घरलाईफस्टाईलस्मरणशक्ती कशी वाढवाल?

स्मरणशक्ती कशी वाढवाल?

Subscribe

शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, स्मरणशक्तीवर थेट परिणाम करणार्‍या संतुलित आहाराचा मेंदूशी घनिष्ठ संबंध आहे. जर शरीरात हिमोग्लोबीनची पातळी चांगली असेल तर मेंदूचा रक्तप्रवाहसुद्धा चांगला राहील. जे लोक आहारनियमन करतात किंवा वेळेवर जेवण करू शकत नाहीत, ते सतत तणावाखाली राहतात. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, खाण्या-पिण्यात अनियमितता असल्यामुळेच स्मरणशक्ती दुबळी होते आणि इतर मानसिक आजार उद्भवतात.

ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड

सॉलमन माशांमध्ये सर्वांत जास्त ओमेगा-३ पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आढळून येते. याउलट शाकाहारी लोक काशीफळाच्या बिया, सोयाबीन, अक्रोड आणि जवस यांचा जेवणामध्ये भरपूर समावेश करू शकतात. यामुळे मेंदू चांगल्या प्रकारे कार्य करतो. वास्तविक ओमेगा-३ फॅटी अ‍ॅॅसिड इंधनाइतके काम करतो. त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश असावा.

फळे आणि भाज्या

गडद किंवा वेगवेगळ्या रंगांची फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्सचे सेवन केल्यास मेंदूच्या ऊतींचे संरक्षण होते. तसेच हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले फोलेट, ‘क’ आणि ‘ई’ जीवनसत्त्व हेसुद्धा चांगले अँटीऑक्सिडंट्स आहेत. यामुळे मेंदूतील पेशींची दुखापत आणि ऑक्सिकरण यापासून बचाव होतो. तज्ज्ञांच्या मते, आहारात पालक, पत्ताकोबी, टरबूज आणि सर्व प्रकारच्या आंबट फळांचा समावेश करावा.

- Advertisement -

फॉस्फरस

हे खनिज द्रव्य मेंदूच्या पेशींमध्ये आढळून येते. यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आहाराद्वारे फॉस्फरसची पूर्तता करणे गरजेचे आहे. सुका मेवा, सर्व प्रकारच्या शेंगा, सूर्यफुलाच्या बिया, बटाटे, ब्रोकोली (एक प्रकारचा कोबी) आणि दूध, दही, चीज आणि पनीरसह सर्व प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांतूनही फॉस्फरस मिळवता येऊ शकतो.

प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळा

जंक फूड, प्रोसेस्ड फूड दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी विविध रसायनांचा आणि कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. ही रसायने मानवी आरोग्यासाठी घातक असतात. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे खाद्यपदार्थ न्युरोट्रान्समीटर किंवा ब्रेन केमिकल्समध्ये अडथळे आणण्यास कारणीभूत ठरतात.

- Advertisement -

सुका मेवा

झिंक, मॅग्नेशियम आणि लोह यासारखी खनिज द्रव्ये सुक्या मेव्यातून प्राप्त केली जाऊ शकतात. यामुळे मेंदू वेगाने काम करतो. तज्ज्ञांच्या मते, विशेषत: अक्रोड आणि बदामाचे सेवन केल्याने मेंदू अधिक कार्यक्षम होतो.

कर्बोदके

मेंदूला ऊर्जा देण्यासाठी कर्बोदके आवश्यक आहेत. तज्ज्ञांच्या मते, अभ्यास करणार्‍या मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी कर्बोदकांची भूमिका महत्त्वाची असते. ओटमील, घेवडा, पालक, ब्राऊन राईस, ब्रान, चेरी, वाटाणे आणि द्राक्षे यातून भरपूर कर्बोदके मिळतात.

व्यायाम

मानवी मेंदूत नवीन पेशींचा विकास होत राहतो. वय वाढत असताना मेंदूची कार्यक्षमता मंद होऊ लागते. अशावेळी नियमित व्यायाम केल्याने मेंदूच्या पेशींचा विकास होण्यास मदत मिळते. तज्ज्ञांच्या मते, सकाळी जॉगिंग केल्याने मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि मेंदूत अ‍ॅण्डोर्फीन नावाच्या हॅप्पी हार्मोनची सक्रियता वाढते. यामुळे तणाव कमी होण्यासोबतच चयापचयाची गती वाढते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -