घरफिचर्सआपण कसं जगायचं हे आपणंच ठरवायला हवं

आपण कसं जगायचं हे आपणंच ठरवायला हवं

Subscribe

लोक काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. तुम्ही तुमचं आयुष्य तुम्हाला हवं तसं जगायला हवं. आयुष्य जगताना घरातून माझ्यावर केव्हाच दबाव नाही आला. मी बिनधास्त आयुष्य जगले. लोक काय म्हणतील? याचा विचार करत राहिलात तर काहीच करता येणार नाही. कुणाच्याही कपड्यांवर नजर ठेवण्यापेक्षा तुमच्या नजरा बदला असं रोखठोक मत ’तलाश’, ’बहेन होगी तेरी’, ’31 दिवस’ आणि ’अजिंठा’मध्ये काम केलेली अभिनेत्री रीना अगरवालनं मांडलं. माय महानगरच्या फेसबुक लाईव्हमध्ये रीना अनेक विषयांवर बोलली. अनेक प्रश्नांना तिनं बिनधास्तपणे उत्तरं दिली.

करिअरची सुरुवात एअर होस्टेस म्हणून

माझ्या करिअरची सुरुवात क्रु मेंबर, एअर हॉस्टेस म्हणून झाली. माय महानगरच्या टिमशी गप्पा मारताना रीनानं आपल्या करिअरचे अनेक पदर उलगडायला सुरूवात केली. एक मॉडेल म्हणून या चंदेरी दुनियेत पाऊल ठेवलं. एअर हॉस्टेसची नोकरी सोडल्यानंतर ऑडिशनसाठी मुंबईला आले. एक अभिनेत्री म्हणून क्या मस्त है लाईफ या डिस्नी चॅनलवरच्या सिरिअलपासून करिअरची सुरुवात झाली. सुरुवातीला दडपण आलं. पण त्यानंतर बिनधास्त झाले. पहिला रोल मिळाल्यानंतर खूप आनंद झाला. नाटक आणि चित्रपट हे दोन्ही वेगळे प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे दोन्ही माध्यमांमध्ये काम करतानाची मजा वेगळी असते. जेट एअरवेजची नोकरी सोडताना दु:ख नाही झालं. एक आनंद होता एका वेगळ्या दुनियेत काम करण्याचा. नोकरी सोडण्याचा निर्णय घेताना घरच्यांनी देखील कधीही विरोध नाही केला. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे बिनधास्तपणा आला. पहिल्यांदा मॉरिशला गेले ते वयाच्या सोळाव्या वर्षी. काही लहान मुलांच्या डान्स ग्रुपसह त्या ठिकाणी आलेला कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा होता. कारण त्यावेळी मी एकटीच होते. एअर हॉस्टेसची नोकरी देखील योगायोगानं मिळाली. चालता चालता एअर हॉस्टेसच्या मुलाखतीला गेले आणि 850 जणींमधून तीन जणींची निवड झाली. त्यामध्ये मी देखील होते. पण या प्रोफेशनमध्ये सोशल लाईफ नव्हती. मजा नव्हती. अखेर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण, पुन्हा एअर हॉस्टेस होण्याचा विचार नाही. अभिनय करत असले तरी डान्स हे माझं पॅशन आहे माझी आवड आहे.

अजिंठा मिळण्याचा अनुभव मजेशीर

’अजिंठा’ चित्रपटामध्ये काम मिळण्याचा किस्सादेखील मस्त आहे. मिफ्तासाठी मी लंडनला गेले होते. त्यावेळी माझी नितीन चंद्रकांत देसाईंशी भेट झाली. त्यांनी मला चित्रपटामध्ये काम करशील का? असं विचारलं. ते देखील एखाद्या चेहर्‍याच्या शोधात असावेत. भेटीदरम्यान मुंबईला येऊन भेट असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी मुंबईला येऊन अजिंठाच्या ऑडिशनसाठी गेले. ऑडिशन झाली. त्यावेळी माझ्या डान्सची ऑडिशन देखील घेतली गेली आणि मला कमलाचा रोल मिळाला. त्यावेळी अडीच तास मला मेकअपसाठी लागायचे. थंडीमध्ये कुडकुडत कर्जतमध्ये केलेलं शूटींग आज देखील आठवतं. अजिंठा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी आयब्रो आणि व्हॅक्सिंगदेखील केलं नाही. या गोष्टी मुलींसाठी किती महत्त्वाच्या असतात हे मुलींना सांगायला नको. त्यामुळे त्यावेळी कोणत्याही पार्टीतसुद्धा मला जाता येत नव्हतं.

- Advertisement -

’तलाश’चा अनुभव भारी

त्यानंतर तलाशमध्ये काम करण्याची संधी मिळाली. परफेक्शनिस्ट आमीर खानसोबत काम करण्याचा आनंद गगनात मावत नव्हता. 6 वेगवेगळ्या रोलसाठी माझी निवड झाली. मला देखील विचारलं गेलं, कोणता रोल करायला आवडेल? मी म्हटलं आमिर खान सोबत काम करायची संधी मिळेल तो रोल द्या. त्यानंतर मी 5 दिवस आमिर खान सोबत काम केलं.

एअर होस्टेसचा मजेशीर किस्सा

चित्रपट सृष्टीतील प्रवासाबद्दल बोलत असताना रिनानं एअर हॉस्टेस म्हणून काम करतानाचा एक किस्सा सांगितला. आम्ही अहमदाबाद फ्लाईटमध्ये होतो. त्यावेळी एका जर्मन प्रवाशाची तब्येत बिघडली. त्यावेळी त्याच्या सहप्रवाशानं आरडाओरडा केला. जर्मन भाषा असल्यानं काहीही कळत नव्हतं. पण दहावीमध्ये असताना जर्मन भाषा हा विषय होता. त्याच अनुभवावर याच्याशी संवाद साधत होते. आम्ही त्याच्यावर उपचार करत होतो. तर, इतर प्रवासी मात्र लिंबूपाणी मागत होते. त्या अत्यवस्थ प्रवाशावर उपचार केल्यानंतर आम्ही प्रवाशांना खायला काय हवं? अशी विचारणा केली. पण, प्रवाशी मात्र लिंबूपाणी हवं असंच म्हणत होते. अखेर त्यांना लिंबूपाणी दिल्यानंतर ते शांत झाले. पण त्या इतर प्रवाशांना वेळ काय आणि प्रसंग काय याबद्दल काहीही देणंघेणं नव्हतं हे पाहून मी देखील अवाक् झाले.राजकुमार राव सोबत काम करण्याचा अनुभव देखील मस्त होता. नवोदित असून देखील राजकुमार रावनं केव्हाव्ही काम करताना ते जाणवू दिलं नाही. स्वत:चा सीन झाल्यानंतर देखील तो माणूस रात्री उशिरापर्यंत कॅमेर्‍याच्या मागे उभा राहून आम्हाला मदत करायचा. सेटवर वेळेवर येणं आणि सर्वांना सांभाळून घेणं, यामुळेच राजकुमार राव आज यशस्वी अभिनेता झालाय.

- Advertisement -

31 दिवससाठी आधी उत्सुक नव्हते

31 दिवसमध्ये काम करण्यासाठी मी उत्सुक नव्हते. पण डायरेक्टरचे खूप फोन आले. माझे डोळे पाहिल्यानंतर त्यांनी मला मीराचा रोल ऑफर केला होता. अखेर होय,नाही म्हणता म्हणता मी मीरा देवस्थळीचा रोल स्वीकारला. पण, आता मागे वळताना पाहून खूप बरं वाटतं. शशांक केतकर आणि मयुरीसोबत काम करतानादेखील मजा आली. दोघंही डाऊन टू अर्थ आहेत. पुन्हा संधी मिळाली तर दोघांसोबतही काम करायला नक्की आवडेल, असं देखील रीनानं यावेळी स्पष्ट केलं. चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना सर्वच गोष्टी तुम्हाला सहज मिळत नाहीत. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. काहीही न करता तुम्हाला पहिला रोल मिळाला तरी तुम्हाला सिद्ध करावाचं लागतं. त्यासाठी मेहनत ही आलीच.

