेरोजगारी, तीव्र स्पर्धा, समाजात वाढत चाललेला दुरावा, कुटुंबातील विसंवाद या कारणांचा प्रभाव व्यक्तिच्या विचारांवर होत असतो. निराशेला आमंत्रण देणाऱ्या घटना आपल्या आयुष्यात वारंवार घडत गेल्यास त्याचा एकदिवशी विस्फोट होतो. हे टाळता येऊ शकते. विद्यार्थी दशेतील आत्महत्या रोखण्यासाठी पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे टाकणे टाळावे, तरुण वयातील मुलांनी अपयश किंवा मानसिक तणाव आल्यास एकलकोंडे न राहता जवळच्या मित्रांसोबत शेअरींग करावे, “आपल्यासोबत जे घडले आहे, ते फक्त आपल्यासोबतच नाही तर इतरांसोबतही घडलेले आहे” याची जाणीव तरुणांमध्ये वाढवायला हवी. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात ना,  “या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावं” हा विचार तरुणांमध्ये रुजवायला हवा.

मराठी अभिनेता आशुतोष भाकरेने कालपरवा आत्महत्या केली आणि सर्वांना पुन्हा एकदा आत्महत्या या विषयाने घेरले. महिन्याभरापुर्वीच सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतरही हा विषय चर्चेत आला. मात्र आपल्याकडे अशा विषयांची चर्चा ही आत्महत्या केलेल्या व्यक्तिच्या कारणांपुरतीच मर्यादीत राहते. या चर्चेला व्यापक स्वरुप मिळत नाही. आत्महत्या करणारा व्यक्ति जितका मोठा असतो, तितकी अधिक चर्चा अशा प्रकरणांची होते. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चर्चा राजकीय वर्तुळात होते, काही संस्था आणि संवेदनशील नागरिक त्याबद्दल दुःख व्यक्त करतात. कर्जातून आणि व्यसनातून मध्यमवर्गाच्या आत्महत्येला फार फार तर त्याचे जवळचे लोक आठवणीत ठेवतात. तर लहान मुलांच्या आत्महत्येची बातमी टीव्हीवर पाहिल्यानंतर आपण सर्वच हळहळ व्यक्त करतो. आत्महत्येचं भुत आता सर्व वयोगट, सामाजिक आणि आर्थिक गट यामध्ये दिसून येत आहे. आशिया असो किंवा अमेरिका अशा प्रगत आणि अप्रगत,  देशांमध्येही आत्महत्या वाढत आहेत. सर्वसाधारणपणे आत्महत्या करणारा व्यक्ती आत्महत्येचे कारण काही संकेतामधून दाखवून जातो. काही सुसाईड नोट लिहितात…त्यातून त्याची वैयक्तिक कारणे समजतात. पण समाजाने आता या प्रश्नाकडे गंभीतेने पाहून “आत्महत्येस कारण की..” या विषयाचा सोक्षमोक्ष लावायला हवा.

- Advertisement -

आत्महत्या सारख्या प्रकरणात भारत किंवा जगभरातील समाजाने अधिक समजुतदारपणा दाखविण्याची गरज आहे, असे मला वाटते. सुशांत किंवा आशुतोष आणि कोरोनाच्या काळात आत्महत्या केलेल्या अनेक प्रकरणांकडे पाहिले तर त्यांच्या मानसिक अवस्थेपेक्षा त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित इतर घटनांवर जास्त चर्चा होताना दिसली. यातून त्या व्यक्तिच्या कुटुंबियांवर अधिक गहरा परिणाम होतो. आशुतोषच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ‘अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती…’ या ओळीनेच बातम्या दाखविल्या गेल्या. बातम्यांना फोटोही दोघांचा लावण्यात आला. आशुतोष सोबत मुयरीचा बायोडेटा लोकांना पॅकेज करुन दाखविण्यात आला. या अशा बातम्यांमुळे मयुरी देशमुखची मनस्थिती काय झाली असेल? ती काय विचार करत असेल? अशावेळी सोशल मीडिया किंवा माध्यमांवर काय प्रकारच्या बातम्या आणि त्या कशा पद्धतीच्या असायला हव्यात? याबाबत आपल्याकडे कोणतीही आचारसंहीता नाही. ज्याप्रमाणे युद्धाच्या किंवा निवडणुकीच्या बातम्या करताना आदर्श आचारसहिंतेचे पालन करावे लागते. त्याप्रमाणे आता आत्महत्येसंदर्भातही बातम्या देताना आचारसहिंता असण्याची गरज निर्माण झाली आहे. सुशांतसिंह प्रकरणातही माध्यमांचा भेसूर चेहरा दिसत असून त्याचे कव्हरेज अजूनही सुरु आहे.

आत्महत्येच्या कारणांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून आता अभ्यास करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे लैंगिक शिक्षण मिळावे, यासाठी लढा सुरु आहे. त्याप्रमाणे मानसिक आजारावरही महाविद्यालयीन स्तरावर सर्वांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे. एमिल दुर्खिम फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने १८९७ साली ‘The Suicide’नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. “समाजात सामाजिक एकिकरणच्या अभावामुळे आत्महत्या घडून येतात”, असे प्रतिपादन एमिल दुर्खिमने केले होते. हिंदू आणि इस्लाम धर्मात आत्महत्येला निषिद्ध मानले गेले आहे. तर आधुनिक काळात आत्महत्या हा गुन्हा मानला जातो. भारतात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तिस भारतीय दंड विधान कलम ३०९ नुसार गुन्हेगार मानले जाते. तर आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीवर कलम ३०६ नुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. ही आत्महत्येसंदर्भात काही सैद्धांतिक माहिती झाली.

- Advertisement -

जगभरात होणाऱ्या तरुणांच्या आत्महत्येमध्ये भारताचा वाटा १० टक्के इतका आहे. भारतात आत्महत्येची अनेक कारणे असली तरी त्यात शैक्षणिक परिस्थिती, बौद्धिक कुवत आणि पालकांच्या अपेक्षांमधील जीवघेणी स्पर्धा आत्महत्येला प्रामुख्याने कारणीभूत आहे. आत्महत्येच्या कारणांमध्ये शास्त्रज्ञांच्या मते अनुवांशिक, जैविक, मानसिक कारणे आहेत. तसेच अनुकरण हे ही एक मोठे कारण आहे. या कारणांचा सुटा सुटा विचार करायला हवा. आत्मकेंद्रितता म्हणजेच स्वतःचाच विचार करणाऱ्या व्यक्ति, किंवा याउलट नेहमीच दुसऱ्याचा हिताचा विचार करणाऱ्या व्यक्ति पटकन आत्महत्येच्या पर्यायाला बळी पडतात. मूल्य संघर्ष, सामाजिक एकतेच्या अभावातून या दोन गटातील व्यक्तिंमध्ये पटकन नैराश्य येते. त्याप्रमाणेच बायपोलर डिसऑर्डर (कधी कधी कमालीचे नैराश्य आणि कधी बेफिकिरीचे वर्तन अशी मनस्थिती असलेले लोक), आयुष्य निरस झाल्याची भावना असलेले लोक, वेदनामय पुर्वायुष्य जगलेले लोक किंवा स्वभावदोष असलेले लोक आत्महत्येचा पर्याय स्विकारता.

वर नमूद केलेल्या प्रकाराच्या सर्व वयोगटातील व्यक्ति या शहरात, ग्रामीण भागात, भारतात किंवा जगात कुठेही असू शकतात. त्यांच्याकडे पाहून किंवा त्यांच्या हालचालीतून ते आत्महत्या करतील असे कधी वाटत नाही. मात्र अचानक एकेदिवशी ते जीवन संपवण्याचा अप्रिय निर्णय घेतात. अशा व्यक्तिंच्या आत चाललेला संघर्ष बाहेर दिसत नाही. याच्या जोडीला बेरोजगारी, प्रेमसंबंधातील अपयश, एकाकीपणा आल्यासा भावनांचा विस्फोट होऊन काही लोक आत्महत्या करतात.

भारतात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग म्हणजेच National crime registration department (NCRB) ने २०१८ सालातील गुन्ह्यांच्या माहितीचा अहवाल काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध केला होता. दरवर्षी ही संस्था मागच्या वर्षाचा अहवाल प्रसिद्ध करत असते. या अहवालात काही धक्कादायक तथ्य समोर आली होती. हा डेटा २०१८ सालातला असला तरी २०१९ आणि २०२० मधील अहवाल नक्कीच यापेक्षा अधिक धक्कादायक असेल, अशी शक्यता आहे. एनसीआरबीच्या अहवालातील बेरोजगारांच्या वाढलेल्या आत्महत्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आधी एनसीआरबीच्या अहवालातील आत्महत्येच्या आकडेवारीवर नजर टाकू. २०१८ या वर्षात दर ४० व्या मिनिटाला एक बेरोजगार आत्महत्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१८ मध्ये एकूण एक लाख ३४ हजार ५०५ आत्महत्या झाल्या. यामध्ये १२ हजार ९३६ जणांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढी बेरोजगारांच्या आत्महत्यांची चर्चा होत नाहीये.

बेरोजगारी, तीव्र स्पर्धा, समाजात वाढत चाललेला दुरावा, कुटुंबातील विसंवाद या कारणांचा प्रभाव व्यक्तिच्या विचारांवर होत असतो. निराशेला आमंत्रण देणाऱ्या घटना आपल्या आयुष्यात वारंवार घडत गेल्यास त्याचा एकदिवशी विस्फोट होतो. हे टाळता येऊ शकते. विद्यार्थी दशेतील आत्महत्या रोखण्यासाठी पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे टाकणे टाळावे, तरुण वयातील मुलांनी अपयश किंवा मानसिक तणाव आल्यास एकलकोंडे न राहता जवळच्या मित्रांसोबत शेअरींग करावे, “आपल्यासोबत जे घडले आहे, ते फक्त आपल्यासोबतच नाही तर इतरांसोबतही घडलेले आहे” याची जाणीव तरुणांमध्ये वाढवायला हवी. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात ना,  “या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावं” हा विचार तरुणांमध्ये रुजवायला हवा.

हरी नरके यांनी लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, सततच्या लढायांनी काही लोक दमून जातात, थकून गलितगात्र होतात. परिस्थितीचं पाणी ज्यांच्या नाकातोंडात जातं त्यांना पाण्या बाहेरच्यांनी, तुम्ही लढत रहा, असे पुस्तकी सांगायला काय जातं? जगण्याची प्रेरणा ही सर्वात चिवट असते. तिच्यावरही मात करणारांकडे करुणेने पाहायला हवे.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -