नारळी पौर्णिमेला करा स्वादिष्ट नारळी भात

नारळी पौर्णिमेला नारळी भात करण्याची पद्धत असल्याने याच भाताची चविष्ट रेसिपी खास तुमच्यासाठी

Mumbai

कोणताही सण-उत्सव असो, आपल्या घरात गोड-धोड खाद्य पदार्थ तयार केले जातात. सणाच्या निमित्ताने कोणते नवीन पदार्थ करायचे हा देखील घरातील सुगरणींना प्रश्न पडत असतो. मात्र, नारळी पौर्णिमेला नारळी भात करण्याची पद्धत असल्याने याच भाताची चविष्ट रेसिपी खास तुमच्यासाठी…

साहित्य

दोन वाटी बासमती तांदूळ, ४ वाटी पाणी, ४ छोटे चमचा साजूक तूप, २-३ लवंग, वेलची पूड, २ वाटी किसलेला गूळ, २ वाटी खोवलेलं ओलं नारळ, ८-१० काजू, १/२ वाटी बेदाणे, केशर काड्या आणि थोडा केशरी रंग.

कृती

भातासाठी लागणारे तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून लवंग परतून तांदूळ टाकून दोन-तीन मिनिटं परतावेत. तांदूळ परतल्यावर पाणी गरम करून त्यात टाकावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवत ठेवावा. भात शिजल्यावर हलक्या हातानं परातीत पसरवून गार करावा. भातात नारळ, गूळ, वेलची पूड, केशरी रंग हलक्या हातानं मिक्स करावा. पातेल्यात तूप तापवून काजू, बेदाणे परतावेत. परतून झाल्यावर ते वाटीत काढून ठेवावेत. तुपात मंद आचेवर भाताचं मिश्रण घालावं. झाकण ठेवून चार-पाच वाफा काढाव्यात. मधून मधून भात हालवावा. १0-१५ मिनिटांनी तळलेले काजू-बेदाणे, केशर वरती पसरवून गॅस बंद करावा.