दोन रीना असल्यामुळे होते गफलत

दोन रीना अगरवाल असल्याने अनेक वेळा तिच्यासाठी अनेक जण मला फोन करतात आणि माझ्याशी बोलतात. काही वेळा नंतर मला त्यांना सांगावं लागतं मी कोणती रीना अगरवाल आहे ते, असे किस्से अनेक वेळा घडतात. तिलादेखील असेच अनुभव येत आहेत. नाव सारखं असल्यानं या गोष्टी होतात. पण आम्हाला आता सवय झाली आहे. आम्ही दोघी देखील आता प्रत्येक गोष्ट समजून घेतो. तिला आलेला कॉल मी तिला सांगते. आता आमच्यामध्ये मैत्री झाली आहे.

एअर होस्टेसकडे वेटर्स म्हणून पाहिलं जातं

एअर हॉस्टेसकडे वेटर्स म्हणून बघितलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही तुमच्या सेवेसाठी विमानामध्ये असतो. तुम्हाला मदत करणं हाच आमचा उद्देश. प्रशिक्षणादरम्यान आम्हाला सुरक्षेची सर्वात जास्त ट्रेनिंग दिली जाते. आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यामुळे अनेक वेळा त्रास झालेला आहे. त्यामुळे आम्ही काही बंधनं देखील पाळतो. प्रवाशांच्या सेवेसाठी आहोत. तुमची सुरक्षितता हीच एअर हॉस्टेसची प्राथमिकता असते ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. एअर हॉस्टेसनं केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. त्या तुमच्या सुरक्षेसाठी असतात ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घेतली पाहिजे.

रीना पाळते सामाजिक भान

यावेळी रीनानं सामाजिक भान देखील जपल्याचं पाहायाला मिळालं. तिनं प्लॅस्टिक बंदी नंतर एक फिल्म केली त्याबद्दल बोलताना रीना म्हणते, प्लॅस्टिकमुळे मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. प्लॅस्टिकमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्याचा लोकांनी देखील गांभीर्यानं विचार करायला हवा. प्रत्येक वेळी सरकारला दोष देऊन उपयोग नाही. तुम्ही देखील पुढाकार घेणं गरजेचं आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करताना मराठी जास्त जवळचं वाटतं. हिंदीमध्ये जरी बजेट जास्त असलं तरी मराठी सेटवर आपलेपणाची भावना असते. क्रिएटीव्हीटी, कॉन्टेंट नुसार मराठी चित्रपट खूप चांगले आहेत. त्यासाठी आपण सैराटचं उदाहरण घेऊ शकतो. मराठी चित्रपटांमध्ये मी जास्त रमेन कारण सेटवरचं वातावरण हे आपलंसं करतं आणि सेटवर आपलेपणाची भावना असते.

या महानगराने मला काय दिलं

पुण्याची असल्यामुळे पुण्याबद्दल तर प्रेम आहेच आणि नेहमीच राहणार. मुंबईने बरंच काही दिलं आहे. माझ्याकडून मुंबईसाठी जे चांगले प्रयत्न करता येतील ते मी नेहमीच करत राहीन. माझं मुंबईवर विशेष प्रेम आहे. मुंबईनं मला नाव मिळवून दिलं. पुणे जन्मभूमी तर मुंबई कर्मभूमी असल्याची कृतज्ञ भावना आहे.

शब्दांकन – अमोल मोरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -