विचार, आचार आणि आहार

माणूस हा इतर प्राण्यापैकी सभ्य प्राणी मानला जातो. त्याने आपल्या बुद्धीमत्त्वाच्या जोरावर इतर प्राण्यांवर वर्चस्व निर्माण केले असले तरी त्यालाही मर्यादा आहेत. मात्र, जेव्हा तो आपल्या मर्यादा लांघतो किंवा मर्यादांची चिंता करत नाही तेव्हा करोनासारख्या महाभयंकर महामारीला आमंत्रण देत असतो. त्याची सभ्यता आणि आचार, विचार आणि आहार हेच माणसाला इतर प्राणांपेक्षा श्रेष्ठ आणि वरिष्ठ ठरवत असतात. मात्र, आचार, विचार आणि आहारात गडबड झाली की माणूसही एक जनावरच होते. असे जनावर जे दुसर्‍या माणसाच्या जीवावर उलटते.

Mumbai

दशकांंहून करोना विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला असताना संपूर्ण जगाला भयभीत केले आहे. या करोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहेत. जगभरातील सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ करोना विषाणूवर तोडगा काढण्यासाठी झटत असताना त्यांना अद्याप त्यावर तोडगा मिळालेला नाही. करोना मात्र आपली मिठी अधिक घट्ट करत निघाला आहे. आजपर्यंत त्याने चीनमध्ये १७०० लोकांचे बळी घेतले असून जागतिक महामारीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. पूर्वी राज्यात प्लेग, देवीची साथ यायची. तेव्हा संपूर्ण गावेच्या गावे खाली व्हायची. प्लेग, देवी झालेल्या रुग्णाला लोक वस्तीपासून अलिप्त ठेवले जायचे. इंग्रजांच्या काळात ज्यांना प्लेग, देवीची साथ अनुभवली अशा व्यक्ती आता सापडणे विरळच. मात्र, करोनामुळे जी परिस्थिती चीनमध्ये निर्माण झाली आहे ती पाहिली तर प्लेग, देवीच्या साथीत राज्यातील जनतेने काय हाल अनुभवले असतील याची कल्पना नक्कीच येऊ शकते. चीनमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वात अगोदर झाला. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आहे. हुकूमशाही पद्धतीने चीनचा राज्यकारभार चालतो. त्यामुळे तेथे होणार्‍या घटना, अपघात या सरकारी संमतीशिवाय बाहेर येत नाहीत.

करोनाचा उपद्रव सुरू झाल्यानंतर तो बाहेर येण्यास साधारणत: सहा महिन्यांचा कालावधी लागला असे म्हटले जाते. ज्या शास्त्रज्ञाने करोना विषाणूबद्दल जगाला सर्व प्रथम सांगितले तो डॉक्टरही संशयास्पदरित्या करोना विषाणूंच्या प्रादुर्भावाने मृत्युमुखी पडला आहे. चीनमध्ये करोना आटोक्यात येत नसल्यामुळे आता चिनी सरकारने अघोरी उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. वुहान प्रांतात जेथे करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे तेथे चिनी सरकारने नागरिकांना अक्षरश: घरांमध्ये कोंडून ठेवले आहे. कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच ज्यांच्यात करोना विषाणूची लक्षणे आढळतात त्यांना तातडीने वेगळे काढून त्यांच्यावर सरकारी इस्पितळांमध्ये इलाज केले जात आहेत. साधारणत: दुसर्‍या महायुद्धानंतर अशा महामारीची जगभरातील ही पहिलीच घटना असावी.

चीनने करोनाच्या विषाणूग्रस्तांच्या इलाजासाठी अवघ्या दहा दिवसांत एक संपूर्ण हॉस्पिटल बांधले ही देखील आश्चर्यकारक घटना आहे. हुकूमशाहीमध्ये अनेक गोष्टी वाईट असल्यातरी काही चांगल्याही असतात. जर चीनमध्ये हुकूमशाही नसती तर कदाचित त्यांना १० दिवसांत संपूर्ण हॉस्पिटल बांधणे शक्यही झाले नसते. कायदा आणि नियमांच्या जंजाळात अडकून करोनाचे मृत्यू अजून काही हजारांच्या वर गेले असते. त्याचबरोबर सक्तीने उपाययोजना करण्यात येत असल्यामुळे काही प्रमाणात करोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालणेही चीनला शक्य झाले आहे. करोना विषाणू नेमका कुठून आला हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात राहिले आहे. करोना या विषाणूंची प्रयोगशाळेत बायलॉजिकल व्हेपन म्हणून निर्मिती करण्यात आली, असे सांगितले जाते. हा विषाणू प्रयोगशाळेत असलेल्या वटवाघुळांना टोचण्यात आला. त्यापैकी एका वटवाघळाने शास्त्रज्ञाचा चावा घेतल्यावर त्या वटवाघळाच्या लाळेतून तो शास्त्रज्ञाच्या रक्तात गेला आणि अशाप्रकारे चीनमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचे वृत्त अमेरिकेच्या एका मासिकाने दिले आहे. त्या वृत्ताचा खरेपणा सिद्ध झालेला नसला तरी अशाप्रकारे चीन बायलॉजिकल व्हेपन निर्मितीत गुंतलेला असेल तर ते जगाच्यादृष्टीने धोकादायक आहे. तसेच अशा शस्त्रांची दाहक किती मोठी असेल याचीही कल्पना येते. त्यामुळे अशा बायलॉजिक शस्त्रांच्याविरोधात जागतिक स्तरावर एक मोहीम छेडली जाणे आवश्यक झाले आहे.

करोना हा विषाणू माणसाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारा ठरत आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जागतिक स्तरावर जनजागृतीही आवश्यक आहे. कोणताही विषाणू अथवा जीवाणू जो डोळ्याने दिसतही माणसाच्या अस्तित्वावरच उलटतो तेव्हा तो केवळ स्वत:ची घातकताच नव्हेतर माणसातील राक्षसालाही उजेडात आणत असतो. करोनाने ते सिद्ध केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून चीनमधील खाद्यसंस्कृतीचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अगदी कुत्र्यामांजरापासून ते किड्या मुंगीपर्यंत काहीही खाण्यास वर्ज्य नसलेली चिनी संस्कृती पाहिली तर किळस येतो. माणूस हा इतर प्राण्यापैकी सभ्य प्राणी मानला जातो. त्याने आपल्या बुद्धीमत्त्वाच्या जोरावर इतर प्राण्यांवर वर्चस्व निर्माण केले असले तरी त्यालाही मर्यादा आहेत. मात्र, जेव्हा तो आपल्या मर्यादा लांघतो किंवा मर्यादांची चिंता करत नाही तेव्हा करोनासारख्या महाभयंकर महामारीला आमंत्रण देत असतो. त्याची सभ्यता आणि आचार, विचार आणि आहार हेच माणसाला इतर प्राणांपेक्षा श्रेष्ठ आणि वरिष्ठ ठरवत असतात. मात्र, आचार, विचार आणि आहारात गडबड झाली की माणूसही एक जनावरच होते. असे जनावर जे दुसर्‍या माणसाच्या जीवावर उलटते. करोनाग्रस्त चीन आज असाच संपूर्ण जगाच्या जीवावर उलटू पहात आहे. करोनामुळे चीनमधील व्यापाराला फटका बसला आहे. त्यामुळे चीनमध्ये निर्यात होणारा आणि चीनकडून आयात केला जाणारा माल ठप्प झाला आहे. त्याचे परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. व्यापार उदीम कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतकेच नव्हेतर चीनमधून इतर देशांमध्ये गेलेले करोनाग्रस्त रुग्ण आपल्यासोबत करोना विषाणूही त्या-त्या देशात घेऊन गेले आहेत. चीनची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर असताना त्याचे परिणामही संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर अफवांचा बाजारही तेजीत आला आहे.

सोशल मीडियाने जरी जग जवळ आणले असले तरी अफवांनाही चार पाय फुटण्यास याच सोशल मीडियाने मदत केलेली आहे. करोनाचा विषाणू हा कोंबड्या, माशांमुळे पसरतो अशी अफवा देशात पसरली. त्यामुळे अगोदरच प्राणघातक करोनामुळे भयभीत झालेले भारतवासी अधिकच घाबरले आहेत. आपला देशात कोणत्याही अफवांवर लगेचच विश्वास ठेवला जातो. पुरेशा आणि योग्य शिक्षणा अभावी सर्वसामान्य या अफवांना बळी पडत असतात. करोनाही त्याला अपवाद नाही. कोंबड्या आणि माशांमुळे करोना पसरतो अशा अफवा सोशल मीडियावरून व्हायरल होताच देशातील कोंबड्या आणि मासे खाणे बंद केले. त्याचा फटका पोल्ट्री फार्मचा जोड धंदा करणार्‍या शेतकर्‍यांना बसला आहे. त्यांचा व्यवसाय निम्म्याहून कमी झाला आहे. मासे विक्रेत्यांचीही तीच स्थिती आहे. भारतीय शिजवण्याची पद्धत पाहिली तर कोणताही विषाणू मांसजन्य पदार्थांमध्ये टिकूच शकत नाही.

भारतीय खाद्यसंस्कृतीत कोंबडी अथवा मासे हे विविध मसाले लावून शंभर अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाला शिजवून खाल्ले जातात. त्यामुळे इतक्या मोठ्या तापमानात विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे भारतीय पद्धतीने मांसजन्य पदार्थ शिजवून खाल्ले तर त्यात कोणताही धोका नाही. मात्र, मांसजन्य पदार्थ अर्धे कच्चे खाल्ले तर विषाणूंचा संसर्ग होणे शक्य आहे. भारतात सध्यातरी करोना विषाणू आढळलेला नाही. जे काही रुग्ण आढळले ते चीनमधून भारतात आलेले आहेत. त्यामुळे करोनाबाबत कोणत्याही अफवांना बळी न पडणे, पण त्याचबरोबर आवश्यक ती काळजी घेणे हीच सुरक्षा आहे.