घरताज्या घडामोडीआहार भान - दिवाळी स्पेशल: भाजक्या पोह्यांचा चिवडा

आहार भान – दिवाळी स्पेशल: भाजक्या पोह्यांचा चिवडा

Subscribe

तेल लाऊन, उटणे लावून केलेले अभ्यंग स्नान, दारा समोरची रांगोळी, आकाश कंदील, पणत्यांची आरास. मन कसे उत्साहाने भरून जाते. सकाळी नवीन कपडे घालून घरातील सगळ्यांबरोबर केलेला फराळ. यावर्षी मात्र कोरोनामुळे व्हिडिओ कॉलवर प्रिय जनांना शुभेच्छा द्याव्या लागणार आहेत. आनंद हा लहान लहान गोष्टीत ओसंडून वाहत असतो.

दिवाळीचे आठ पंधरा दिवस गोडधोड खाताना एक नजर आपल्या डाएट वर जरूर ठेवावी. तळलेले पदार्थ, जड जेवण जेऊन Acidity, रक्त शर्करा, कॉलेस्टेरॉल वाढू शकते. तेव्हा खाण्यावर मर्यादा ठेवावी. भरपूर फळे, सलाड, कोथिंबीर खावी. दुपारच्या शाकाहारी जेवणात सुंठ सैंधव घातलेले ताजे ताक आवर्जून घ्यावे. रात्रीचे जेवण, खिचडी, कढी, सूप, मिक्स पिठाची भाकरी असे ठेवावे.

- Advertisement -

चिवडा हा सगळ्यांचा आवडता प्रकार. थोडा तेलकटपणाकडे झुकणारा. आपल्यातील काही जणांना नाही चालत. त्यांच्यासाठी आज आपण करुया कमीत कमी तेल वापरून केलेला भाजक्या पोह्यांचा चिवडा. सढळ हाताने वापरलेल्या बडीशेप आणि कडीपत्त्याने फारच चविष्ट लागतो. फारसे तेल लागत नसलेला हा सुका सुका चिवडा खाऊन अजिबात त्रास होत नाही.

साहित्य – 

- Advertisement -
  • भाजके पोहे – पाव किलो
  • शेंगदाणे – १०० ग्रॅम
  • डाळे – ५० ग्रॅम
  • कडीपत्ता – पाव वाटी
  • राई – एक छोटा चमचा
  • बडीशेप – ३ चमचे
  • तीळ – एक चमचा
  • हिंग
  • हळद
  • साखर – एक चमचा
  • मीठ चवीनुसार

कृती –

एका कढईत शेंगदाणे आणि डाळे एक एक छोटा चमचा तेल घेऊन तळून घ्या. (शेंगदाणे मुद्दाम जास्त सांगितले आहेत कारण भाजता भाजता किंवा तळता तळता,  शेंगदाणे नीट झालेत की नाही हे बघण्यासाठी बरेच पोटात जातात.) तुम्ही भाजलेले शेंगदाणे पण वापरू शकता.

कढईत २ चमचे तेल घेऊन तापल्यावर त्यात पाव चमचा हळद घाला आणि लगेच भाजके पोहे घाला. मध्यम आचेवर कुरकुरीत परतून घ्या. जास्त वेळ परतावे लागत नाहीत. परातीत काढून घ्या.

त्याच कढईत ३-४ चमचे तेल घ्या. तेल चांगले तापले की त्यात क्रमा क्रमाने राई, बडीशेप, हिंग, तीळ आणि कडीपत्ता टाका. चांगले परतून घ्या. कडीपत्ताची पाने कुरकुरीत व्हायला हवीत म्हणजे त्याची चव आणि सुवास तेलात उतरतो.

वरील मिश्रणात पाव चमचा हळद घालून त्यात भाजलेले पोहे टाका. एक चमचा साखर आणि चवी नुसार मीठ घाला. चांगले परतून घ्या. ५-७ मिनिटे मंद मध्यम आचेवर ठेवा. अधून मधून परतत राहा.

थंड झाल्यावर हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा.

हलक्या पिवळ्या रंगाच्या पोह्यात असलेले लालसर शेंगदाणे, हिरवा कडीपत्ता चिवड्याची खुमारी वाढवतात. तेलकट नाही म्हणून निश्चित पणे खा.

डॉ . ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -