घरफिचर्सजनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे !

जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे !

Subscribe

लोकांमधून तयार होणारे नेते म्हणजे जनतेचा सामूहिक आवाज असतो. जेव्हा नेतृत्व जनतेच्या ऐवजी माध्यमं ठरवू लागली तेव्हा मोठी गडबड झाली आणि नेते लोकांच्या नव्हे तर स्वतःच्या मनस्वी बाता सांगू लागले. पब्लिसिटी स्टंट ही काही नेतृत्व निर्मितीची योग्य प्रक्रिया नव्हे आणि निव्वळ ‘भाषण हेच शासन’ हा काही गुड गव्हर्नन्सचा भाग नव्हे.

संध्याकाळ झाली. घरी जायला निघालो आणि मुसळधार पावसानं वाट अडवली. रौद्र वगैरे शब्द वापरता येईल असा घनघोर पाऊस. वाढदिवस असल्यामुळे सारखे फोन येत होते. मी काही ऐकायच्या आतच ‘थॅन्क्स, धन्यवाद’ अशा सुरावटीत बोलत होतो. त्यातच पाऊस आला. या पावसापासून बचाव करायचा म्हणून एका हॉटेलात शिरलो. माझ्या मोबाइलची काही वेळासाठी रेंज गेली. लगेच अस्वस्थ झालो मी. कुणी फोन करत असेल मला तर मी ‘आउट ऑफ रेंज’ आहे, असं वाटेल समोरच्याला. संपर्क तुटला आपला. अवघ्या ७५ सेकंदांसाठी संपर्क तुटला तर अस्वस्थ झालो मी. ७५ दिवस हा काय काळ असेल ! असो.

पाऊस सुरू झाल्यामुळे हॉटेलात लोक दाटीवाटी करुन उभे होते. प्रत्येकजण कुठून निघाला आणि पाऊस कसा आडवा आला याच्या गोष्टी सांगत होता. ऐन ऑक्टोबरात सुद्धा हा असा भयप्रद पाऊस म्हणजे ऋतूचक्र पालटल्याचा पुरावाच होता. मी शेजारच्या अनोळखी इसमाला म्हणालो, ‘काय विचित्र वातावरण आहे ! भयंकर आहे सारं. कशाचा कशाला मेळ नाही.’ त्यावर तो म्हणाला, ‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचीच सत्ता आहे, तरी सावळा गोंधळ आहे.’ मी म्हटलं, ‘अहो मी हवामानाविषयी बोलत होतो. पाऊस अवेळी येतोय, अशा अर्थाने.’ सार्वजनिक ठिकाणी चुकून आपण काही बोलायचो आणि झुंड अंगावर यायची ही माझ्या मनात भीती. आणि तसं काही झालंच तर प्रभू श्रीराम आपल्या मदतीला येईल की भारतमाता आपल्या पाठीशी उभी राहील की ‘भाग मिल्खा भाग’ करत मॅरेथॉन करावं लागेल असे विचार सुरु होते, पण सुदैवाने गृहस्थ म्हणाले, ‘ हो ना. साडेपाचपर्यंत लख्ख ऊन होतं. क्षणात वातावरण फिरलं.’ मी म्हटलं, ‘वातावरण तर फिरलंय, पण शेवटी यंत्रणा त्यांच्या हातात आहे.’ तो म्हणाला, ‘आता तुम्ही राजकारणाविषयी बोलताय.’ आम्ही दोघे हसत हसत बाहेर पडलो. पाऊस थांबला होता, पण वातावरण बदललं असल्याची चाहूल सर्वांनाच लागली होती.

- Advertisement -

भौगोलिक हवामान असो की राजकीय वातावरण, सारं बदलायला फार काही वेळ लागत नाही. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ म्हणेस्तोवर आसमंत भिजून जातो. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘वातावरण फिरलं’ असल्याचं बोललं जात आहे. एकतर्फी सामना असल्याच्या वल्गना एका बाजूला होत असताना वारं हळूहळू फिरलं असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ‘समोर कुणी पैलवानच नाही’ म्हणत शड्डू ठोकणार्‍या भल्याभल्यांना कुस्तीच्या आखाड्याच्या सीमारेषा माहिती नसतात. कुस्ती सुरू असताना प्रेक्षक मूक नसतात, याचीही त्यांना कल्पना नसते. दोन रंगीत नोटांमध्ये आपण जनतेचं सारं इमान खिशात घालून ‘सुजय’ प्राप्त करू, अशी त्यांची धारणा असते. म्हणूनच कुणी शेतक-यांना ‘साले’ म्हणून संबोधतं तर कुणी रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांचाच अपमान करतं. थोडक्यात, जनतेला गृहीत धरण्याची चूक पुन्हा पुन्हा अनेकांकडून होते. एवढंच कशाला अगदी हवामानाचा अंदाज घेताच काही मतलबी वार्‍यांनी आपली दिशा बदलली आणि होकायंत्र मूळ मुद्यांपासून भरकटू लागलं. आपली मतलबी वार्‍याची दिशा तीच जनतेची दिशा, असं मानून नेते बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतात, पण ये पब्लिक है, ये सबकुछ जानती है !

जनतेचा आवाज दाबण्याचे प्रयत्न अनेकदा झाले आहेत. प्रत्येक वेळी ‘जनता की बात’ सत्तेच्या उच्च सिंहासनापर्यंत पोहोचत नाही, पण म्हणून जनता गप्प असते असं नाही. बॅस्टिलच्या तुरुंगावर हल्ला करण्यापासून ते एकाधिकारशहा झार याला हटवणार्‍या ऑक्टोबर क्रांतीपर्यंत जनता आपला आवाज उमटवत असते. फिडेल कॅस्ट्रो असो किंवा नेल्सन मंडेला, महात्मा गांधी असोत की मार्टिन ल्युथर किंग, जनता असे बुलंद आवाज निर्माण करते. लोकांमधून तयार होणारे हे नेते म्हणजे जनतेचा सामूहिक आवाज असतो. जेव्हा नेतृत्व जनतेच्या ऐवजी माध्यमं ठरवू लागली तेव्हा मोठी गडबड झाली आणि नेते लोकांची नव्हे तर स्वतःच्या मनस्वी बाता सांगू लागले. पब्लिसिटी स्टंट ही काही नेतृत्व निर्मितीची योग्य प्रक्रिया नव्हे आणि निव्वळ ‘भाषण हेच शासन’ हा काही गुड गव्हर्नन्सचा भाग नव्हे.

- Advertisement -

लोकशाहीच्या प्रक्रियेतून लोकांनाच हद्दपार केलं जात असेल आणि तरीही लोक मुकाट मेंढरासारखे आपल्या मागे येतील, हा फाजील आत्मविश्वास अहंकारातूनच जन्माला येतो. अशा अहंकाराला जनता आपल्या खास शैलीत उत्तर देते. ‘इंदिरा इज इंडिया’ म्हणत इंदिरा गांधींना डोक्यावर घेणार्‍या याच जनतेने त्यांनी आणीबाणी लादताच त्यांना पराभूतही केलं आणि ज्यांना निवडून दिलं त्यांचा सावळागोंधळ पाहून इंदिराबाईंना पुन्हा भरघोस मतांनी निवडूनही दिलं होतं. त्यामुळे जनतेपाशी एक सामूहिक शहाणपण असतं. या शहाणपणाच्या संचिताची भीतीच हुकूमशहांना वाटते आणि म्हणूनच लोकशाहीचे अपहरण करून आपली सत्ता टिकवण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करतात. काही काळ असे प्रयत्न यशस्वी होतातही, पण अंतिमतः जनता सार्वभौम असते. काळाच्या पटलावर बदल घडवणार्‍या काही व्यक्तींची नोंद होत; पण त्या भव्यदिव्य बदलांमागे लाखो सर्वसामान्यांनी आपला खारीचा वाटा उचललेला असतो. भारताचा स्वातंत्र्य संग्राम हे त्याचंच तर उदाहरण आहे.

इथे कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. त्यामुळे अनाठायी ‘शहा’जोगपणा करणा-यांना वठणीवर आणण्याचं सामर्थ्य जनतेत असतं. मात्र त्यासाठी उपलब्ध लोकशाही साधनांचा नीट उपयोग करावा लागतो. आपल्याकडे असलेलं मतदानाचं साधन मौलिक आहे, हे लक्षात घ्यायला लागतं. राम मनोहर लोहिया म्हणत, ‘जिंदा कौमे पांच साल का इंतजार नहीं करती’ अर्थात जिवंत माणसं स्वतः विचार करतात आणि सरकार बदलवण्यासाठी पाच वर्षांची वाट बघत नाहीत. मूलभूत बदलाचा ते भाग होतात. विंदा करंदीकर यांनी ‘ती जनता अमर आहे’ या कवितेत म्हटलं आहे-

जनतेच्या पोटामध्ये आग आहे, आग आहे
जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे
जनतेच्या ऐक्यामध्ये लाव्हाची लाट आहे
जनतेच्या पायांपुढे प्रकाशाची वाट आहे !

हा जनतेच्या डोळ्यातील शंकराचा राग लोकशाही प्रक्रियेत नीट उमटायला हवा.

-श्रीरंजन आवटे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -