घरफिचर्सपारंपरिक सण-उत्सव आणि तरुण

पारंपरिक सण-उत्सव आणि तरुण

Subscribe

माझ्या त्या मित्राच्या प्रती आदर खूपच वाढला. त्याच्या या कृतीचे विश्लेषण जेव्हा त्यानेच मांडले तेव्हा लक्षात आले की, शाळकरी वयाच्या मुलांमध्ये प्रचंड ताकद, उत्सुकता आणि कृतीशीलता असते. ती ताकद योग्य तर्‍हेने वापरली गेली नाही की घरात तोडफोड होते. त्यांची उत्सुकता योग्य पद्धतीने शमवली नाही तर त्यांच्या डोक्यात अनुत्तरीत प्रश्नांची गर्दी वाढते. मग ती गर्दी जेव्हा ओव्हरफ्लो होते तेव्हा नको त्या व्यक्तीला प्रश्न विचारून उत्सुकता शमवली जाते किंवा स्वतःच कुठलं तरी लॉजिक कशाला तरी लावून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

काल आमच्याकडे बालमानसशास्त्र जाणणारे, संवेदनशील असणारे एक प्रसिद्ध कार्यकर्ते आले होते. ते खास गप्पा मारण्यासाठी प्री अपॉइंटमेंट घेवून आले होते. सकाळी त्यांचा हेच विचारण्यासाठी फोन आला तेव्हापासून माझी चलबिचल चालू होती की, ते येतील तेव्हा माझ्या भाच्याचे काय करू? माझ्या भाच्यांना खूप वेळ द्यावा लागतो, त्यांच्याशी खूप खेळावं लागते, त्यांना प्रचंड प्रश्न असतील तेवढ्या सर्व प्रश्नांचे न थकता उत्तर द्यावे लागते. ते जगातल्या कुठल्याही वस्तू, प्रसंग, शब्द, फोटो इ.इ. (ही यादी प्रचंड मोठी आहे) कशाबद्दलही, कशावरूनही प्रश्न विचारू शकतात. माझ्याशी बोलताना त्यांना कुठलाही विषय वर्ज नसतो. त्यांना घरातल्यांनी माझ्या संदर्भात कितीही घाबरवले तरी ते मला अजिबात घाबरत नाहीत. मी किर्ती महान आहे हे घरच्यांनी कितीही पटवलं तरी ते पटतच नाही. त्यांच्यादृष्टीने मी त्यांची ‘आत्या’ आहे विषय संपला. जेव्हा जेव्हा मी माझ्या भावाकडे असते तेव्हा तेव्हा त्यांच्या घरात आमचा प्रचंड दंगा, हसी मजाक, मस्ती सुरू असते. मला प्रचंड हसायला आवडते, हसणार्‍या व्यक्तींना बघायला आवडते.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज मी माझ्या गौरवाचं एवढे का लिहित आहे. तर कारण तितकच महत्वाचे आहे आणि जे जे कोणी ते कारण समजावून घेईल आणि आत्मसात करील त्या सर्वांचे आयुष्य आनंददायी होईल. वर म्हणाले, तसं ते माझे विचारवंत मित्र वेळेवर माझ्या घरी पोहोचले. आमच्या गप्पा तर सुरु झाल्या पण माझ्या भाच्यांचा हस्तक्षेप काही कमी होईना. ही मुले सारखी काहीना काही कारण काढून आमच्या चर्चेत व्यत्यय आणत होते. मी खुणावून पाहिले, त्यांना समजावून पाहिले, हसत हसत रागावून पाहिलं परिणाम शून्य. त्या माझ्या मित्राने मात्र माझ्या तिन्ही भाच्यांना जवळ बोलावलं.त्यांची नांव, शिक्षण, शाळा, शाळेची वेळ, सुट्ट्यांचे दिवस, आईवडील काय नोकरी/ व्यवसायात आहेत, खेळायला काय आवडते, काय काय करायला आवडते? असे बरेच प्रश्न सहजपणे विचारत माहिती घेतली.

- Advertisement -

पुढे त्याने त्या तिघांनाही असं काही काम दिले की, साधारण ४५ ते ५० मिनिटे माझ्या भाच्यांचा कलकलाट थांबलेला होता. एक तासाभराने माझ्या भाचीने कागदाचे एक छान डिझाईन करून आणले होते. एका भाच्याने १०० असे जनरल नॉलेजचे प्रश्न लिहून आणले होते जे त्याला महत्वाचे वाटतात आणि त्यातल्या सर्वात मोठ्या भाच्याने १५ इंग्रजी सिनेमांची नांवे, तसेच थोडक्यात त्यांची स्टोरी जे सिनेमे त्याने यु-ट्यूूब वर, पेन ड्राइव्हद्वारे मित्रांकडून आणून किंवा त्यांच्यासोबतच पाहिले होते. हे सिनेमे पाहताना घरातील कोणीही मोठे बरोबर नव्हते.

माझ्या त्या मित्राच्या प्रती आदर खूपच वाढला. त्याच्या या कृतीचे विश्लेषण जेव्हा त्यानेच मांडले तेव्हा लक्षात आले की, शाळकरी वयाच्या मुलांमध्ये प्रचंड ताकद, उत्सुकता आणि कृतीशीलता असते. ती ताकद योग्य तर्‍हेने वापरली गेली नाही की घरात तोडफोड होते. त्यांची उत्सुकता योग्य पद्धतीने शमवली नाही तर त्यांच्या डोक्यात अनुत्तरीत प्रश्नांची गर्दी वाढते. मग ती गर्दी जेव्हा ओव्हरफ्लो होते तेव्हा नको त्या व्यक्तीला प्रश्न विचारून उत्सुकता शमवली जाते किंवा स्वतःचं कुठलं तरी लॉजिक कशाला तरी लावून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

- Advertisement -

या वयातील मुले प्रचंड कृतीशील असतात. त्यांच्या त्या त्या कृती सतत समजावून घेतल्या पाहिजे. तर बर्‍याच वेळा घरातील वयस्कर आजी- आजोबा किंवा पालक अज्ञानापोटी विचित्र आरोप करत मुलांना रागावतात. म्हणजे माझ्या भाच्याच्या बाबतीत माझ्या आई बाबांची सारखी तक्रार असते की तो शाळेतून आला की काहीतरी इंग्रजी पाहात असतो. ही तक्रार त्यांनी जशी वारंवार त्याच्या मम्मी पप्पांकडे केली तशी माझ्याकडेही केली होती. त्याच्या मम्मी पप्पांनी त्याला पहिल्यांदा साध्या पद्धतीने, नंतर टिपिकल पालकांच्या पद्धतीने समजावले.

मला माझा भाचा काय पाहतो याची उत्सुकता होती पण मी कधीच टाईम काढून त्याच्या बरोबर सिनेमा पहायला बसले नाही. बर तो माझा भाचा मला अशा छान डिटेक्टीव्ह सिनेमांबद्दल कायम सांगायचा. मी त्याच्या बरोबर वेळ न घालवल्यामुळे तो डिटेक्टीव्ह सिनेमे बघतो जे त्याला आवडतात हे मी समजूच शकले नाही. इंग्रजी सिनेमात बायका कमी कपड्यात असतात कारण तो त्यांच्या नियमित पेहेरावाचा भाग आहे आणि माझा तो भाचा त्या पेहेरावाकडे पाहातदेखील नाही हे मी माझ्या पालकांना समजावू शकले नाही. त्यामुळे आपला नातू बेकार काहीतरी पाहातो हा गैरसमज दूर न होता तो वाढतच गेला.

कमी अधिक फरकाने बर्‍याच घरांमध्ये असेच घडत असते आणि हळूहळू मग मुले – पालक- आजी- आजोबा यांच्यातील दरी वाढतच जाते.असे तीन ग्रहांवर राहणारे लोक एकाच घरात आरडाओरडा करत किंवा मुके होवून दिवस ढकलत असतात असे दिसते. प्रश्न फक्त एवढाच नाही. पुढे हीच नाराज मुले समवयस्क मुलांच्या घोळक्यात जमा होतात. सर्वांचे असेच काहीतरी कच्चे पक्के दु:ख एकत्र येत, गँग घट्ट होत जाते. मग पहिल्यांदा गंमत म्हणून सुरु केलेली मजा कधी व्यसनांच्या आहारी घेवून जाते हे त्यांनाही कळत नाही किंवा कुठल्यातरी भाऊ- दादा- नानाच्या टोळीच्या तरी आहारी जातात.

मागच्या लेखात मी शेतातून दमलेल्या युवांचा जत्रा किंवा उरुसासारख्या गर्दीच्या ठिकाणचा सहभाग नोंदवला होता. गणपती संपले की उरुस आणि उरुस संपतो तोच नवरात्री सुरू होतात. इकडे गावो गावाची तरुण मंडळी टेम्पो, ट्रक्समध्ये एकत्र जमतात. सर्वांच्या अंगात गणपती किंवा ‘आदिवासी दिवसाला’ शासनाने वाटलेले सारखे टी शर्ट असते. डोक्याला भगवी पट्टी त्यावर बरोबर जय श्रीराम असे लिहिलेले असते. असलेल्या सणाचा आणि त्या जय श्रीरामचा काय संबंध हे कोड जेव्हा श्रीराम भक्त सत्तेवर आले तेव्हा कळले. अशा या गाडीतून जाणार्‍या भक्तांच्या गाडीवर मोठा भोंगा कर्ण ककर्श आवाजात गाण ऐकवत असतो. गाण्यातील शब्द देवाच्या नावाचे असतात पण ज्या ठेक्यावर गाणे बेतलेले असते ते मात्र कुठल्या न कुठल्या प्रसिद्ध सिनेमाचे डोलवणारे गाणे असते. मोखाडा, जव्हारच नाहीतर अगदी त्र्यंबक, हरसूल यासर्व भागांकडून मोठ्या प्रमाणात ही तरुण मंडळी अशा गाड्या करुन डहाणूच्या देवीकडे जावून मशाल घेवून, ती मशाल पायी नाचवत नाचवत आपापल्या गावी नेऊन चौकात बसवतात.

या सर्व आयोजनाचे पैसे कोण? किती? आणि का देतो? हा पुन्हा मोठाच अभ्यासाचा विषय आहे, तो परत कधीतरी यावर बोलू. पण आता लक्षात आलेली गोष्ट अशी की शहरातील मोठे मोठ्या इवेन्टपासून तर आता या कुपोषण भागात ही मी पाहात आले आणि लक्षात आलेली गोष्ट म्हणजे या सर्व आयोजनात होणारा प्रचंड खर्च. आता फक्त शहरातच नाहीतर गावांमध्ये हा ऑकेस्ट्रा असतो.आता मधल्या मध्यवर्ती गावात मधल्याच चौकात मोठा मांडव घातलेला असतो आणि आजूबाजूचे सर्व तरुण -तरुणी छान सजून धजून या जागरणासाठी मनोभावे आलेले असतात. बरं, अशा ठिकाणी जाण्याला घरातले ही विरोध करीत नाहीत. फारतर फार बरोबर येतील. आमच्याकडे तर आतल्या पाड्यांवरचे लोक असे गट करुनच येतात आणि रात्री उशीरा एकत्र परत जातात.

मी स्वतः नास्तिक असल्यामुळे देवाच्या नावावर चालणार्‍या या सर्व अंधाधुंदीचा मला फारच राग यायचा. पण मनोरंजनासाठी एकत्र पुस्तक वाचायला त्यांना आवडत नाही हा काही त्या लोकांचा दोष नाही होऊ शकत. बिगर आदिवासी शिक्षकांच्या कधीतरी शाळेत येण्याच्या सवयीमुळे जेव्हा शिकण्याची आवड लागण्याची शक्यता होती तेव्हा संधी न मिळालेले आमच्याकडचे अनेक आदिवासी मुले पुढे कायमस्वरूपी शिक्षणातून बाहेर पडतात किंवा कोणीही नापास नाही या चुकीचा अर्थ घेवून बजावण्यात आलेल्या निर्णयामुळे ही मुले पास होतात पण स्वतःचे नावसुद्धा व्यवस्थित लिहू शकत नाहीत.

अशा पार्श्वभूमीवर यांना काय तुम्ही निर्गुण, निराकार देव असतो, गरजा भागवण्यासाठी देवाची नाही आपल्या कष्टाची गरज असते हे कसे शिकवणार हे मोठेच चँलेज आहे.म्हणून त्या त्या वयात जबाबदार सर्वांनीच आपल्या संपर्कात येणार्‍या सर्वच मुलांची एनर्जी, कृतीशीलता समजावून घेतली पाहिजे मग ते मूल स्वतःचे असो की तुम्ही शिकवत असलेल्या आश्रमशाळेतील असो किंवा तुम्ही शासकीय कार्यालयात असाल जिथून ह्या सर्व कामाला वेतन, अनुदान जात असेल अशा सर्व ठिकाणच्या मुलांना रागवण्यापेक्षा किंवा सगळीकडे मोकळे सोडून देण्यापेक्षा त्यांच्याशी वेळेत, त्यांच्या भाषेत, त्यांच्या कलेने घेतले पाहिजे तेव्हाच देवाचे, सणांचे किंवा त्या बरोबरीने उभ्या राहणार्‍या जिवंत माणसांच्या प्रस्थेचे अवडंबर थांबेल. याचा अर्थ माझा तुमच्या देवाला विरोध आहे असे नाही पण एकदा देव रस्त्यात किती, कधी आणि का मिरवायचा? याचा विचार करायला सर्वांनी शिकायलाच लागेल, याची जाणीव व्हावी त्यासाठी हे विवेचन.

अनिता पगारे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -