दिग्गज नेत्यांच्या मुलींमध्ये ’कांटे की टक्कर’

Mumbai
Mumbai North Central Loksabha Constituency
मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघ

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ… या मतदारसंघाचा इतिहास खूप गौरवशाली आहे. स्वातंत्र्यानंतर शरद दिघे, नारायण आठवले, रामदास आठवले, मनोहर जोशी अशा दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पण, २०१४ च्या निवडणुकीनंतर हे चित्र बदललेले पाहायला मिळत आहे. इथे जिंकणारा किंवा हरणारा उमेदवार निवडणुकीनंतर पुन्हा मतदारसंघात उपलब्ध होत नाही, असाच काहीसा आरोप इथली जनता करते. त्यामुळे, ही लोकसभा निवडणूक या वर्षी उभ्या असलेल्या उमेदवारांसाठी नक्कीच कठीण जाऊ शकते. त्यातच सर्वात जास्त फटका या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांना बसण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांच्याविरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या दोन्ही खमक्या उमेदवार पुन्हा एकदा निवडणुकीत एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. पण, या दोन्ही उमेदवारांबाबत या मतदारसंघातील जनतेच्या मनात नाराजीचे सूर आहेत. त्यामुळे, या दोन्ही खमक्या उमेदवारांसाठी ही निवडणूक जिंकणे नक्कीच कठीण जाऊ शकेल यात शंका नाही.

उमेदवारी निश्चित झाल्यानंतर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला सुरूवात केली आहे. पूनम आणि प्रिया या दोन्ही महिला उमेदवारांमध्ये काही समीकरणे जुळतात. ज्यावेळेस प्रिया दत्त या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या, त्यावेळेस त्यांचाही इथल्या जनतेशी फारसा संपर्क नव्हता. त्या मतदारसंघात फिरकत नाहीत असा ही आरोप केला गेला. असेच काहीसे चित्र पूनम महाजन यांच्याबाबतीतही पाहायला मिळत आहे. उत्तर मध्य मतदारसंघातून प्रिया दत्त यांच्याविरोधात निवडून आलेल्या पुनम महाजन यांना देखील जनतेशी तेवढ्या प्रमाणात नाळ जोडण्यात यश आलेले नाही. त्यामुळे, २०१९ ची लोकसभा निवडणूक या दोन्ही उमेदवारांना तितकी सोपी जाणार नाही, असे चित्र सध्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करुन स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना एकहाती जिंकून आणले होते. त्यातच मोदी लाटेच्या प्रवाहात पूनम महाजन काहीशा स्थिरावल्या. पण, गेल्या पाच वर्षाच ओसरलेली मोदी लाट आणि जनतेचा विरोध पाहता पूनम महाजन यांना ही जागा टीकवता येईल का ? हा खरा प्रश्न आहे. पूनम महाजन यांच्यासमोर पुन्हा एकदा काँग्रेसच्या उमेदवार आणि याच मतदारसंघातील माजी खासदार प्रिया दत्त यांचे आव्हान असून काँग्रेस पक्ष त्यांच्या विजयासाठी जोरदार तयारीला लागला आहे.

मुस्लीम मतांचा फायदा पण…

अगदी गल्लीबोळापासून ते थेट मोठ मोठ्या सोसायट्यांपर्यंत हे दोन्ही पक्ष प्रचार करत आहेत. या मतदारसंघात मुस्लीम समाज जास्त असल्याकारणाने आधीपासून या वर्गाची मते काँग्रेस पक्षाला होती. त्यामुळे, या मतदात्यांचा फायदा प्रिया दत्त यांना होण्याची शक्यता आहे. ही बाजू जरी सकारात्मक असली तरी इथली जनता लहरी असल्यामुळे यावेळी या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार ? हे पाहणे खरेच महत्त्वाचे असणार आहे.

पूनम महाजन नॉट रिचेबल

विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम असा हा मतदारसंघ आहे. वांद्रे पूर्व या भागातील भारतनगर, बेहरामपाडा, या परिसरात मुस्लीम संख्या जास्त असल्याकारणाने आधीपासूनच त्यांची मते काँग्रेस पक्षाला मिळत होती. आता ही काहीशी अशीच परिस्थिती असेल अशी शक्यता आहे. कारण, या भागातील जनता आणि कार्यकर्ते पूनम महाजन यांच्या नॉट रिचेबल राहण्याच्या कारणामुळे त्यांच्यावर नाराज आहेत. त्यातच या दोन्ही बड्या उमेदवारांसमोर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार्‍या तृतीयपंथी स्नेहा काळे यांचे देखील आव्हान आहे. अपक्ष उमेदवार स्नेहा काळे यांना जर मते विभागली तर या निवडणुकीत थोडा फार बदल दिसू शकतो. त्यातून, उत्तर मध्य मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न –

झोपडपट्टी पुनर्वसन , दोन मोठे रेल्वे टर्मिनस (वांद्रे, एलटीटी), मुंबईची दोन्ही विमानतळे (आंतरराष्ट्रीय, डोमेस्टिक), पाणी प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे रस्त्याचा प्रश्न.

अशी आहे यंदा लढत –
पुनम महाजन (भाजपा)
प्रिया दत्त ( काँग्रेस)
स्नेहा काळे (अपक्ष)

विधानसभा मतदारसंघातील आमदारांची यादी

विलेपार्ले – अ‍ॅड. पराग अळवनी (भाजप)
चांदिवली – आरीफ नसीम खान (काँग्रेस)
कुर्ला – मंगेश कुडाळकर ( शिवसेना)
कालीना – संजय पोतनीस ( शिवसेना)
वांद्रे पूर्व – तृप्ती सावंत (शिवसेना)
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार (भाजप)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here