घरफिचर्सटू डू ऑर नॉट टू डू इस द क्वेश्चन

टू डू ऑर नॉट टू डू इस द क्वेश्चन

Subscribe

भरल्या लोकलमधी घुसावं का? दुसर्‍या लोकलची वाट बघावं? इतका विचार करायचा नसतोयच आल्या लोकलमधी आपण मेंढामुसंडी करायची घुसलो तर बेष्ट, नाही घुसलो तर दुसरी लोकल ...दोस्तहो मुंबईत जास्त विचार करायचा नसतोय, विचार स्लो करतोय माणसाला’ आज दाराला लटकलेल्या आपला डायलॉग संपला तशी लोकल दहिसर बोरिवलीमधी थांबली ना भावा.

लगेच चवथ्या सीटवर आपली शीट ऍडजस्ट करलालेला जगताप म्हनला… जरा गप्प बसत जा गा! तुझं ऐकिली अन बघ आता ही लोकल इचारवंत झाली…थांबली बघ कवापासून’ टोट्टल पब्लिक हसली…बरं झालं, त्यामुळं मनाला तर बरं वाटलं तसं अंधेरी येजेस्तोर तनाला बरं वाटायचा झिरो चान्स. हसनं झालं अन थांबल्या जागी पुना पेचापेची सुरु झाली.

फॅन बंद झालता आतली चड्डी बी घामानं वल्ली झालती तरी लोकलमधी शिरलेला विचारवंत आज बाहिर यायचं नाव घेत नव्हता. पब्लिकची नुसती तगमग सुरु होती. अन बाकीच्या हजार डोक्याप्रमानं माज्या डोक्यात सुद्धा विचार युलालते की आपण जरी रोजच्या रोज लोकलमधी मेंढरं भरल्यावनी भरले जाताव, पर भाऊ आपण मेंढरं नसताव ना माणसं असताव. अन माणूस म्हनला की डोक्याला खार निस्ता विचार विचार विचार. सेपियन लोकांची खासियत ना ती… लोकल वाढवायला पाहिजेत, नवीन ट्रॅक टाकायला पाहिजेत, बाराचे पंधरा डब्बे करायला पाहिजेत पसून सुरू झालेले विचार आता या शहराचे काही खरं नाही, बाहेरची वाढती पब्लिक, तिचा बोजा, भैये भाई अतिक्रमण, मूलभूत सुविधा, या शहराचं काही खरं नाही बा! आशा पैलेच हजार वेळेला गेलेल्या ट्रॅकनंच आजचे विचार बी चालले होते.

- Advertisement -

तेवढ्यात कूट तर कचरा जाळल्याचा धूर दिसला. धुरानं नुसतं जीव आरे आरे केला आता आपल्या तर आपल्या आख्या मुंबईच्या फुफुसाची वाट लावली. मग विचार आला आरे! इथले वाढलेले शेकडो झाडं जाळणार मग कुठं तर लाख लावणार, पर इथं जगले तशे ते तिथे लावलेले नवे जगतील का? का? का? अन मंग इथल्या फुफुसाचं काय होणार? प्रश्न बाका होता उत्तर…

आपल्यासारख्या कोंबलेल्या मेंढरायला पडणारे प्रश्न त्येनीच सोडवायचे. डोक्याला उत्तर मिळालं तर कायमचा ताप नाही मिळालं तर तेवढ्यापुरता ताप. आज मिसरा पुन्हा पुन्हा जंगल जाळीचा व्हिडीओ दाखवू दाखवू म्हनला ’ये सही नाही हुआ’ कसल्याही आपत्कालीन परिस्थितीतसुद्धा सही है म्हननारा आमचा दोस्त असं म्हनला तवा कान उगंच टवकारले तर थांबल्याजागी मोबाईलवर आलेला वायरल बघत दाखवत त्येच्याबी तोंडात तोच विषय जो माझ्या मनात होता तोच तो जंगल झाडं जाळीचा.

- Advertisement -

प्रत्यक्ष जिथं झाडं जळले-जाळले तिथं जाळ झाला अन तो थंड बी झाला. पर त्याची धग आम्ही मोबाईलमधी आलेल्या विडिओ मधी आणि बी बार बार बगून अनुभऊलालतो. आम्हाला आता खडे खडे आमच्या फुफुसात त्या जळत्या जंगलाचा धूर जमा झाल्यावनी वाटलालता. गाडी आणि बी थांबलीच होती… विचारानंच डोक्याचा भुगा हुलालता मग बदल म्हणून थांबल्या जागी येते विचार बदलवायला म्हणून विचार म्हणजे नेमकं काय? विचाराची नेमकी व्याख्या काय हेच मोबाईलचा फ्री डेटा वापरून चेक केलतं तर विकीपिडीया सांगतीलता. चर’ म्हणजे चालणे, विचर म्हणजे विशिष्ट तर्हेने चालणे. ‘चर’ चे ‘चार’ हे प्रयोजक रूप आहे. चार म्हणजे चालविणे. बुद्धीला किंवा मनाला काही नियमांनुसार ‘चालविणे’ म्हणजे विचार करणे.

बुद्धीला किंवा मनाला नियमानुसार चालविणे म्हणजे विचार. मग विचार आला कोण्या विचाराने आपण जे काय थोडं बहुत हिरवं उरलंय जे आपल्या जगण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं हाय त्येला संपवूलालाव? कोणत्या विचारानं आपण असलेल्या पाण्यावर भराव टाकुलालाव? कोणत्या विचारानं आपण तीवरायची वाट लावूलावावं? कोणत्या विचारानं आपण आरेच्या जंगलानं घुसूलालाव? कोण्या विचाराने आपण अवनीला मारूलालाव? कोण्या विचाराने आपण असत्या निसर्गाला नसत्यात जमा करण्याचा इरादा केलाव?

मायच्यान डोक्यात नुसती एक साथ येनार्‍या ईचाराची गिरण सुरू होती.अन ईचार ईचारात घुसून पिसुन ईचाराच्या पिठानं माज्या डोळ्यासमोर जळत्या लोबानवनी धूसर पडदा केलता. मी डोळे फाडून त्येच्यातून काही दिसतंय का बघलालतो तर समोर दिसलालती आख्या लोकलच्या डब्यावर दातव्हट खात येणारी खुंखार बिबळ्यायची फौज…फुल्ल थ्रीडी बिबळे छलांग मारून आमच्यावर झपटीलताच एवढ्यात विचाराच्या गुथ्यातून लोकल भाईर आली अन आजच्यापुरतं आमी सुटलो…पुढचं …माहितनी.

प्रसाद कुमठेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -