घरफिचर्सविश्रब्ध मनाच्या कातरवेळी...

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी…

Subscribe

कवी आरती प्रभू यांनी विश्रब्ध मनाच्या कातरवेळीत प्राणांना किती उंचीवर नेऊन ठेवले आहे. आज ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे जगात नाही, पण ते निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा ठरतात. तर, पत्रकार अतुल आंबेरकर या जगातून अचानक निघून जातो तेव्हा एखाद्या सरणा अहेवपण होऊन जातो... अशा कातरवेळी मनाचा खोल डोह होतो त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष आंब्रे स्वतःला समाजासाठी झोकून देताना मी पाहतो तेव्हा : एखाद्या प्राणाचे सनईसुर, एखाद्या मनाचे कोवळे उन्ह होऊन जातात आणि मग मन मल्हारधून होऊन जाते...

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी
एखाद्या प्राणाची जीवेलागण

सरत्या नभाची सूर्यास्तछाया
एखाद्या प्राणात बुडून सूर्य

- Advertisement -

एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल
विलग पंखांचे मिटत मन

एखाद्या प्राणाचे विजनपण
एखाद्या फुलांचे फेडीत ऋण

- Advertisement -

गीतात न्हालेल्या निर्मळ ओठा
प्राजक्त चुंबन एखादा प्राण

तुडुंब जन्मांचे साचलेपण
एखाद्या प्राणाची मल्हारधून

एखाद्या प्राणाचे सनईसूर
एखाद्या मनाचे कोवळे ऊन

निर्जन प्राणात व्रतस्थ दिवा
एखाद्या सरण अहेवपण

कवी आरती प्रभू यांची ही कविता म्हणजे माझ्या मनात गेले आठवडाभर दाटून आलेल्या कातरवेळीच्या काळ्या ढगांची काळी दाट छाया आहे. ती कोसळतेय, पावसासारखी… पण, कोसळूनही जात नाही, मन पुन्हा दाटून येतंय… नको नको म्हणताना धिंगाणा घालतं. करोनाच्या या काळात किती जवळची माणसे गेली…मन निराश झालं! जवळच्यांचीही जवळची माणसे जाताना त्यांच्या काळजात दाटून आलेल्या दुःखानं मन कातर होऊन गेलं. पत्रकारांचे आदर्श दिनू रणदिवे यांचं निधन झालं आणि आमचा पत्रकार मित्र अतुल आंबेरकरही गेला. सोमवारी रात्री अतुल गेला तेव्हा तो ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पहिल्या पानाचे काम करत होता. रात्री उशिरा काम करता करता गेला. तेथेच कोसळला. मंगळवारी सकाळी दिनू रणदिवे गेले. शांतपणे… निर्जन प्राणात व्रतस्थ दिवा !

दिनू यांना मंगळवारीच दुपारी अग्नी दिला. अतुलला रात्री विद्युतदाहिनीने आपल्या पोटात घेतले… त्याचे शेवटचे दर्शन होऊ शकले नाही. त्याचा भाऊ सुशील आंबेरकर म्हणाला होता- कोणी येऊ नका. सकाळी कळलं की त्याच्या छातीत दुखत होते. आणखी काही दुखणी होती. पण, पत्रकार कायम लोकांची काळजी करतात, स्वतःचं दुःख ते आपल्या काळजात घालून ठेवतात. स्वतःला चिरत चिरत… अतुलला बाकीची दुखणी असतीलही, पण त्याला करोनाने गाठले होते, हे त्याला आणि घरच्यांना समजले नाही. काळ दबा धरून बसला होता. त्याची चाचणी झाली तेव्हा तो करोनाबाधित होता. त्याला बघायला जीव कासावीस झाला होता. पण, त्याचे शेवटचे दर्शनही झाले नाही… ना दिवा, ना पणती! कोणाला डोळ्यातून पाणी काढायची त्यानं संधी दिली नाही. पण, आठवणींनी जीव कासावीस केला… त्याचे 48 वय हे जायचे नव्हते. पण, त्याने लौकर एक्झिट घेतली… घाई झाली होती त्याला अज्ञात जगी निघून जायची. फार बोलायचा नाही. गाड्या आणि गाण्यांवर प्रेम. मायकल जॅक्सनवर तर जीव ओवाळून टाकायचा. मायकल मुंबईत आला तेव्हा अतुलने कडक कॉप्या लिहिल्या… त्याचा देव आला होता म्हणून. ‘सामना’त कडक कॉप्याचं वजन असतं. सर्वोत्तम कामामुळं त्याला ‘मटा’त संधी मिळाली.

बातमी करताना, त्यावर संस्कार करताना, एकाच एका बातमीत अतुल खूप गुंतून पडायचा. मग इथल्या या जिव्हाळ्याच्या गुंत्यातून इतका लवकर निघून का गेलास?
निर्जन प्राणात व्रतस्थ दिवा
एखाद्या सरण अहेवपण…
रणदिवे यांचे दादरला त्यांच्या घरी अखेरचं दर्शन घेताना ते शांत निजले होते, असा मला भास झाला. अख्खं आयुष्य व्रतस्थासारखं जगताना आम्हाला सर्व पत्रकारांना तसं जगायला त्यांनी सांगितलं. ‘निर्जन प्राणात व्रतस्थ दिवा…’ आणि अतुल ‘एखाद्या सरण अहेवपण’.

रणदिवे यांचे शेवटचे दर्शन घ्यायला मोजून दहा पंधरा माणसे. त्यात आमदार कपिल पाटील, रणदिवे यांची शेवटपर्यंत आपल्या घरातल्या मोठ्या माणसांसारखी काळजी घेणारे पत्रकार हारिस शेख आणि दीपा कदम, रणदिवे यांचे काही मोजके नातेवाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्कर सावंत, ज्येष्ठ पत्रकार शरद कद्रेकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणखी एक दोन. दिनू यांनी 95 वर्षांपर्यंत किती माणसे जोडली? लाखांनी. सामान्य माणसांचा ते दिवा झाले. त्यांनी दाखवलेल्या प्रकाशात श्रमिक, शोषित, कामगार यांचे आयुष्य उजळून निघाले. न्याय हक्कासाठी झगडणार्‍या शेकडो तरुणांना शासकीय नोकर्‍या मिळाल्या.

आंदोलनांचा ते हुंकार झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी प्राण फुंकले. माजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई त्यांना घाबरले होते. आचार्य अत्रे, एस.एम.जोशी यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात घालताना मोरारजी यांनी दिनू यांनाही तुरुंगात घातलं. ‘आता उठवू सारे रान’ करत त्यांनी महाराष्ट्र पेटवून मोरारजींच्या नाकात दम आणला होता. पाच फूट उंचीचा हा माणूस अख्खी यंत्रणा हलवून सोडायचा त्यावेळी त्यांच्या लेखणीची ताकद कळायची. आज आपण ‘जय जय महाराष्ट्र माझा’, असं म्हणतो तेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी बलिदान करणार्‍या 10५ हुताम्यांसह दिनू डोळ्यासमोर येतात. काय या माणसाची ताकद असेल हा विचार करत. पण, रंगात रंगुनी सार्‍या रंग माझा वेगळा… कुठले मोठेपण नाही, मीपणा नाही. साधी राहणी, उच्च विचारसरणी. आपण खूप काही करतोय, असं कधी न सांगता तरुणांनी काही ठोस केले पाहिजे, पत्रकारांनी वरवरच्या बातम्या न देता शोध पत्रकारिता केली पाहिजे, आपल्या पत्रकार धर्माशी जागलं पाहिजे, हा कायम अट्टाहास. दादर रेल्वे स्टेशनच्या समोर पणशीकर मिठाईवाला दुकानाच्या वर दुसर्‍या मजल्यावर त्यांचे दोन खणी घर म्हणजे दैनिक संग्रहालय म्हणजे पेपरच्या राशी असलेलं घर. भेटायला येणार्‍यांनी या राशीमधून त्यांना शोधायचे, धूळ खात. आपण लगेच नाकावर रुमाल घेणार… हा माणूस त्याच पेपरच्या राशीमधून संदर्भ शोधायचा तेव्हा प्रशासन उभे राहायचे आणि राजकारणी चळाचळा कापायचे…

‘आपलं महानगर’च्या सुरुवातीपासूनच्या काळात ते लिहिते होते. कसलीच अपेक्षा नाही. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून 1985 मध्ये निवृत्त झाल्यावरही त्यांची लेखणी लिहिती राहिली. हर्षद मेहताच्या शेअर्स घोटाळा प्रकरणाची बातमी प्रथम महानगरला होती. पण, छोटे दैनिक असल्याने त्याने खूप मोठी खळबळ उडाली नाही. पण, तीन दिवसांनी सुचेता दलालने ‘टाइम्स ऑफ इंडिया’त दिलेल्या याच बातमीने देश हादरला. साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्या रेल्वे संपात दिनू यांची लेखणी वार्‍याच्या वेगाने धावली. इंदिरा गांधी यांच्या राजवटीला धक्के देत. जॉर्ज यांनी रेल्वे संप यशस्वी केला, त्याला दिनू यांची मोठी साथ मिळाली. बातमी हाच श्वास. तेच जगणे. पण, निस्वार्थीपणे. अरुण साधू यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक कादंबर्‍यांवरून बेतलेला ‘सिंहासन’ सिनेमा तुम्ही बघितलाय. पाहिला नसेल तर अजूनही बघा… दिगू टिपणीस ही निळू फुले यांनी साकारलेली भूमिका दिनू रणदिवे यांच्यावरून बेतलीय. झब्बा लेंगा, काखेत शबनम आणि चष्म्यातून समोरच्याचा वेध घेत चालणारे निळू फुले बघितले की सर्व नेते, प्रशासन टरकून असायचे… तेच दिनू होते. दिनू यांच्या पत्नी सविता या त्यांच्यासोबत भक्कमपणे उभ्या राहिल्या. दोघांची घट्ट सोबत होती. त्यांचे निधन 16 मे रोजी झाले. दिनू बरोबर 1 महिन्यांनी गेले. 16 जूनला…आपली पत्नी आता सोबत नाही हे दुःख त्यांना सहन झाले नाही. हळूहळू अन्न पाणी कमी होत गेले. पण, जाताना कुठला त्रास नाही. काही नाही. मोठे जीवन जगून ते शांतपणे हे जग सोडून गेले. मुख्य म्हणजे करोनाला त्यांच्या आसपास फिरायची हिंमत झाली नाही. निर्जन प्राणात व्रतस्थ दिवा…

…आणि करोनाच्या काळात एक दिवा मला पेटलेला दिसला. दादरला एक पूर्ण कुटुंब करोनाबाधित झाले आणि त्यातले वडील गेले. पण, मुलगा पार्थिवाला हात लावायला तयार नव्हता. शेवटी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. नाती संपली, माणुसकी माहिमच्या खाडीत वाहून गेली. पण, दहिसरला मिठी नदीच्या बाजूला ती वाहत आहे. व्हीपीएम स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष आंब्रे यांनी त्यांच्या मित्राची तरुण पत्नी करोनाने गेल्यावर महापालिकेच्या हातात त्यांनी पार्थिव जाऊ दिले नाही.

मित्राबरोबर स्वतः उभे राहून अंत्यसंस्कार केले. ते केल्यानंतर स्वतःला कोंडून घेऊन आपण करोनाबाधित नाही ना याची काळजी घेऊन ते आता बाहेर येऊन राष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे आपले लक्ष्य साकारत आहेत. तसेच निसर्ग वादळग्रस्तांना जमेल तेवढी मदत करतायत. श्रीवर्धन परिसरात ज्या ग्रामस्थांच्या घरांचे पत्रे उडाले, कौले फुटली, नारळी सुपारीच्या बागा उद्धवस्त झाल्या त्यांना मदतीचा हात देण्यासाठी धडपड करत आहेत.

नाही तरी आरती प्रभू असंही म्हणतातच…
एखाद्या प्राणाचे सनईसूर, एखाद्या मनाचे कोवळे ऊन

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -